
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या ऊस गाळप हंगामात जालना बीड व छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील कारखान्यांची सरासरी दैनिक गाळप क्षमता ९३ हजार ६५ टन आहे. त्या तुलनेत कारखाने सरासरी ७७,८०९ प्रतिदिन क्षमतेने उसाचे गाळप करत आहेत. म्हणजे गाळप क्षमतेच्या तुलनेत कारखाने कमी गतीनेच ऊस गाळप करीत असल्याची स्थिती आहे.
यंदाच्या उस गाळप हंगामात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६, जालन्यातील चार, बीडमधील सात, जळगावमधील एक व नंदुरबारमधील दोन मिळून २० कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये १२ सहकारी तर ८ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. १२ सहकारी साखर कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता सरासरी ४४,१५० टन असताना १२ जानेवारीला प्रत्यक्षात कारखाने सरासरी ४१,९२५ टन क्षमतेने ऊस गाळप करत होते. दुसरीकडे आठ खासगी कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता सरासरी ४९,५०० टन असताना प्रत्यक्षात हे कारखाने ३५,८८४ टन क्षमतेने ऊस गाळप करीत होते. पाचही जिल्ह्यांपैकी केवळ जालना जिल्ह्यातील चार कारखान्यांची सरासरी गाळप क्षमता १७ हजार टन प्रतिदिन असताना ते प्रत्यक्षात २२ हजार ३६ टन क्षमतेने ऊस गाळप करत होते.
४१ लाख ४१ हजार टन उसाचे गाळप
मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २० कारखान्यांनी मिळून १२ जानेवारी अखेरपर्यंत ४१ लाख ४१ हजार ९७६ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ७.३३ टक्के साखर उताऱ्याने ३० लाख ३५ हजार ४७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जिल्हानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन
नंदुरबार : जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ४ लाख १९ हजार १२० टन उसाचे गाळप करत सरासरी ५.७७ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ७६ हजार ४३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जळगाव ः जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याने ७०,७५२ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.१७ टक्के साखर उताऱ्याने ६४,८७५ क्विंटल साखर उत्पादन केले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तीन सहकारी व तीन खासगी मिळून सहा कारखान्यांनी ८ लाख ६७ हजार ७५९ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.३१ टक्के साखर उताऱ्याने ८ लाख ७ हजार ७६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
जालना : जिल्ह्यातील २ सहकारी व २ खासगी मिळून चार कारखान्यांनी ९ लाख ८७ हजार ३२० टन उसाचे गाळप करत सरासरी ७.८५ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख ७५ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
बीड : जिल्ह्यातील ५ सहकारी व २ खासगी मिळून ७ कारखान्यांनी १७ लाख ३६ हजार ९९५ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.४ टक्के साखर उताऱ्याने ११ लाख ११ हजार ३६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.