Tur Cultivation : गादीवाफ्यावरील तूर लागवड ठरली फायदेशीर

Tur Farming : अचलपूर तालुक्‍यातील काकडा येथे बोंडे कुटुंबीयांची ३० एकर शेती आहे. त्यातील आठ एकरांवर संत्र्याची १२०० झाडे आहेत. याशिवाय दीड एकर हळद, अडीच एकर आले लागवड, दहा एकरांवर कपाशीची लागवड ते करतात.
Tur Cultivation
Tur CultivationAgrowon

Farmer Management : शेतकरी नियोजन

पीक : तूर

शेतकरी : अमोल राजेंद्र बोंडे

गाव : काकडा, ता. अचलपूर, जि. अमरावती

तूर अधिक सोयाबीन : आठ एकर

अचलपूर तालुक्‍यातील काकडा येथे बोंडे कुटुंबीयांची ३० एकर शेती आहे. त्यातील आठ एकरांवर संत्र्याची १२०० झाडे आहेत. याशिवाय दीड एकर हळद, अडीच एकर आले लागवड, दहा एकरांवर कपाशीची लागवड ते करतात. त्यानंतर उर्वरित क्षेत्रात तूर-सोयाबीन यांचे आंतरपीक घेतले जाते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमोल यांनी वीज कंपनीत कंत्राटी म्हणून नोकरी केली. परंतु शेतीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच २०१२ मध्ये राजीनामा देऊन पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अमोल बोंडे यांनी शेतीत प्रयोगशीलतेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. पीक लागवड अंतर कमी जास्त करण्यासोबतच गादीवाफ्यावर लागवड करून त्यातील कोणती पद्धत फायदेशीर ठरेल, याचा अभ्यास केला. त्यातूनच मागील ५ वर्षांपासून गादीवाफ्यावर तूर लागवड करत उत्पादकता वाढीचा उद्देश साधला आहे.

Tur Cultivation
Tur Rate : यवतमाळमध्ये तुरीला कमाल १२ हजार ३०० रुपये दर

शेणखतातून राखला जमिनीचा पोत

जमिनीचा पोत टिकून राहावा याकरिता एकरी चार ट्रॉली शेणखताचा वापर शेतामध्ये केला जातो. मात्र सरसकट शेणखत न देता त्यावर प्रक्रिया करून ते कुजविले जाते. त्याकरिता पाच ते सहा फूट खोलीचा खड्डा काढून त्यात शेणखत टाकले जाते. या खड्ड्यात पावसाळ्यातील पाणी सोडले जाते. या माध्यमातून शेणखत कुजविले जाते. खड्ड्यामध्ये मे महिन्यात शेणखत टाकल्यानंतर त्याचा पुढील वर्षी एप्रिल महिन्यात शेतामध्ये वापर केला जातो.

‘बेडमेकर’चा वापर

तूर आणि सोयाबीन यांची आंतरपीक लागवड केली जाते. लागवडीसाठी गादीवाफे तयार करण्यासाठी बेडमेकरचा उपयोग केला जातो. अमोल यांच्या मते माती पोकळ असल्यामुळे गादीवाफा एक फूट उंच असल्यास झाडाची मुळे अशा पोकळ (भुसभुशीत) मातीत राहतात. परिणामी, पाऊस कमी झाल्यास ओलावा कमी पडतो. तसेच जास्त पावसाच्या कालावधीत झाडे जमिनीकडे झुकतात. याकरिता गादीवाफ्याचा वरचा भाग वखराच्या साहाय्याने सपाट करून सहा इंच इतका उंच ठेवला जातो. दोन गादीवाफ्यांमधील अंतर साडेचार फूट ठेवले जाते. एका गादीवाफ्यावर एक फूट अंतरात दोन तास तूर आणि दुसऱ्या गादीवाफ्यावर याच पद्धतीने सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन आणि तुरीच्या आंतरपिकाचा पॅटर्न असल्याने तूर ते तूर अशा गादीवाफ्यांमध्ये आठ फूट अंतर राहते.

Tur Cultivation
Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

जपली प्रयोगशीलता

ठिबक, पाटपाणी तसेच पावसाच्या पाण्यावर नेमकी किती उत्पादकता मिळते, याचा देखील अभ्यास अमोल यांनी सातत्याने केला आहे. पाटपाणी दिलेले पीक फूल आणि शेंगावर येण्यास विलंब होतो. याउलट ठिबकमुळे चांगली उत्पादकता मिळते. पावसाच्या पाण्यावर घेतलेल्या पिकात मॉन्सूनोत्तर पावसाच्या काळात नुकसान सोसावे लागत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

शेंडे खुडणीचा ‘पॅटर्न’

शेतकरी पहिली शेंडा खुडणी पीक ३० ते ३५ दिवसांचे असताना तर दुसरी खुडणी ६० ते ७० दिवसांचे असताना करतात. अमोल यांनी मात्र शेंडा खुडणीकरिता उंचीचा पॅटर्न अवलंबिला आहे. पिकाची उंची एक फूट असताना पहिली तर दुसरी खुडणी उंची अडीच फूट असताना केली जाते. या माध्यमातून झाडावरील फांद्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

खत नियोजन

खतांचा बेसल डोस पहिली शेंडा खुडणी झाल्यावर देतो. त्यामध्ये एकरी अर्धा बॅग डीएपी, चार किलो ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, मायक्रोरायझा या घटकांचा समावेश असतो. त्यानंतर दुसरी शेंडा खुडणी झाल्यावर २०ः२०ः०ः१३, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची मात्रा दिली जाते.

...अशी मिळाली उत्पादकता

गादीवाफ्यावरील लागवडीचा पॅटर्न अंगीकारणाऱ्या बोंडे यांनी पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उत्पादकतेत वाढ मिळविली आहे. कोरडवाहू लागवडीतून एकरी ३ ते ६ क्विंटल उत्पादकता मिळत होती. सध्या गादीवाफ्यावरील लागवडीतून सरासरी ८ क्‍विंटल उत्पादन मिळते आहे. ओलिताची सोय असल्यास, उत्पादकता १४ क्‍विंटलपर्यंत मिळू शकते, असा दावा अमोल बोंडे यांनी केला आहे.

अमोल बोंडे ९४२३३७०८७३

(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com