Crops Flood Waters : दोन आठवडे पिकं महापुराच्या पाण्यात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालं

Sugarcane Farmers : वर्षभर राबून पिकवलेले ऊस पीक पावसाने वाया जाणार असल्याने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
Crops Flood Waters
Crops Flood Watersagrowon
Published on
Updated on

Sugarcane Crop : जुलै महिन्याच्या मध्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. १५ दिवस झाले नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊन नदीकाठच्या शेकडो एकरांतील पिके पाण्याखाली गेली. दोन आठवडे पिके पाण्याखाली राहिल्याने कुजण्याचा धोका निर्माण झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षभर राबून पिकवलेले ऊस पीक पावसाने वाया जाणार असल्याने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पुढील वर्षीचा आर्थिक ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होणार आहे.

साखरेचा गत हंगाम लवकर आटोपल्याने शेतकऱ्यांनी मार्चअखेर नवीन ऊसलागण केली. यामुळे लागणीचा ऊस आणि तुटलेले खोडवा पीक जोमात वाढण्यास मदत झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यातच ऊस पिकाची उंची आठ ते दहा फुटांपर्यंत वाढली. जोमाने वाढलेले ऊस पीक पाहता यावर्षी चांगले उत्पादन होऊन हातात चार पैसे शिल्लक राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात पडलेला पाऊस ऊस पिकासाठी पूरक होता. परंतु जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच धरणे तुडुंब भरली. जिल्ह्याच्या काही भागात झालेली अतिवृष्टी आणि प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात केलेला विसर्ग यामुळे जिल्ह्यावर महापुराचे संकट आले.

पूरस्थितीमुळे ऊस पीक तब्बल दहा दिवस पाण्याखाली गेले. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतरही अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने उसाच्या सरीत अजूनही पाणी साचून राहिले आहे. उभा ऊस पाण्यात बुडाल्याने उसाची पाने तांबडी झाली आहेत. शिवाय बहुतांश ऊस पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच जोरदार वाऱ्यामुळे उभे ऊसपीक उन्मळून पडले आहे.

मागील वर्षी महापुराची परिस्थिती उद्‍भवली नसली तरी मुसळधार पावसाने उसाची वाढ खुंटली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरभर रानात ट्रॉलीभरही ऊस जमला नव्हता. संपूर्ण गळीत हंगामच चार महिन्यांत गुंडाळल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे सेवा संस्थांकडून घेतलेली पीक कर्जे फेडता न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.

Crops Flood Waters
Kolhapur Ajara Crop Loss : गावात वानरांचा, तर शेतात गव्यांचा धुमाकूळ; पिकांचे नुकसान, शेतकरी हैराण

मात्र, यावर्षी उत्पादकांना ऊस पिकाकडून मोठ्या आशा होत्या. अपेक्षेप्रमाणे जूनअखेर जोमाने आलेले पीक, जुलैमधील महापुराने अक्षरशः भुईसपाट केले आहे. आठ ते दहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने आणि उसाच्या सरीत पाणी साचल्याने वाढ खुंटणार आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होणार असून, आगामी गळीत हंगामही अडचणीत येणार आहे. महापुराचे संकट सरले असले तरी पुढील काळ शेतकऱ्यांसाठी कठीण असणार आहे हे निश्चित.

गळीत हंगामही अडचणीत

जिल्ह्यात सुमारे एक ते दीड लाख हेक्टरवर ऊस पीक असून, बहुतांश ऊस नदीकाठच्या भागात आहे. महापुरावेळी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून शेजारच्या ऊसशेतीत शिरले होते. परिणामी नदीलगतच्या शेकडो एकरांतील ऊस पीक आठ ते दहा दिवस पाण्याखाली राहिले असून, ते कुजण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे उस उत्पादनात घट होणार असल्याने पुढील गळीत हंगाम अडचणीत येण्याची लक्षणे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com