Buldhana News : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या उपक्रमात शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गाळ काढणे आणि शेतापर्यंत वाहतूक करण्याचा खर्च उचलावा लागणार आहे. शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत उपलब्ध असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण आणि राज्य शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागाच्या मालकीच्या १७७ जलाशयांमधील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गाळ काढण्यात येत आहे. शेतामध्ये गाळ टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत असल्याने शेतकऱ्यांना गाळ मोफत उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना गाळ काढण्यासाठी कोणत्याही यंत्रणेला शुल्क देण्याची गरज नाही. हा गाळ शेतीच्या उपयोगासाठी मोफत उपलब्ध असणार आहे. गाळ उपसा करणे आणि वाहतूक करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम ग्रामपंचायत आणि शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. या उपक्रमात नागरिकांनी सहकार्य करावे, पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. या अल्प कालावधीत धरणातील गाळ काढावा लागणार आहे. विहित मुदतीत ही कामे होऊ शकली नसल्यास ग्रामपंचायतीचे नुकसान होणार आहे. पावसाळ्यात धरणातील गाळ काढता येणे शक्य नसल्याने जलसंधारण विभागाने या कामात अटकाव करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
गाळ काढण्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. तसेच गाळामुळे जमिनीची सुपिकता वाढणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे. धरण, तलावातील गाळ शेतामध्ये नेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. गाळ घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी शेती सुपीक करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा. या उपक्रमात नागरिक, ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.