EL Nino Update : ‘एल निनो’च्या सावटामुळे पीक नियोजनाची कसरत

Crop Management : अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ मोसमी पावसाला अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगितले जात आहे. ‘एल निनो’चं आगमन ऑगस्टमध्ये होईल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम हंगमाच्या शेवटी दिसून येईल, असा अंदाज आयएमडीने दिला.
Millet
Millet Agrowon

Indian Agriculture : दरवर्षी एव्हाना खरिपाच्या पेरण्या बऱ्यापैकी सुरू झालेल्या असतात. मात्र या वर्षी संपूर्ण हंगामाबाबत कमालीची अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. मार्च-एप्रिलपासून यंदा ‘एल निनो’ येणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार हे वारंवार सांगितले जात होते.

परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपले अनुमान जारी करताना यंदाच्या वर्षी एल निनो उद्‍भविणार असला, तरी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण सरासरी इतके राहील हे जवळपास ठासून सांगितले. त्याला आता १५ दिवस झाले आहेत. मॉन्सूनचं अधिकृत आगमन कधी होईल याविषयीचे अंदाज चुकताना दिसत आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ मोसमी पावसाला अडथळा निर्माण करीत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अमेरिकी संस्थेने नुकतेच एक अनुमान जाहीर केले. त्यानुसार एल निनो प्रशांत महासागराच्या पूर्व भागात अंदाजित वेळेच्या एक-दीड महिना आधी म्हणजे आताच उद्‍भविला असल्याचे खात्रीपूर्वक म्हटले आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार एल निनोचं आगमन ऑगस्टमध्ये होईल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम हंगमाच्या शेवटी दिसून येईल. परंतु अमेरिकी संस्थेच्या या नवीन अनुमानामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच एल निनो उद्‍भविणार असल्याने संपूर्ण हंगामातील पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाबद्दलच्या चिंता चांगल्याच वाढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाण्याची उपलब्धता, बाजारकल आणि नुकतेच घोषित झालेले हमीभाव या तीन घटकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यात खरीप हंगामातील पीक नियोजन करणे योग्य ठरेल. तसेच शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील.

Millet
El Nino Impact on Commodity : अल निनोचा शेतीमाल बाजारावर काय परिणाम होईल?

पीक नियोजनाची कसरत

मागील हंगामात सोयाबीन आणि कापूस यांचे साठे जवळपास संपूर्ण हंगामभर जवळ बाळगलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या पिकांचे बाजारभाव अपेक्षेपेक्षा खूपच खाली राहिले. हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाव वाढण्याची आशा विविध कारणांमुळे फोल ठरली.

तसेच पुढील हंगामात या दोन कमोडिटीजमध्ये जागतिक बाजारात मंदीची चाहूल लागल्याने या पिकांवरून शेतकऱ्यांचे मन उडाले असल्याचे दिसून येत आहे.

परंतु प्रत्येक हंगाम हा वेगळा असतो. तसेच राज्यात सोयाबीन, कापूस आणि तूर यांना पर्यायी नगदी पीक नसल्यामुळे या तीन पिकांमध्येच क्षेत्र विभागावे लागेल. त्यातही मागील अनेक वर्षांचा कल पाहता सुमारे ८० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीन पेरले जाते. त्यात सोयाबीन आणि कापसाचे प्रमाण कधी ४८-५२ टक्के, तर कधी ५२-४८ टक्के असेच राहिले आहे.

बाजार कल आणि हमीभावातील वाढीचा विचार करता ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी सोयाबीनखालील काही क्षेत्र तुरीकडे वळवणे योग्य राहील. जागतिक बाजारात सोयाबीनचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यामुळे तुलनेने त्यात तेजी येण्याची शक्यता कमीच.

तसेच ४,६०० रुपयांचा हमीभाव असला, तरी किमती त्याखाली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र तुरीचे उत्पादन सलग दुसऱ्या हंगामात प्रतिकूल हवामानामुळे कमी राहील आणि किमती मजबूत राहतील, असे सध्याचे चित्र आहे. तुरीच्या क्षेत्रात या वर्षी सर्वत्रच वाढ होणार असली, तरी उत्पादकतेचा विचार करता क्षेत्रवाढीच्या प्रमाणात उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता धूसर आहे.

कापसाचे क्षेत्र मात्र मागील वर्षाइतकेच ठेवणे योग्य ठरेल. वस्त्रोद्योग ही अशी गोष्ट आहे, की अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ लागली की या क्षेत्रात मागणी वाढू लागते. या क्षेत्रातील कंपन्यांची भांडवल बाजारात अलीकडील काळातील अनुमाने पाहता ऑक्टोबरनंतर या क्षेत्रात मागणी वाढू लागेल, असे म्हटले जात आहे.

अमेरिकन व्याजदरवाढ ही कमोडिटी मार्केटला मारक ठरलेली ब्याद परत येऊ घातली असली, तरी ते शेपटाचे वळवळणे असावे आणि त्याचा शेवट जवळ आला आहे. त्यामुळे मागणीमधील वाढ कदाचित ऑक्टोबरऐवजी डिसेंबरपासून दिसून येईल. आपल्याकडील कापसाची आवक याच काळात होत असल्यामुळे किमतीत सुधारणेचा फायदा उत्पादकांना होऊ शकेल.

मूग, उडदाला फायदा

एल निनोमुळे पावसात येणाऱ्या तुटीचा विचार करता छोट्या अवधीत येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे इष्ट ठरेल. यामध्ये मूग आणि उडीद हीच प्रमुख पिके आहेत. देशात कडधान्यांची टंचाई असल्यामुळे या कमोडिटीजना कायम बरा भाव मिळेलच.

परंतु या पिकांचे पेरणी आणि काढणी वेळापत्रक पाहता पीक नुकसानीचा धोका या वर्षी खूप कमी राहण्याची शक्यता दिसते. साधारणपणे या महिन्याच्या अखेरीस ते जुलै पहिला आठवडा या काळात पेरणी केल्यास या पिकांची काढणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर सुरू होईल.

मागील सलग तीन वर्षे सप्टेंबरमध्ये अतिपावसाने या पिकांचे नुकसान झाले होते. या वर्षी मात्र एल निनोमुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी राहील, असे अनुमान आहे. ते खरे ठरले तर मूग आणि उदीड काढणी व्यवस्थित पार पडेल.

Millet
EL Nino Effect : आधीच उल्हास त्यात एल-निनोचा फास...

हळद हेजिंग फायदेशीर

दिनांक १५ मे रोजी या स्तंभातून हळद बाजारात अचानक आलेली तेजी आणि त्यातून हळद उत्पादक शेतकरी व उत्पादक कंपन्या यांच्यासाठी निर्माण झालेली संधी याबाबत लेख लिहिला होता. त्यामध्ये असा सल्ला दिला होता, की हळदीचे जून महिन्याचे वायदे ८,१०० रुपये क्विंटल या पातळीवर विकून टाकावेत.

प्रत्यक्षात आठवड्याच्या सुरुवातीलाच या वायद्यांमध्ये ८,४०० ते ८,५०० या कक्षेत सौदे झाल्याने हळद सोन्याहून पिवळी झाली, असे म्हणावे लागेल. एक-दोन महिन्यांच्या दृष्टीने ही संधी समजून शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांसाठी या भावात हळद विकून आपले जोखीम व्यवस्थापन करण्याची संधी लेखात म्हटल्याप्रमाणे बाजाराने दिली.

त्यानंतर जून वायदे १३ जून पूर्वी ६,७००-६८०० पर्यंत घसरल्यास आपले विक्रीचे सौदे पुन्हा खरेदी करून विक्री आणि खरेदी किमतीतील फरकरूपाने फायदा पदरात पडून घ्यावा, असेही म्हटले होते. जून वायदा मागील काही दिवसांत ७,५०० रुपयांच्या आसपास घुटमळत आहे.

त्यामुळे ६,७०० रुपयांची वाट न पाहता या किमतील जरी आपला विक्री सौदा कापला तरी ८०० ते १,००० रुपये प्रति क्विंटल म्हणजे ५ टनांच्या प्रत्येक लॉट मागे ४० ते ५० हजार रुपयांचा नफा मिळेल.

ज्यांना अजूनही किंमत खाली जाईल असे वाटत असेल, त्यांनी जून सौदा कापताना ऑगस्ट महिन्याचे पुढील काँट्रॅक्ट ३०० रुपये अधिक किमतीत विकून अजून दोन महिने वाट पाहता येईल. जोखीम व्यवस्थापनाचे याहून चांगले उदाहरण अलीकडच्या काळात पाहण्यात आलेले नाही.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com