Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Advisory : गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता व सध्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता कमी आहे. आभाळ कोरडे राहून, दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
Grape Farm
Grape FarmAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape Crop : गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता व सध्याच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता कमी आहे. आभाळ कोरडे राहून, दिवसाच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हे वातावरण वेलीच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत पोषक ठरेल. मात्र काही स्थितीमध्ये सकाळी दव पडण्याची शक्यता जास्त असेल. त्यामुळे बागेत काही अडचणी वाढू शकतात. या समस्यांचा विचार करता पुढील आठवड्यातील कामाचे नियोजन असे असावे.

१) कलम केलेली बाग ः
खुंटावर नुकत्याच कलम केलेल्या बागेत या वेळी काही ठिकाणी नुकतेच डोळे फुटायला सुरुवात झाली असेल. काही ठिकाणी आठ - नऊ पानांची अवस्था असेल. दिवसाचे वाढलेले तापमान व त्या सोबत वाढत असलेल्या आर्द्रतेचा विचार करता फुटींचा वाढ जोमात होईल. परंतु सायनकाडीवरील डोळे फक्त फुटतील असे नाही, तर कलमजोडाच्या खाली असलेले खुंटावरील डोळेही तितक्या जोमाने फुटताना दिसून येतील.

कलमजोडात कॅलस तयार झाल्याच्या स्थितीमध्ये रसनिर्मिती व त्याचे वहनसुद्धा चांगले होईल. याचाच अर्थ कलमजोड मजबूत झालेल्या परिस्थितीत सायनकाडीवरील फुटी जोमात वाढतील, तर कलमजोडाखालील फुटींच्या वाढीचा वेग कमी असेल. नुकतेच कलम केलेल्या बागेतील परिस्थिती वेगळी असेल. या ठिकाणी सायनकाडीवरील डोळा हळू फुटेल, तर त्यापेक्षा खुंटकाडीवरील डोळे अधिक जोमाने फुटताना दिसतील.

खुंटकाडीवरील या फुटी जर आपण काढल्या नाहीत, तर वरचे सायनकाडीवरील डोळे सुप्तावस्थेत राहतील. खालील डोळे जोमाने वाढतील. अशा स्थितीत कलम अयशस्वी होण्याची शक्यता अधिक असेल. तेव्हा वेळीच खुंटकाडीवरील सकर्स काढून घ्याव्यात.
बागेतील दिवसाचे तापमान जास्त असल्यामुळे आर्द्रता थोडीफार कमी असेल.

ही परिस्थिती डाऊनी मिल्ड्यू या रोगासाठी पोषक नाही, मात्र रात्रीचे कमी झालेले तापमान आणि वाढलेली आर्द्रता, सकाळी पडत असलेले दव या गोष्टीचा विचार करता डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असेल. खुंटावर कलम करतेवेळी आपण एक कलम यशस्वी होण्यासाठी दोन किंवा तीन काड्यांवर कलम करतो. प्रत्येक वापरलेली सायनकाडी ही दोन डोळ्यांची असते. म्हणजेच या ठिकाणी चार ते सहा फुटी निघालेल्या असतील.

कलम केल्यानंतर या तीनही काड्या एकाच बांबूला सुतळीने बांधलेल्या असतील. म्हणजेच एकाच ठिकाणी या फुटींची गर्दी निर्माण झाली. परिणामी जमिनीवर असलेल्या डाऊनी मिल्ड्यूचे बिजाणू या कार्यरत होतील. बऱ्याच स्थितीमध्ये डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावामुळे कलमजोडाच्या जवळ काळे डाग पडलेले दिसून येतात. डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव इतका जास्त असतो की कलम अयशस्वी होते. या करिता महत्त्वाच्या उपाययोजना पुढील प्रमाणे -

Grape Farm
Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

- कलमरोपाच्या भोवती दोन फूट अंतरापर्यंत गवत काढून जागा मोकळी ठेवावी. यामुळे आर्द्रता कमी राहील व रोग नियंत्रण सोपे हईल.
- सकर्स वेळीच काढून घ्यावेत.
- यशस्वी झालेले सशक्त व जोमदार असे एक कलम निवडून बांबूला बांधून घ्यावे. इतर कलम बांबूपासून वेगळे करावे. व तीन ते चार डोळ्यावर खुडून घ्यावे.
- बांबूला बांधलेल्या फुटीवरील तळातील तीन ते चार पाने काढून घ्यावीत.
- आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी वेळोवेळी करावी. रोगग्रस्त बागेत कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- सकाळी दवामुळे पाने ओली असल्यास फवारणीऐवजी मॅन्कोझेबची डस्टिंग करणे फायद्याचे राहील.

Grape Farm
Grape Advisory : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

२) छाटणी झालेली बाग ः
ज्या बागेत घड प्रीब्लूम अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी घडाच्या विकासासाठी वातावरणाचा चांगला फायदा होईल. मात्र अधिक चांगले परिणाम मिळण्यासाठी पाण्याचा सामू ६.५ ते ६.७५ असावा. तसेच फवारणीसाठी वापरणाऱ्या जीए संजीवकांच्या द्रावणाचा सामूही ५.५ ते ६ राहील, याची काळजी घ्यावी. याकरिता युरिया फॉस्फेट १ ग्रॅम किंवा सायट्रिक ॲसिड अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे वापर करता येईल. घडाच्या पोपटी रंगाच्या अवस्थेत अशा प्रकारच्या जीए ३ च्या द्रावणाची १० पीपीएम या प्रमाणात पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ पीपीएम या प्रमाणे पाच दिवसांनी करून घ्यावी.

जीएची फवारणी शक्यतो सायंकाळच्या वेळी करावी, या वेळी बागेतील आर्द्रता ५० टक्क्यांच्या पुढे असावी. पानांची द्रावण शोषण्याची क्षमताही अधिक असेल. जीएच्या वापरामुळे प्रीब्लूम अवस्थेतील घडामध्ये पेशींची संख्या वाढून पेशींचा आकारही वाढतो. त्यामुळे दोन पाकळ्यातील अंतर व पाकळीची लांबी वाढण्यास मदत होते.

प्रीब्लूम अवस्थेच्या पू्र्वीच्या बागेमध्ये फुटींची विरळणी करण्यावर भर द्यावा. फळछाटणीनंतर एका काडीवर चार ते पाच डोळ्यांना हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले गेले असेल. त्यामुळे हा प्रत्येक डोळा फुटून घडाच्या पुढे पाच ते सहा पाने असतील. या परिस्थितीत दाट कॅनॉपी तयार होणे शक्य आहे. या वेळी वातावरण पोषक असले तरी सकाळचे वाढलेले दव घडकुज किंवा डाऊनी मिल्ड्यूच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरू शकते.

अशा ठिकाणी कदाचित पाऊस झाल्यास घडावर पडलेला पाण्याचा एक थेंबही तो घड कुजविण्यास जबाबदार ठरू शकतो. अशा परिस्थितीत वेलीमधील नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजनचे प्रमाण वाढून पानांची लवचिकता वाढेल. त्यामुळे ते पान रोगांसाठी संवेदनशील होईल. ही परिस्थिती टाळण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील.
- फेलफुटी त्वरित काढाव्यात. (१४ ते १७ दिवसांच्या कालावधीत.)
- वेलीवर कॉपरयुक्त बुरशीनाशकाची दीड ते दोन ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी.
- वेल सशक्त करण्याच्या दृष्टीने पोटॅश एक ते दीड ग्रॅम या प्रमाणे फवारणी करावी.
- झिंक आणि बोरॉन यांची अर्धा ग्रॅम प्रत्येकी प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

३) घडाची विरळणी करणे ः
द्राक्ष बागेमध्ये उद्देशानुसार घडांची संख्या राखून इतर घड काढून घ्यावेत. घडांची विरळणी मणी सेटिंग पूर्वी केल्यास सोर्स सिंक संबंध व्यवस्थितरीत्या प्रस्थापित होतो. घडाच्या विकासात मदत होते. स्थानिक बाजारपेठेकरिता घेतल्या जाणाऱ्या बागेमध्ये प्रति वर्गफूट क्षेत्रफळासाठी पाऊण ते एक घड पुरेसा असेल.

तर निर्यातीसाठीच्या बागेमध्ये प्रति दीड वर्गफुट क्षेत्रासाठी एक घड असे नियोजन असावे. बेदाणा निर्मितीसाठी प्रति वर्गफूट दीड ते दोन द्राक्ष घड राखून इतर घड काढून घ्यावेत. घडाची विरळणी करतेवेळी एकसारख्या आकाराचे घड राखावेत. घडाच्या विरळणीसोबतच मण्याची विरळणीही तितकीच महत्त्वाची असेल. जितका जास्त मण्याचा आकार, तितकी घडातील मण्याची संख्या कमी असावी. उदा. नानासाहेब पर्पल या जातीच्या घडात ७० ते ७५ मणी असावेत. तर रेड ग्लोबमध्ये ६० ते ६५ मणी पुरेसे होतील. तुलनेमध्ये थॉम्पसन सीडलेसमध्ये १०० ते ११० मणी ठेवता येतील.


डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com