Jalgaon News : खानदेशात आगाप कांदेबाग केळीची लागवड सुरू झाली आहे. यंदा कांदेबाग हंगामातील केळीची लागवड काहीशी वाढेल, असेही संकेत आहेत. कांदेबाग केळीची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. यात आगाप लागवड ऑगस्टमध्ये तर उशिराची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते.
ही केळी श्रावणमास, गणोशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणउत्सवाच्या कालावधीत काढणीवर असते. कांदेबाग हंगामातील केळीस मागील दोन वर्षे किंवा कोविडनंतर चांगले दर मिळत आहेत.
शिवाय या केळीवर करपा रोगाची समस्या कमी असते. फक्ट केळी घडांवरील पिटिंग, काळे डाग व अन्य समस्या येतात. यामुळे कांदेबाग हंगामातील केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक असते. तर धुळ्यातील शिरपुरातही ही लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी १२ ते १३ हजार हेक्टरवर कांदेबाग केळी पीक असते. तर धुळ्यातही सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड केली जाते.
जळगावात सर्वाधिक चोपडा तालुक्यात कांदेबाग केळी असते. त्यापाठोपाठ जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, यावल या भागात कांदेबाग केळीची लागवड केली जाते. अलीकडे मुक्ताईनगर, रावेर या भागातही कांदेबाग केळीची लागवड होत आहे. या भागात आगाप लागवड अधिकची असते. या भागातील कांदेबाग किंवा आगाप कांदेबाग केळीखालील क्षेत्रही तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक झाले आहे.
कांदेबाग केळी लागवडीची तयारी या आठवड्यात गतीने झाली आहे. पावसाची उघडीप असल्याने अनेकांनी पूर्वमशागत व अन्य कार्यवाही करून घेतली. कांदेबाग केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग अधिक केला जातो. तसेच रोपांचाही वापर वाढला आहे. केळी कंदांमध्ये वसई, ग्रॅण्ड नैन, आंबेमोहोर, महालक्ष्मी आदी वाणांना शेतकरी पसंती देतात.
सध्या काढणी पूर्ण झालेल्या केळी बागांतील कंदांची विक्री या लागवडीसाठी सुरू आहे. चोपडा, जळगाव, जामनेर भागात सप्टेंबरच्या मध्यानंतर कांदेबाग केळी लागवड सुरू होईल, असे चित्र आहे. कारण अनेक शेतकऱ्ंयांनी केळीसाठी नियोजीत क्षेत्रात मूग, उडीद, धैंचाची लागवड केली आहे.
पीक फेरपालट व जमीन सुपीकता यासाठी ही लागवड केळी उत्पादक करतात. ही पिके जमिनीत गाडल्यानंतर त्यात केळीची लागवड करण्याचा प्रघातही अनेक भादात आहे. मूग, उडीद यांची कापणी, काढणी अद्याप सुरू झालेली नाही. किमान २० ते २५ दिवसांत ही काढणी, कापणी पूर्ण होईल. यामुळे अनेकांची कांदेबाग केळी लागवड सप्टेंबरच्या मध्यानंतर सुरू होईल, असे दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.