Sangli News : सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये सतत पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या शेतीला फटका बसला आहे. यामुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या चार तालुक्यांतील ११६ गावांतील अंदाजे ८ हजार ५५६ हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळ असे पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
सांगली जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली.
तसेच इतर तालुक्यांत संततधार पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले. अतिवृष्टी आणि पुराचा फटका मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस या तालुक्यांतील वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या ११६ गावांना बसला. या पावसामुळे सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात, हळद आणि पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पूर आणि अतिवृष्टीमुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यांतील अंदाजे ११७ गावांतील २२ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या ८५५६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यातच शेतात चार ते पाच दिवस पुराचे आणि पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. बाधित पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय अतिवृष्टी, महापूर आणि सततच्या पावसामुळे नजर अंदाजे पिकाचे झालेले नुकसान
तालुका शेतकरी संख्या गावे एकूण
मिरज ७६८७ २३ ३२०३
वाळवा १६०६ २८ ५४६
शिराळा ९४३९ ३० २९१८
पलूस ४०२४ ३५ १८८९
एकूण २२७५६ ११६ ८८५६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.