डॉ. दीपक नगराळे, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. निळकंठ हिरेमनी, डॉ. गजानन बेहरे, डॉ. वाय. जी. प्रसाद
मागील काही वर्षांपासून प्रमुख कापूस उत्पादक भागात हवामान बदल व पावसाची अनियमितता या परिस्थितीमध्ये बोंड सड ही समस्या प्रामुख्याने आढळून येत आहे. यामध्ये विशेषतः विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या दिसून आली आहे.
या रोगात बहुतेक बोंडे बाह्य भागावरून निरोगी दिसतात, तर काही बोंडांवर रसशोषक कीटक व ढेकणांद्वारे केलेल्या नुकसानीची व प्रादुर्भावाची लक्षणे दिसून येतात. अशी हिरवी बोंडे फोडून पाहिल्यानंतर मुखत्वेकरून आतील विकसित होणारी रुई व बिया पिवळसर-लाल ते तांबूस रंगाच्या होऊन सडल्याचे आढळते. या समस्सेमुळे उत्पादनात घट येते.
बहुतेक बोंडात एक ते दोन कप्पे, तर काही वेळा संपूर्ण बोंड सडल्याचे आढळून येते. अशा बोंडांत कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव किंवा अळीची अवस्था दिसत नाही. यामुळे काही प्रमाणात संभ्रमवस्था निर्माण होते. कारण मागील काही वर्षांत संकरित कपाशीवर गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
त्यामुळे या समस्येचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या चमूने अशा समस्याग्रस्त भागाचा अभ्यास दौरा करून अभ्यासांती या समस्येमागील शास्त्रीय कारणे समोर आणली आहेत. बोंड सड रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे जाणून त्यानुसार उपाययोजनांचा अवलंब करावा.
बोंड सड रोगाचे प्रकार व कारणे
बोंड सड रोगाचे बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग आणि आंतरिक बोंड सड असे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात.
बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग
या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो.
पोषक घटक
सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, शेतात साचलेले पाणी व वाढलेली सापेक्ष आर्द्रता असे घटक या प्रकारच्या बोंड सड रोगाला पोषक असतात.
साधारणतः जमिनीलगतचे व परिपक्व अवस्थेतील बोंडांवर असे प्रकार आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर वेगवेगळ्या बुरशींची वाढ झाल्याचे दिसते.
आंतरिक बोंड सड
ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणाऱ्या रोगकारक जिवाणूंच्या संसर्गामुळे होते. बाहेरून निरोगी दिसणारी बोंडे फोडली असता, बोंडामध्ये रोगकारक जिवाणूंचा संसर्ग होऊन आतील रुई पिवळसर-लाल ते तपकिरी रंगाची होऊन सडलेली दिसून येत. विकसित अवस्थेतील बियादेखील सडल्याचे आढळून येतात.
पोषक घटक
रिमझिम पाऊस, सततचे ढगाळ हवामान, हवेतील अधिक सापेक्ष आर्द्रता, फूल तसेच कळ्यांवर व विकसित होणाऱ्या बोंडावरील रस शोषणारे कीटक व ढेकूण यांचा प्रादुर्भाव आदी घटकांमुळे आंतरिक बोंड सड रोगाची समस्या आढळून येते.
उपाययोजना
सरळ ते अर्ध-उभे वाढणारा, मध्यम उंची व पीक कालावधी असणाऱ्या, रस शोषक किडींना सहनशील वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
शेतातील अतिरिक्त पाण्याचा योग्य व चांगल्याप्रकारे निचरा होण्याची व्यवस्था करावी.
नत्र व स्फुरदयुक्त खतांचा अतिवापर करणे टाळावे.
पिकाची लागवड जमिनीच्या प्रकारानुसार शिफारस केलेल्या इष्टतम अंतरांवर करावी.
उत्तम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून कापूस पिकाची होणारी अतिवाढ रोखावी.
पात्या, फुले, कळ्या आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषक किडींचा (फुलकिडे व तुडतुडे) व हिरव्या/करड्या/लाल रंगाचे ढेकूण यांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे शिफारस केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा.
रासायनिक फवारणी (प्रति १० लिटर पाणी)
अ) ६० ते १२० दिवसांच्या अवस्थेतील पिकामध्ये, (रस शोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी- तुडतुडे, फुलकिडे, हिरवे व करडे रंगाचे ढेकूण)
फ्लोनिकॅमीड (५० डब्ल्यूजी) ४ ग्रॅम किंवा
डायनोटेफ्युरॉन (२० एसजी) ३ ग्रॅम किंवा
डायफेन्थ्युरॉन (५० डब्ल्यूपी) १० ग्रॅम
ब) १२० दिवसांनंतर ः
फ्लूव्हॅलिनेट (२५ ईसी) ४ ग्रॅम
(विशेषतः लाल रंगाच्या ढेकणांच्या नियंत्रणासाठी)
पात्या, फुले, कळ्या आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील वाढलेली आर्द्रता व रिमझिम पाऊस अशी हवामान स्थिती राहिल्यास बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी खबरदारीचा उपाय म्हणून,
कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त) ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
त्यानंतर सात दिवसांनी प्रोपीनेब (७० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम किंवा
प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १० मिलि किंवा
कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) ४ ग्रॅम किंवा मेटीराम (५५ टक्के) अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन (५ टक्के डब्ल्यूजी) २० ग्रॅम (संयुक्त) किंवा फ्ल्युक्झापायरॉक्झाड १६७ ग्रॅम/लि अधिक पायरॉक्लोस्ट्रोबीन ३३३ ग्रॅम/लि. एससी (संयुक्त) ६ मिलि
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
- डॉ. दीपक नगराळे ९८२२३१४६४७
(वरिष्ठ शात्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्र विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.