Crop Damage : मुसळधारेने रात्रीतून होत्याचे नव्हते केले

Heavy Rain Crop Loss : बोरगव्हाण शेजारील झरी येथील लघू सिंचन तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला. सांडवण्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडल्यामुळे झरी तलाव नाल्याला मोठा पूर आला.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदा लई मन लावून शेती केली होती. कुणाचेही उसने, कर्जाऊ पैसे घेतले नाहीत. वाटलं यंदा सुगी चांगली होईल. चांगले दिवस येतील. पण नाल्याच्या पुरामुळे ऊस, सोयाबीन पिके हातची गेलीत. मातीचा सुपीक थर खरडून गेलेली जमीन पडीकच राहणार आहे. मुसळधार पावसाने एका रात्रीतून होत्याचे नव्हते केले. अशी व्यथा बोरगव्हाण (ता. पाथरी) येथील शेतकरी अशोक इंगळे यांनी मांडली.

परभणी जिल्ह्यातील पाथरी ते सेलू राष्ट्रीय महामार्गावरील पाथरी महसूल मंडलातील बोरगव्हाण हे प्रमुख ऊस उत्पादक गाव आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह फुले, भाजीपाला पिकांची शेती केली जाते. शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, रेशीम उद्योग आदी व्यवसायही अनेक शेतकरी करतात. सोमवारी (ता. २) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये पाथरी मंडलात ३१४.५ मिलिमीटर पाऊस झाला. बोरगव्हाण शेजारील झरी येथील लघू सिंचन तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाला.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे सव्वादोन लाख हेक्टर पिकांचे झाले नुकसान

सांडवण्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडल्यामुळे झरी तलाव नाल्याला मोठा पूर आला. नाला अरुंद असल्यामुळे धुरे- बांध फोडून पाण्याचा प्रवाह पिकांमध्ये पसरला. वेगाच्या प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक मातीचा थर वाहून गेला. खरडलेल्या ठिकाणी खडक उघडले पडले. मोठे खड्डे तयार झाले आहेत.

शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन, बोंडे लागलेली कपाशी, ऊस, तूर, मूग, उडीद आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गोठ्यामध्ये पाणी शिरल्याने शेळ्या तसेच कोंबड्या वाहून गेल्या आहेत. तुषार संच, पाइप, ठिबक संच, शेती अवजारे, आखाड्यावरील पत्रे वाहून गेले. शिवारातून १ ते २ किलोमीटर वाहणाऱ्या झरी तलाव नाल्याच्या पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

अशोक इंगळे म्हणाले, की आमची साडेसहा एकर जमीन आहे. आजवर कधी नाही परंतु खूप पाऊस पडला. शेतातील पुराच्या पाण्यात पिके बुडाल्याचे पाहिल्यानंतर चक्कर आली. उसाचे एकरी ७० टनांपर्यंत उत्पादन मिळाले असते. पिकांचे नुकसान पुढील हंगामात भरून काढता येईल. परंतु खरडून गेलेली जमीन सुपीक करणे लवकर शक्य नाही. सरकारने भरीव मदत करावी.

Crop Damage
Crop Damage : पीकविमा कंपनीकडे नुकसानीच्या १२ हजार तक्रारी

पूर ओसरल्यानंतर आखाड्यावर उडदाच्या शेंगा तोडत असलेले रामभाऊ इंगळे व रुख्मिणबाई इंगळे हे ज्येष्ठ शेतकरी दांपत्य म्हणाले, की पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे शेंगांतील उडदाला (सरक्या झाल्या) मोड फुटले आहेत. वळण फुटले. उसाच्या खोडवा सोयाबीनवर गाळ जमा झाला आहे.

कडबा वाहून गेला आहे. सरकारने बिघीन मदत करावी. प्रभाकर इंगळे यांचा नाल्याकाठी शेळ्यांचा मुक्तसंचार गोठा होता. त्याशेजारी कुक्कुटपालन होते. रात्री पुराचे पाणी गोठ्यात शिरले त्या वेळी त्यांचे वडील अडकून पडले होते. ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली. परंतु शेळ्या व पिले मिळून ४६ शेळ्या, गावरान जातीच्या साडेचारशेवर कोंबड्या, अडीचशेवर अंडी, कुक्कुटखाद्य, खताच्या १० पिशव्या, पाइप तसेच अन्य साहित्य वाहून गेले.

पाथरी ते सेलू राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविण्यात आली. पुलाजवळ नाला रुंदी जास्त आहे. त्यापुढील नाल्याचे पात्र अरुंद असल्यामुळे पुराचा प्रवाह शेतात पसरल्यामुळे पिकासोबत आखाड्यावरील गोठ्यामध्ये पाणी शिरल्यामुळे पशुधन वाहून गेले. नाला रुंदीकरण करण्याची लेखी मागणी करूनही त्याकडे सर्व संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्यावर संकट ओढावले आहे.
- प्रभाकर इंगळे, शेतकरी पशुपालक
नाल्याचा पूर गोठ्यात शिरल्यामुळे आमच्या ६० शेळ्या, तसेच ४०० कोंबड्या वाहून गेल्या. आखाड्यावरील तुषार २ संच पाइप वाहून गेले. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने तत्काळ आर्थिक मदत केली तर या संकटातून सावरण्यासाठी थोडे बळ मिळेल.
- भगवान खुडे, शेतकरी, पशुपालक
शेतातील बांधलेल्या घरामध्ये पाणी शिरले होते. गहू, डाळी यांसह अन्नधान्ये, तेलाची नासाडी झाली. शेतातील टोमॅटो, वांगे, मिरची, भेंडी आदी भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- दिगंबर उगले, शेतकरी
पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे सात एकरांवरील तूर, चारा पिके, झेंडू, झेनिया आदी फुलझाडांचे मोठे नुकसान झाले. जनरेटर वाहून गेले. निवाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना न केल्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे.
- रवींद्र गोरे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com