Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीचे पीक निसवले आहे. काही भागात आगाप पेरणीच्या पिकात दाणे पक्व होत असून, पीक बऱ्यापैकी आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
खानदेशात यंदा दादर ज्वारी व संकरित ज्वारीची मका पिकापेक्षा अधिकची पेरणी झाली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी कमी पावसामुळे काहीशी कमी झाली. परंतु संकरित ज्वारी, संकरित दादर ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली.
चारा व दादर ज्वारीस दर मागील हंगामात चांगले होते. काही शेतकऱ्यांच्या दादर ज्वारीस कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी यंदा मका, कांद्याचे क्षेत्र कमी करून संकरित दादर ज्वारी व अन्य ज्वारीची पेरणी केली. कारण ज्वारीस मक्यापेक्षा कमी पाणी लागते. शिवाय उत्पादनही एकरी १० ते १२ क्विंटल येते.
खानदेशात सुमारे ४१ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी, संकरित ज्वारी व संशोधित दादर ज्वारी वाणांची पेरणी झाली आहे. तर मक्याची लागवड सुमारे ३७ हजार हेक्टरवर झाली आहे. मागील तीन वर्षे मका लागवड कमी झाली आहे. २०२१ मध्ये खानदेशात मक्याची लागवड सुमारे ४२ हजार हेक्टरवर झाली होती.
यापूर्वीदेखील मक्याचे क्षेत्र ४२ हजार हेक्टरपेक्षा अधिक असायचे. परंतु मका पिकाचा वाढता खर्च, लष्करी अळीची समस्या व कमी दर यामुळे शेतकऱ्यांनी इतर पिकांचे पर्याय शोधले. त्यात दादर व संकरित ज्वारीचे दर मागील दोन वर्षे टिकून राहील्याने ज्वारी पेरणीस पसंती दिली आहे.
कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी खानदेशात जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर या भागात अधिक आहे. तसेच नंदुरबारातील शहादा व धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही दादर ज्वारी पीक आहे.
संकरित ज्वारीही जोमात
विविध कंपन्यांच्या संकरित ज्वारीची पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आहे. संकरित ज्वारी पिकही जोमात आहे. काही शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून संशोधित दादर ज्वारी वाणांची पेरणी केली आहे. या पिकास मागील ३० ते ४० दिवसात दोन वेळेस सिंचन झाले आहे. काळ्या कसदार जमिनीसह मध्यम जमिनीतही पीक जोमात आहे.
उशिरा पेरणीही सुरूच
खानदेशात दादर ज्वारीची पेरणी उशिरादेखील झाली आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेकांनी ज्वारीची पेरणी केली आहे. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना त्यासंबंधी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
यातच काही ज्वारी वाणांचा तुटवडादेखील खानदेशात यंदा होता. उशिरा पेरणीच्या ज्वारीस एक वेळेस पाणी देण्यात आले आहे. त्यातही वाढ चांगली आहे. निकोप वाढीसाठी शेतकरी निरभ्र वातावरणाची अपेक्षा करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.