
Hingoli News : कपाशी अजून भुईने रांगत आहे. त्यातील उडदाचे आंतरपीक खुरटे आहे. उडदाला दोन, चार फुले लागलीत. सोयाबीनच पीकही दुपारच्या कडक उन्हात माना टाकत आहे. यंदा सर्व पिकांची आमदानी घटणार आहे. विमा भरपाई मंजूर करायला पाहिजे,’’ वाढ खुंटलेल्या कपाशीमध्ये वखर पाळीने मजुरासह स्वत: आंतरमशागत करत असताना काम थांबवून खुदनापूर (ता.वसमत) येथील विठ्ठल चव्हाण पिकाची अवस्था सांगत होते, त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग होते.
शेतकरी चव्हाण यांच्या प्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातील सर्वच पाच तालुक्यांतील पिकांची स्थिती पावसाअभावी बिकट आहे. जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले. खरिपाच्या पेरण्या लांबल्या. जूनमधील पावसाची तूट जुलैत भरून निघाली, परंतु ऑगस्ट महिन्यात दीर्घ खंड पडला. हलक्या-बरड-माळारानाच्या मध्यम जमिनीवरील पिकांची परिस्थिती बिकट आहे. खरीप हंगामावर नुकसानीचे सावट गडद होत आहे. सिंचन सुविधा असलेले शेतकरी पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु जिरायती भागातील शेतकरी एका जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शिरडशहापूर (ता.औंढा नागनाथ) शिवारात सोयाबीन पिकात खुरपणी करताना चिमाजी व वंदना कठाळे या अल्पभूधारक शेतकरी दांपत्याने आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आमची साडेचार एकर हलकी-बरड जमीन आहे. तणांची वाढ जास्त होते, यासाठी सारखी खुरपणी करावी लागते. जुलैत खूप पाऊस झाला. सोयाबीनच्या शेतात पायथांब नव्हती. १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे समदं पीक होरपळून जाईल. हाती काहीच लागणार नाही. खर्च निघणे मुश्कील आहे.’’
हिंगोली जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी १६९.२० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात सरासरी ४५.२ मिलिमीटर (२६.७ टक्के) पाऊस झाल्याने १२४.१ मिलिमीटर एवढी तूट आली. जून महिन्यातील पावसाचा यंदाचा निचांक आहे. जुलैमध्ये सरासरी २३०.२ मिलिमीटर अपेक्षित असताना ३७३.८ मिलिमीटर (१६२.४ टक्के) म्हणजे सरासरीपेक्षा १४३ मिलिमीटर अधिकचा पाऊस झाला.
परंतु ऑगस्ट महिन्यात अपेक्षित सरासरी पाऊस व प्रत्यक्षात झालेला पावसात ११६८ मिलिमीटरची तफावत आहे. जिल्ह्यात १ जून ते १८ ऑगस्टपर्यंत सरासरी ५३९.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा ४४२.४ मिलिमीटर (८२. टक्के) पाऊस झाला आहे.
जुलैमध्ये अनेक मंडलांमध्ये अनेक वेळा अतिवृष्टी झाली. नाले, नद्यांच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडून गेल्या. पिके वाहून केली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. विहिरीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली, नालेही प्रवाहित झाले. उशिरा पेरणी झालेली सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कपाशी आदी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
लवकर पेरणी केलेले सोयाबीन फुलोरा अवस्थेत, तर कपाशीचे पीक पाते, फुले, बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीवर अल्प प्रमाणात मावा, फुलकिडे आदी रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. अनेक मंडलांत अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिलेल्या पिकांमध्ये मूळकुज आहे.
सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील उभे सोयाबीन हुमणी किडीमुळे नष्ट झाले आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यांतील सर्व ३० मंडलांत १५ ते २० दिवसांपासून पावसाचा खंड आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. भेगा पडल्या आहेत. पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे पावसाअभावी ताणावर गेलेल्या सोयाबीन, हळद, कपाशी आदी पिकांना तुषार, ठिबक संचाद्वारे पाणी देत आहेत. डोंगराळ भागातील गावातील बांधावरील गवत सुकले आहे. जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. येलदरी धरणात ५९.९१ टक्के, तर सिद्धेश्वर धरणामध्ये ४४.३० टक्के जिवंत पाणीसाठा होता. उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. पाणीपातळी कमी होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरिपात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ५ लाख १२ हजार ९४ शेतकऱ्यांनी पीकविम्याची अर्ज दाखल करत ३ लाख २५ हजार ९०० हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ७२१ कोटी २३ लाख रुपये एवढ्या विमा रकमेचे संरक्षण घेतले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.