Climate Change : नेपाळी शेतीला महानद्यांची आच

वातावरण बदलाच्या (Climate Change) प्रभावाखाली असलेल्या नेपाळमधील शेतकऱ्यांमध्ये त्याविषयी जागरूकता नाही. मुसळधार पाऊस, (Heavy Rain) नद्यांच्या पुरात (Nepal Flood) शेते वाहून जात आहे. नेपाळी लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पराभव मान्य करण्यास सहसा तयार होत नाहीत. कोसी, गंडकी, आणि कर्नाली या महानद्यांची आच जाणवत असली, तरी हे शेतकरी म्हणतात, ‘‘देवाचे होते, ते देवाने नेले... आमचा काय अधिकार?’’
Nepal Agriculture
Nepal AgricultureAgrowon

हिमालयाची (Himalaya) सावलीतील नेपाळ देशाची उत्तर सीमा चीनव्याप्त तिबेटला (China Occupied Tibet ) जोडलेली आहे, तर दक्षिण, पूर्व आणि पश्‍चिमेला भारताची सीमा (Indian Border) आहे. तसेच हा देश सिलिगुडी कॉरीडॉरमार्गे बांगलादेशशी जोडला जातो, तर सिक्कीममार्गे भूतानशी जोडला जातो. ८०० किमी लांब आणि २०० किमी रुंदीच्या चिमुकल्या देशाची लोकसंख्या ३० लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. त्यातील जेमतेम २० टक्के क्षेत्र शेतीखाली असले, तरी एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.

नेपाळचे भौगोलिक पद्धतीने तीन भाग पडतात

१) हिमालयीन भाग जो १३ हजार ते २९ हजार उंचीवरचा आहे. हा बर्फाच्छादित प्रदेश आहे.

२) पहाडी क्षेत्र २६०० ते १३००० फूट उंचीवर आहे.

३) तराई क्षेत्र हा सपाट भाग असून, अनेक नद्यांमुळे हा शेतीसाठी अतिशय समृद्ध आहे. या भागात नद्यांचे खोरे आणि काही उंच टेकड्यासुद्धा पाहावयास मिळतात. हाच प्रदेश भारताशी जोडलेला असून, नेपाळची बहुतेक लोकसंख्या येथेच स्थिरावलेली आहे. वातावरण बदलाचे सर्व संकेत हिमालयीन भागात पाहण्यास मिळतात, तर त्याचे दुष्परिणाम तराई भागात अनुभवण्यास मिळतात. येथूनच म्हणूनच नेपाळमधील तरुणांचे भारताकडे सर्वांत जास्त स्थलांतर होते.

एकेकाळी नेपाळचे भाताचे कोठार असलेल्या या तराई क्षेत्र १९६६ पर्यंत या क्षेत्रात २.१ दशलक्ष टन भात पिकत होता. २०१५ -१६ पर्यंत वाढून ४.८ दशलक्ष टनापर्यंत पोहोचला. आता त्याचे उत्पादन ३ दशलक्ष टनांपर्यंत खाली आले आहे. याला मुख्य कारण ठरते वातावरण बदल, विशेषतः लांबलेला पाऊस आणि वाढलेले ढग फुटीचे प्रमाण. पारंपरिक भातशेतीमध्ये आधुनिक पद्धती पोहोचत आहेत.

भात लागवडीपासून ते काढणीपर्यंत पावसाची उत्तम साथ मिळते. मात्र कापणीच्या काळात कोसळणारा पाऊस शेतीस घातक ठरत आहे. एवढी मेहनत पिकविलेल्या शेतीतून उत्पादन हातात येण्यापूर्वीच पाऊस तोंडचा घास घेऊन जातो. ‘‘नकोच ती भातशेती’’ म्हणून शेतकरी भारताकडे स्थलांतरित होत आहेत. काही दिवसांपूर्वी मला आपल्या कोकणामध्ये मोठ्या फार्ममध्ये नोकरी करणारा नेपाळमधील (तराईचा) शेतकरी भेटला. त्याने गेल्या ५-६ वर्षांपूर्वीपासून बदलत गेलेल्या वातावरणामुळे लहान शेतकऱ्याचे कसे कंबरडेच मोडले आहे हे सांगितले. नेपाळमध्ये भाताबरोबरच मका, गहू, तृणधान्य, कॉफी, ऊस आणि तंबाखूची शेती होते. लांबलेल्या पावसामुळे गहू आणि तृणधान्याच्या उत्पादनावरही नकारात्मक परिणाम झाला आहे.

Nepal Agriculture
Climate Change : ऋतुचक्र बदलातील अनिश्चित शेती

‘यूएनडीपी’चा अहवाल

यूएनडीपीने (UNDP) केलेल्या येथील वातावरण बदलाच्या अभ्यासात नद्यांना अतिशय महत्त्व दिले गेले आहे. कारण नेपाळमध्ये तब्बल ६००० लहान- मोठ्या नद्या बारमाही वाहतात. त्यांच्या पाण्याखाली ४५ हजार कि.मी. एवढे क्षेत्र येते. त्यामुळेच हा भूप्रदेश पूर्वी बऱ्यापैकी ‘सुजलाम्’ होता. आज यातील अनेक नद्या थांबलेल्या आहेत, तर काही एवढ्या बेफाम वाहतात, की थांबायला तयार नाहीत. दुष्काळ, जंगलास लागणारे वणवे, नद्यांचे महापूर, हिमालयाचा बर्फ वितळणे आणि बदललेला मॉन्सून या पाच घटकांमुळे नेपाळची अवस्था बिकट झाली आहे.

Nepal Agriculture
Climate Change : सावध, ऐका पुढल्या हाका

अहवालातील महत्त्वाच्या बाबी

२०३० पर्यंत नेपाळमधील पाऊस ४० टक्के, तर तापमान १.४ अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.

यापुढे नेपाळधील थंडी कमी होणार असून, उष्ण दिवसांचे प्रमाण २०३० पर्यंत २० टक्के वाढतील. २०६० पर्यंत हेच प्रमाण ५५ टक्के, तर २०९० पर्यंत ७० टक्के होईल. म्हणजेच हिमालयाच्या थंड सावलीतील हे राष्ट्र वातावरण बदलामुळे उष्णतेच्या दिशेने प्रवास करू लागले आहे.

Nepal Agriculture
Climate change : हवामानबदलापेक्षा अस्मितेच्या मुद्द्यांना महत्त्व

नद्यांचे वाढते प्रवाह ठरत आहेत धोकादायक

या अहवालात कोसी, गंडकी म्हणजेच नारायणी आणि कर्नाली या तीन महानद्यांच्या उग्र प्रवाहाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांमुळे पूर वाढत आहेत. त्यांच्या उपनद्यांची अवस्थाही बिकट आहे. कोसी नदी तिबेटमधील बर्फाळ पठारावरून उगम पावते. तिला सात उपनद्या मिळतात म्हणून ‘सप्तकोशी’ म्हणतात. हीच नदी भारतात येऊन बिहारमध्ये गंगेला मिळते. वातावरण बदलाचे परिणाम नेपाळला आणि पुढे बिहारलाही भोगावे लागत आहेत.

गंडकी नदीलाही सात उपनद्या मिळत असल्यामुळे पुढे ती ‘सप्तगंडकी’ होते. पुढे ती भारतात येऊन गंगेला मिळते. कर्नाली नदी मानस सरोवराजवळ उगम पावून पुढे गंगेला मिळते. एकेकाळी तीन मुख्य नद्यांमुळे सुपीकता प्राप्त झालेल्या तराई- नेपाळसाठी त्याच चिंतेचा विषय ठरत आहेत. कारण विस्तारलेल्या पात्रासोबत नदीकाठची सुपीक शेतीच वाहून जाऊ लागली आहे. यावरही येथील शेतकऱ्यांना आपल्या परीने मार्ग काढला आहे. मोठमोठ्या नदी पात्रामध्येच ‘बेड’ तयार करून, त्यावर भाजीपाला उत्पादन घेऊ लागले आहेत.

तराई भागावरील पहाडी नेपाळ पूर्वी शांत होता. येथून वाहणाऱ्या त्रिशुळी आणि नारायणी या नद्या चितवनचे विशाल जंगल आणि पुराणामधील महाभारत रेंजमुळे शाश्‍वत वाहत होत्या. या भागात डोंगर उतारावर पायरी पद्धतीने थोडे सपाटीकरण करून शेतकरी मका, बांबू, केळी आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. कुटुंबास पुरेल एवढा भात, गहूसुद्धा पिकवला जातो. गेल्या दशकात या भागात मोठ्या प्रमाणात जंगल कापले गेले.

मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांच्या मार्गातील अडथळे गेल्यामुळे नद्या उग्र झाल्या. शेतकऱ्यांना शेती करणेच अवघड होऊन बसले. त्यातल्या त्यात पवित्र म्हणून रुद्राक्षाची झाडे वाचली होती. काही शेतकऱ्यांनी शेतीऐवजी रुद्राक्षाची फळे गोळा करून शिवमंदिरांच्या परिसरात विक्री सुरू केली. थोडेबहुत आर्थिक स्थैर्य मिळत असले तरी शेती कमी झाली आहे. बहुतांश शेतकरी रासायनिक घटकांचा वापर करत नाहीत. येथील प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक- दोन तरी लिचीची झाडे असतात. त्यापासून वार्षिक ४०-५० हजार रुपये सुटतात. तराई भागाप्रमाणेच येथेही दुग्ध व्यवसाय विकसित झाला आहे. महामार्गालगतच शेतकऱ्यांची स्वतःची दूग्ध उत्पादन विक्री केंद्रे दिसतात.

खळाळत वाहणाऱ्या त्रिभुळी नदीमध्ये राफ्टिंगसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. स्थानिक युवकांना त्यातून थोडाफार रोजगार मिळतो. अलीकडे नदीचा वेग वाढत्यामुळे या धंद्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पहाडीच्या वर हिमालय पर्वताच्या रांगा सुरू होतात. येथे शेतीचा अभाव असला असला तरी शेर्पा लोक घराजवळ थोडा भाजीपाला लावतात. जगामधील १० पैकी ८ उंच शिखरे याच भागात आहेत. कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी हे शेर्पा गिर्यारोहकांना मदत करतात.

ते म्हणतात, ‘‘ही शिखरे बर्फ वितळत असल्यामुळे ती काबीज करणे वरचेवर कठीण होत आहेत. २९ मे १९५३ माउंट एव्हरेस्टवर विजय मिळणाऱ्या न्यूझीलंडच्या एडमंड हिलरीसोबत शेर्पा तेनझिंगचे नावही मानाने घेतले जाते. हाही इथलाच शेतकरी. अनेक नैसर्गिक अडचणींवर मात करून जगामधील सर्वांत उंच माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या तेनझिंगची आठवण सर्व शेतकऱ्यांनी ठेवावी, असे मला वाटते. येथील अनेक लोक औषधी वनस्पती गोळा करून तिबेट, उत्तर प्रदेशात विक्री करतात. त्यासाठी नेहमी स्थलांतर सुरू असते. त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नेपाळमधील ९० टक्के लोकसंख्या फक्त २० टक्के जमीनच शेतीसाठी वापरते. त्यातही १५ टक्के तराई या सपाट प्रदेशात आहे. म्हणजेच तराई हे एका अर्थाने नेपाळचे ‘ब्रेड आणि बटर’ आहे मात्र हाच भूप्रदेश आज वातावरण बदलाच्या कचाट्यात सापडल्याने अडचणीत भर पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com