Nipun Bharat Mission : ‘निपुण’ भारतासाठीचा बनवा रोडमॅप

Nipun Bharat Mission Programme : केंद्र सरकारने ५ जुलै २०२१ रोजी ‘निपुण भारत मिशन’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. तीन ते नऊ वर्षांच्या मुलांसाठी त्यांच्या अध्ययन क्षमता विकसित होणे हे या मिशनचे मुख्य ध्येय आहे.
Nipun Bharat Mission
Nipun Bharat MissionAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या शिक्षणाचा पाया असतो. हा पाया भाषा व गणित या विषयांच्या मुळांवर उभा राहतो. भाषा ही जगण्याचे, विचार करण्याचे, स्वतःला व्यक्त करण्याचे, शिकण्याचे, ज्ञानार्जनाचे माध्यम असते. तर गणित म्हणजे विज्ञानाची, सर्व शास्त्रांची भाषा असते.

वाचण्याची, लिहिण्याची व संख्यांच्या मूलभूत क्रिया करण्याची क्षमता हा एक आवश्यक पाया आणि भविष्यातील सर्व शालेय शिक्षणासाठी आणि निरंतर अध्ययनासाठी एक पूर्वअट आहे. मात्र विविध सर्वेक्षणानुसार ३३ टक्के विद्यार्थ्यांनी मूलभूत साक्षरता व संख्यांच्या मूलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमता प्राप्त केलेल्या नाही. या क्षमतांचा विकासासाठी तर निपुण भारत अभियान आहे.

निपुण भारत

निपुण (NIPUN) म्हणजे ‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग ॲण्ड न्यूमरसी.’ तीन ते नऊ वर्षाच्या मुलांसाठी त्यांच्या अध्ययन क्षमता विकसित होण्यासाठी मूलभूत साक्षरता आणि अंकगणित या विषयाचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविणे हे या योजनेचे ध्येय आहे.

Nipun Bharat Mission
Soybean Crop Compensation : सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण

मुलांच्या मेंदूचा ८५ टक्के विकास वयाच्या सहा वर्षांपर्यंत होतो. त्यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० मध्ये ३ ते ६ या वयोगटातील शिक्षणाला देखील महत्त्व दिले आहे. प्रथमच पूर्व प्राथमिक शिक्षणाला औपचारिक मान्यता दिली. यासाठी अभ्यासक्रम आराखडा म्हणजे ‘अर्ली चाइल्डहूड केअर अँण्ड एज्युकेशन’ आराखडा तयार केला आहे.

यात अंगणवाड्या सक्षमीकरण करण्यास येणार आहेत. या अभ्यासक्रमात खेळावर, कृतीवर, जिज्ञासेवर आधारीत शिक्षण आहे. खेळातून सामाजिक, भावनिक, नैतिकतेचा विकास होतो. अंगणवाड्या ह्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे. त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध असतील, तर लहान मुले स्वच्छता, सांघिक कार्य आणि सहकार्य या गोष्टी सहज शिकतात. या शिक्षणातून प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा विकास होतो आणि मुले पहिलीत प्रवेशासाठी तयार होतात.

पूर्वप्राथमिक शिक्षणाचे एवढे महत्त्व असताना शासनाचे अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष आहे. राज्यातील २३ हजार अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही. अनेक अंगणवाड्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व मोकळे मैदान नाही. अंगणवाड्या केवळ पोषण आहारापुरत्या मर्यादित झाल्या आहेत. शिक्षण धोरणातील तरतुदीप्रमाणे या अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या. तिथे प्रशिक्षित शिक्षिका नेमाव्यात. निपुण भारत घडविण्याचा तो पाया आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण देण्यात जिल्हा परिषद शाळा मोठी भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांवर निपुण भारत घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. परंतु विविध सर्वेक्षणानुसार प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी भाषा आणि गणित विषयात कच्चे असल्याचे आढळून आले आहे. लिहिलेले वाचता येत नाही. बोललेले समजत नाही. ऐकलेले लिहिता येत नाही.

अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाच डळमळीत आहे. शिक्षण ही जग समजून घेण्याची, स्वतःला अर्थपूर्ण रीतीने अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया असेल तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकंदरीत शैक्षणिक यशापयशातही भाषा महत्त्वाची असते. म्हणून शैक्षणिक अपयश हे मूलतः भाषिक अपयश आहे, असे म्हटले जाते. गणित हा विषयही महत्त्वाचा आहे. गणितामुळे तर्कशुद्ध विचार करून समस्या निराकरण करण्याची क्षमता विकसित होते. म्हणूनच निपुण भारत अभियानात भाषा व गणितावर भर आहे.

अध्ययन स्तर घसरण्याची कारणे

प्राथमिक शाळेतील भाषा व गणित यांचा अध्ययन स्तर घसरण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाची काही कारणे शिक्षकांना मूळ अध्यापनाचे काम सोडून इतर शिक्षणपूरक साहित्यामध्ये जास्त लक्ष घालावे लागणे, विविध सर्वेक्षणे, माध्यान्ह भोजन, मतदान नोंदणी, आधार अपडेट, वेगवेगळे अॅप्स वापरणे, लिंक भरणे, शिष्यवृत्ती, प्रशिक्षणे, वारंवार होणाऱ्या परीक्षा, विद्यार्थी खाते उघडणे, शाळा, शिक्षक, विद्यार्थी माहिती वेगवेगळ्या पोर्टलला ऑनलाइन करणे, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुरूप नसलेले उपक्रम, शासकीय व्हॉट्सॲप वरून येणारे वारंवार आदेश, शिक्षणव्यवस्थेत माहितीचा, ऑनलाइनचा नुसता भडिमार सुरू आहे.

पर्यवेक्षकीय यंत्रणा ही केवळ माहिती गोळा करणारी यंत्रणा झाली आहे. एकामागून एक उपक्रम, आदेश सुरू असतात. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे काम करण्याचे सातत्य कमी होऊन मानसिक आरोग्य ढासळत आहे. याचा भाषा, गणित व अध्यापन कार्यावर परिणाम होत आहे. परिणामी शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे. शिक्षकांची अवस्था विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नारायण प्रमाणे झाली आहे. लग्न जमवण्यापासून ते नवरी सासरी जाईपर्यंत हा नारायण विविध जबाबदाऱ्या कशा पार पाडतो याचे विनोदी वर्णन या पुस्तकात आहे.

Nipun Bharat Mission
Drought Condition : अमरावतीतील ७८ मंडलांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर

‘‘नारायण, पानांचं तबक कुठे आहे?’’

‘‘नारायण, मंगळसूत्र केव्हा येणार?’’

‘‘नाऱ्या, लेका चहा पाठव वर’’

‘‘नारबा, पटकन तीन टांगे सांग.’’

‘‘नारुकाका, चड्डीची नाडी बांद ना...’’

अशाप्रकारे नारायण म्हणजे एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व. अशीच काहीशी अवस्था शिक्षकांची झाली आहे. नारायणप्रमाणे शिक्षक देखील एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व झालेय.

रोडमॅप बनवा

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच वरिष्ठांनी वर्षभर करावयाच्या कामाचा आराखडा तयार करावा. अध्यापन, परीक्षा, उपक्रम, माहिती भरणे याचे वेळापत्रक जाहीर करावे. शाळा सुरू होण्यापूर्वी किमान सहा दिवस शिक्षकांना भाषा व गणित विषयाचे दर्जेदार व ऑफलाइन प्रशिक्षण द्यावे. निपुण भारत अंतर्गत अपेक्षित उपक्रमांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी व्हावी.

उपक्रम हे प्राथमिक शाळेतील मुलांच्या वयोगटाशी सुसंगत असावे. भाषा आणि गणिताचा पाया पक्का झाला की मुले इतर विषयांत प्रगती करतात. वारंवार वेगवेगळे उपक्रम न राबवता महत्त्वाचे उपक्रम वर्षभर राबवावे. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य शासनस्तरावरून उपलब्ध करून द्यावेत.

माहिती अधिकारात मुख्याध्यापकांना वारंवार माहिती विचारली जाते ती यामुळे थांबेल. शिक्षकांच्या अध्यापन कार्यात सातत्य राहील असे नियोजन करावे. पर्यवेक्षकीय यंत्रणेने शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन करून प्रोत्साहन द्यावे. पायाभूत सुविधांची उपलब्धता करून द्यावी. शिक्षकांची रिक्त पदे, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील रिक्त पदे भरावी. सुयोग्य नियोजन करून शैक्षणिक गुणवत्तावाढीचा रोडमॅप बनवल्यास भारत नक्कीच ‘निपुण’ बनेल.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com