Crop Damage : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान

Pre Monsoon Rain : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. १६) वादळी पावसाचा फटका बसला. तसेच शुक्रवारी (ता. १७) ही तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच होता.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Pune News : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरूच आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. १६) वादळी पावसाचा फटका बसला. तसेच शुक्रवारी (ता. १७) ही तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच होता. या पावसाने गुरुवारी सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नागपूर, जळगाव जिल्ह्यांतील अनेक भागांत दाणादाण उडाली. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले.

राज्यात भाजीपाला, फळपिके तसेच उन्हाळी पिकांना पावसाचा तडाखा बसला असून नुकसानीत वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हरकुळ गावात शंभरहून घरांची पडझड झाली असून काजू, आंबा, केळी, ऊस यासह भाजीपाला पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात १५० हून अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. यामध्ये घरे, गोठ्यांचे नुकसान झाले.

सोलापूरमधील उजनी धरण परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने उजनी जलाशयाच्या काठावरील कंदर, फुटजवळगाव परिसरातील केळी, ऊस, पपई आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Rain Update
Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

पुणे जिल्ह्यातही हवेली, खेड, पुरंदर तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हडपसरमध्ये सर्वाधिक २७.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मागील पाच ते सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे.
साताऱ्यातील बिजवडी (ता. माण) परिसरासह जाधववाडी, तोंडले येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

मोठमोठ्या गारा पडल्याने जाधववाडी, बिजवडीतील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. सांगलीत पूर्वमोसमी पावसाने ऊस पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. खरिपाच्या पूर्व मशागतींना गती मिळणार आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली असून वीजपुरवठाही खंडित झाला होता.

नगर जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले विजेचे खांब कोसळले, पोल्ट्री वरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. श्रीरामपूर शहर, बेलापूर, एमआयडीसी, ममदापूर, टाकळीमिया परिसरातील १०० ते १२५ विजेचे खांब वाकले आहेत. तसेच काहीठिकाणी तुटून पडले आहेत.

Rain Update
Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

खानदेशात जळगावमध्ये वादळी पाऊस रोज येत आहे. गुरुवारी दुपारी विविध भागांत पाऊस, वादळ झाले. यात पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागांत अर्धा तास वादळ व पाऊस झाला. साक्री तालुक्यातील वार्सा, पिंपळनेर भागात दुपारी अर्धा तास वादळी पाऊस झाला. सीताडीपाडा व वार्सा भागातील २५ घरांची पडझड या वादळी पावसात झाली. तसेच विजेचे खांबही वाकले आहे. घरांवरी पत्रे उडून गेली. तसेच पशुधनाच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.


परभणी व हिंगोली जिल्ह्यांत एकदिवसाच्या विश्रांतीनंतर सर्वदूर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. या दोन जिल्ह्यांतील ७८ मंडलात वादळी वारे, विजांच्या कडकडात हलका ते जोरदार पाऊस झाला. पूर्वमोसमी पाऊस सुरूच असल्यामुळे उशिरा पेरणी केलेली रब्बी ज्वारी तसेच हळद काढणी, उन्हाळी भुईमूग काढणीसह, मशागतीच्या कामाचा खोळंबा होत आहे. नागपूर शहर जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस बरसल्याने पुन्हा नागपूरकरांची दाणादाण उडाली. वादळामुळे अनेक भागांत झाडे कोसळल्याने वाहतूक खोळंबली. तर काही भागांत बत्ती गूल झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.

विदर्भात नागपूरमध्ये आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उन्हाचे चटके कमी झाले. गेल्या गुरुवारी विजांसह बरसलेल्या धो-धो पावसानंतर शहरात पावसाचा थेंबही पडला नाही. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र सायंकाळ होताच वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाचच्या सुमारास वादळ सुटल्यानंतर अनेक भागांत सरी कोसळल्या. तर काही भागांत वादळाने जोरदार तडाखा दिला.

शुक्रवारचे वातावरण...

परभणीत रिमझिम पाऊस होता. तर नागपूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, नांदेड, येथे ढगाळ हवामान होते. तसेच नगर, सोलापूर, पुणे येथे कडक ऊन होते. छत्रपती संभाजीनगर येथे ऊन सावलीचा खेळ सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com