Cotton Disease : कपाशी पिकातील ‘दहिया रोग’

Gray Mildew Disease : आजच्या लेखात कपाशी पिकातील दहिया या रोगाची माहिती घेऊ. या रोगाला ‘ग्रे मिल्ड्यू’ असेही म्हणतात.
Cotton Disease
Cotton DiseaseAgrowon
Published on
Updated on

राहुल वडघुले

Cotton Crop Disease Management : कपाशी पिकामध्ये अनेक बुरशीजन्य, जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: फ्युजारिअम मर रोग, ॲन्थ्रॅकनोज, अल्टरनेरीया, टार्गेट स्पॉट, जीवाणूजन्य कोनिय करपा, दहिया, विषाणूजन्य मोझॅक रोग अशा महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव सर्वच भागात दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी रोगांची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वातावरणातील बदलानुसार शिफारशीत बुरशीनाशकांची एक फवारणी घेणे आवश्यक आहे. आजच्या लेखात कपाशी पिकातील दहिया या रोगाची माहिती घेऊ. या रोगाला ‘ग्रे मिल्ड्यू’ असेही म्हणतात.

लक्षणे

रोगाची लक्षणे प्रामुख्याने पाने, पाते आणि बोंडांवर दिसून येतो. सुरवातीला जमिनीलगतच्या व मधल्या भागातील पानांवर रोगाची लक्षणे दिसून येतात.

पीक जसे परिपक्व होण्यास सुरवात होईल, तेव्हा रोगाचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरवात होते.

या रोगामध्ये पानांवर लालसर ते जांभळ्या रंगाचे कोनीय ठिपके पडतात. हे ठिपके १ ते १० मिमी आकाराचे असतात. नंतर पानाच्या वरील बाजूने ठिपक्यांवर सरळ झालेली पांढरी वाढ दिसून येते. ही वाढ पानावर दही पडल्यासारखी दिसते, म्हणून या रोगाला ‘दहिया रोग’ असे म्हणतात. ही वाढ अगोदर पानाच्या खालील बाजूने व नंतर वरील बाजूने दिसते.

बोंडे व पानांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मात्र या ठिकाणी पांढरी वाढ होत नाही.

रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यानंतर पाने पिवळसर होऊन गळून पडतात.

Cotton Disease
Cotton Disease : कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता

रोगाची माहिती

रोगाचे नावः दहिया रोग (ग्रे मिल्ड्यू)

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः रॅमुलारिया एरेओला (Ramularia areola)

बुरशीचे डिव्हिजन : Ascomycota

परजीवी प्रकार : Facultative Parasite

नुकसान : या रोगामुळे कपाशी पिकाचे ११ ते ३० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे २००९ ते २०२११ या दरम्यान नांदेडमध्ये जवळपास २५ ते ४५ टक्के नुकसान झाले होते.

यजमान पिके : बीट, बार्ली इत्यादी.

पोषक वातावरण

पानांवर पाणी पडल्यानंतर बिजाणूंचे अंकुरण होते. पाने ओली असणे तसेच त्यानंतर कोरडी होणे या रोगाच्या प्रादुर्भावासाठी आवश्यक असते. साधारणपणे २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, अति जास्त आर्द्रता

(८० टक्के) आणि ओलसर पाने असे वातावरण अत्यंत पोषक ठरते. अशा वातावरणात बीजाणू अंकुरण चांगले होते.

Cotton Disease
Cotton Disease : कपाशीवर ‘आकस्मिक मर’चे संकट

रोग कसा निर्माण होतो

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बीजाणू (कोनिडिया) हे जमिनीत, जुने पीक अवशेष, गवतावर जिवंत

राहतात. ते साधारण २ वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. नंतर वारा, कीटक, पाणी यांच्या मार्फत यजमान

पिकांवर पोचतात. पोषक वातावरण निर्मिती होताच मुख्य पिकाच्या खालील पानांवर रोगाची लागण होते. याला प्राथमिक लागण म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमधील ठिपक्यांवर अनेक बीजाणू (कोनिडीया) तयार होतात. या बीजाणूंचा हवेमार्फत इतर यजमान पिकांवर प्रसार होतो. यालाच दुय्यम लागण असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय

पीक फेरपालट करावी.

जमिनीची खोल नांगरणी करावी.

लागवडीच्या पिकात रोपांची जास्त दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.

खालील फांद्या काढून टाकाव्यात. फक्त फळ फांदी ठेवाव्यात.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

पावसाचे प्रमाण जास्त असताना लागवड करू नये.

नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी.

शिफारशीत बुरशीनाशके

क्रेसॉक्झीम मिथाईल (४४.३ टक्के एससी)

ॲझोक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब

(६३ टक्के डब्ल्यूपी)

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?

या रोगाचे बीजाणू (कोनिडीया) आपण सूक्ष्मदर्शिकेखाली अत्यंत स्पष्टपणे पाहू शकतो. बीजाणू पारदर्शक असून त्यांचा आकार दंड गोलाकार ते लंबवर्तुळाकार (तांदळाच्या दाण्याचा आकार) असतो. सूक्ष्मदर्शिकेखाली १ ते ३ पेशी भित्तिका स्पष्टपणे दिसतात. पेशी भित्तिकेच्या जवळचा भाग खोलगट दिसतो. त्याचा आकार वेगवेगळा असतो. साधारणतः १० ते २० मायक्रो मीटर लांब आणि २ ते ४ मायक्रो मीटर रुंद असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com