Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यात ठिबक, तुषार संचाचे कोट्यवधींचे अनुदान रखडले आहे. एकट्या बुलडाण्याचे सुमारे ५० कोटींपेक्षा, तर अकोल्यातही साडेतीन कोटींवर अनुदान कधी मिळेल, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. हा निधी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांचा आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. या राजकीय रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणाकडे फारसा वेळ नाही आहे. अकोला, बुलडाणा जिल्ह्यांतील हजारो ठिबक, तुषार संचाचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत लटकलेले आहेत.
पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेसह इतर काही योजनांतून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, यासाठी ठिबक, तुषार संचासाठी प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते. या अनुदानात केंद्राचा ६०, तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा राहतो.
बुलडाणा जिल्ह्यात या सूक्ष्म सिंचनाचे सुमारे १५ हजार प्रस्ताव अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी सुमारे ५६ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. गेले वर्षभर निधीच आलेला नव्हता. किमान या मार्च अखेर आधी निधी मिळेल व रखडलेले प्रस्ताव मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती.
सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना अनुदान नसल्याची सर्वाधिक झळ झेलावी लागत आहे. जिल्ह्याच्या वाट्याला ७ कोटी रुपये आले आहेत. हा निधी या आठवड्यात कदाचित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केला जाऊ शकतो.
अकोल्यात तुषार, ठिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे या उद्देशाने मार्च महिन्यात शासनाकडे ३.८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. २०२३ -२४ या आर्थिक वर्षातील सुमारे २३०० पेक्षा अधिक प्रस्ताव निधीअभावी पडून आहेत.
शेतकऱ्यांसह वितरक अडचणीत
सूक्ष्म सिंचन साहित्य घेतलेल्या सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना अनुदानाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. साहित्य खरेदी केलेले शेतकरी तसेच वितरकही यामुळे अडचणीत आले आहेत. यासह साहित्य विक्री करणाऱ्या कंपन्यांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झळ सहन करावी लागत आहे. निधी न आल्याने अनेक कंपन्यांना मार्चअखेर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.