Dairy Industry: अमेरिकेच्या दुग्धउत्पादनांमुळे डेअरी क्षेत्र धोक्यात येणार

Dairy Sector Protection: अमेरिकेच्या स्वस्त दुग्धउत्पादनांना भारतातील बाजारपेठ खुली करण्यासाठी अमेरिकाकडून दबाव असताना, देशातील ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे भक्कम संरक्षण करण्याची गरज उद्भवली आहे. भारतीय डेअरी उद्योगाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dairy Industry
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Mumbai News: भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांसाठी खुली करावी, यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे. असे झाल्यास देशातील ८ कोटी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. त्यामुळे भारताने दबाव झुगारत देशातील गरीब दूध उत्पादकांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे, अशी मागणी डेअरी उद्योगाने केली आहे.

अमेरिका आणि भारतामध्ये सध्या द्वीपक्षीय करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के शुल्क लागू केले आणि नंतर ९० दिवसांची स्थगिती दिली. या कालावधीत द्वीपक्षीय करार करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे.

वाटाघाटी करताना अमेरिका आपली डेअरी उत्पादने भारताने आयात करावीत, यासाठी दबाव आणत आहे. सध्या डेअरी उत्पादने आयातीवर आयात शुल्क आणि इतर काही बंधने घातलेली आहेत. मागच्या वर्षी अमेरिकेने ८२२ कोटी डॉलर्सची डेअरी उत्पादने निर्यात केली होती.

Dairy Industry
Dairy Products: मूल्यवर्धित दूध उत्पादनांना जागतिक संधी

गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक जयेन मेहता म्हणाले “भारताने अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांना कमी भावात आपल्या बाजारात प्रवेश देऊ नये. अमेरिका आपल्याकडील अतिरिक्त डेअरी उत्पादने स्वस्तात भारताच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. ते आपल्याला परवडणारे नाही”

“भारतात दुधाची १४० कोटी लोकसंख्येची बाजारपेठ आहे. तर डेअरीवर ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपजीविका आहे. व्यापार करार करताना देशातल्या ग्रामिण भागातील गरीब दूध उत्पादकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकारने घेणे आवश्यक आहे,” असेही मेहता म्हणाले.

अमेरिका आणि भारताच्या दूध उत्पादकांच्या क्षमतेतही मोठा फरक आहे. भारतातील दूध उत्पादकांकडे सरासरी दोन किंवा तीन जनावरे आहेत. तर अमेरिकेच्या एकेका दूध उत्पादकाकडे शेकडो दुभती जनावरे आहेत. त्यामुळे भारतातील दूध उत्पादक त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत, असे डेअरी उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dairy Industry
Amul Dairy Industry: ‘अमूल’चा आदर्श

“केंद्र सरकारने देशातील दूध उत्पादकांना विदेशातील स्वस्त आयातीचा फटका बसणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वस्त डेअरी उत्पादने आयात झाल्यास देशातील संपूर्ण डेअरी उद्योगच अडचणीत येईल. त्याचा फटका आमच्यासारख्या दूध उत्पादकांना बसेल,” असे दूध उत्पादक शेतकरी महेश साकुंडे म्हणाले.

जागतिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर आहे. भारतात जवळपास २३९ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. भारताचे दूध उत्पादन अमेरिकेपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे. अमेरिकेत १३० दशलक्ष टन उत्पादन होते. भारताचा डेअरी उद्योग १ हजार ६८० कोटी डॉलर्सचा आहे.

इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष आर. एस, सोधी म्हणाले की, “भारताने द्वीपक्षीय व्यापार करारातून आतापर्यंत डेअरी उद्योगाला वगळले आहे. यापुढेही सरकारने डेअरी उद्योगाला आयातीपासून संरक्षण द्यावे लागणार आहे. भारतीय डेअरीला सांस्कृतिक आणि आहार विषयक महत्त्वामुळेही संरक्षण हवे आहे. अमेरिकेत गायींना प्राण्यांच्या उपउत्पादनांपासून निर्मित खाद्यही दिले जाते. पण भारतातील ग्राहक अशा गायींचे दूध घेणार नाहीत.”

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांसाठी मोकळी करावी, यासाठी अमेरिका दबाव आणत आहे. मात्र, भारत या दबावाला विरोध करत आहे. डेअरी उद्योगाविषयी भारत तडजोड करणार नाही. त्यामुळे डेअरी उद्योगाला आयातीपासून संरक्षण मिळेल.

“स्किम्ड दूध पावडर आयातीवरील शुल्क कमी केल्यास प्रक्रियादार आयात माल विकत घेतील. त्यांची देशातील शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी कमी होईल. त्यामुळे देशातील दुधाचे दर कमी होतील. तसेच देशातील चीज आणि योगर्ट उत्पादकांनाही कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल,” असे क्रिसिलचे संशोधक संचालक पुषण शर्मा यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com