डॉ. प्रकाश मोरे, डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. भगवान ढाकरे
Remedies for Pomegranate Disease : सद्यःस्थितीत डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग हा सर्वांत महत्त्वाचा रोग आहे. सर्वच प्रमुख डाळिंब उत्पादक राज्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगग्रस्त डाळिंब बागेमध्ये अस्वच्छता, लागवडीसाठी रोगग्रस्त कलमांचा वापर, अयोग्य जमिनीची निवड, कमी लागवड अंतर, घनदाट शाखीय वाढ, बुरशीनाशके, कीटकनाशके यांच्या अनावश्यक फवारण्या, रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर, अयोग्य सिंचन व्यवस्थापन, अयोग्य बहार नियोजन, तण व्यवस्थापनाचा अभाव, एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाचा अभाव इ. बाबी प्रामुख्याने आढळून येतात. त्यामुळे रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो.
प्रादुर्भावग्रस्त (रोगट) बागेतून निरोगी बागेत रोगप्रसार झपाट्याने होतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर काही बागायतदार रोग नियंत्रणासाठी प्रयत्न करतात, तर काही जण रोगग्रस्त बागा तशाच सोडून देतात. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव तीव्र होत जाऊन रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. प्रभावी रोगनियंत्रणासाठी डाळिंब उत्पादकांनी गावपातळीवर सामूहिकरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त मातृवृक्षापासून बनविलेल्या रोपांद्वारे होतो. रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोगमुक्त रोपे लागवडीसाठी वापरणे गरजेचे आहे. रोपांची खरेदी ही खात्रीशीर रोपवाटिकेमधूनच करावी. रोपे खरेदी करताना मातृवृक्षांची पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
झाडांमध्ये लागवडीचे अंतर कमी असल्यास बागेत झाडांच्या एकमेकांच्या संपर्कामुळे रोगाचा प्रसार होतो. त्यासाठी डाळिंब बाग लागवडीचे अंतर ४.५ बाय ३ मीटर इतके ठेवावे.
प्रादुर्भावग्रस्त बागेतून शेतमजुरांची ये-जा होणार नाही याची काळजी घ्यावी.
बहर घेण्यापूर्वी रोगट पानांची पानगळ होण्याकरिता इथेफॉन (३९ टक्के एसएल) २ ते २.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (लेबल क्लेम आहे)
पानगळ झाल्यानंतर झाडाच्या प्रादुर्भावग्रस्त फांद्या प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालून छाटाव्यात. छाटणीसाठी वापरलेल्या अवजारांची छाटणीदरम्यान तसेच आंतर मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचे सोडिअम हायपोक्लोराइट २५ मिलि प्रति लिटर या द्रावणात बुडवून निर्जंतुकीकरण करावे.
छाटणीनंतर ताबडतोब सर्व पाने, फांद्या, फळांचे अवशेष बागेबाहेर नेवून नष्ट करावेत. रोगट बागेमध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
दर्जेदार फळ उत्पादन घेण्यासाठी पानगळ झाल्यानंतर बाहेरील फांद्यांची शेंड्यापासून २० सेंमी अंतरावर छाटणी करावी. तसेच मध्यवर्ती भागात भरपूर सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी आतील फांद्यांची विरळणी करावी.
छाटणी केलेल्या भागावर १० टक्के बोर्डो पेस्ट (१ टक्का म्हणजे मोरचूद १ किलो अधिक कळीचा चुना १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून) लावावी. (बोर्डो मिश्रणाचा सामू ७.० ठेवावा)
झाडाच्या आळ्यामध्ये तसेच बागेतील जमिनीवर ब्लिचिंग पावडर ६० किलो किंवा चार टक्के कॉपर डस्ट २० किलो प्रति हेक्टर प्रमाणे धुरळणी यंत्राच्या साह्याने धुरळणी करावी.
झाडाच्या खोडाला निंबोळी तेल अधिक २ ब्रोमो-२- नायट्रोप्रोपेन-१,३, डायोल (९५ टक्के) ५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के) २५ ग्रॅम प्रमाणे एकत्र मिसळून तयार झालेला लेप द्यावा.
सॅलिसिलिक ॲसिड (९८ टक्के शुद्धता) हे झाडाच्या वाढीसाठी उपयोगी असून ते झाडांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढविते. त्यासाठी झाडाची नवीन पालवी फुटताना, फळधारणेच्या सुरुवातीस व फळधारणा कालावधीत सॅलिसिलिक ॲसिड ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या मात्रेत फवारणी करावी. (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांची शिफारस).
सुडोमोनस फ्लोरोसन्स हा जैविक घटक तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी प्रभावी असल्यामुळे छाटणीनंतर, फळवाढीच्या अवस्थेत व फळ काढणीपूर्वी २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
झाडामध्ये रोगप्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी फुले ग्रेड -१ या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मिश्रणाची २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीपासून एक महिन्याच्या अंतराने नियमित कराव्यात. सॅलिसिलिक ॲसिड व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीमध्ये ७ दिवसांचे अंतर ठेवावे.
मृग बहरामध्ये या जिवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. त्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण होते. याकरिता हस्त अथवा आंबे बहर घेणे अधिक सोईस्कर ठरते.
नवीन पालवी फुटल्यानंतर, २ ब्रोमो -२- नायट्रोप्रोपेन-१,३, डायोल (९५ टक्के) २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
बोर्ड मिश्रणाच्या १ टक्का द्रावणाची (मोरचूद १ किलो अधिक कळीचा चुना १ किलो १०० लिटर पाणी) सात दिवसांच्या अंतराने नियमित फवारण्या घ्याव्यात. (बोर्डो मिश्रणाचा सामू ७.० ठेवावा).
- डॉ. प्रकाश मोरे (रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू फळपिके संशोधन योजना), ८८८८९६८२०४
(डॉ. नवले हे प्रमुख, वनस्पती रोगशास्र व अणुजीवशास्र विभाग, तर डॉ. ढाकरे उद्यानविद्या विभाग प्रमुख म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)
प्रादुर्भाव दिसून आल्यानंतरच्या उपाययोजना
(प्रमाण : फवारणी प्रतिलिटर पाणी)
२ ब्रोमो -२- नायट्रोप्रोपेन-१,३, डायोल (९५ टक्के) ०.५ ग्रॅम.
केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (सीआयबी) यांच्या नोंदणीकृत यादीनुसार, कासुगामायसिन ५ टक्के अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५ टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा कॉपर सल्फेट पेन्टाहायड्रेट (६ टक्के एससी) २.५ मिलि
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्यास,
२ ब्रोमो -२- नायट्रोप्रोपेन-१,३, डायोल (९५ टक्के) ०.५ ग्रॅम अधिक कॅप्टन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के) २.५ ग्रॅम
(टीप : वरील काही बुरशीनाशके, जिवाणूनाशके तथा रसायने यांचा लेबलक्लेम यादीत समावेश नाही. परंतु काही बुरशीनाशके, जिवाणूनाशके तथा रसायने यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, इतर विद्यापीठे तसेच राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या शिफारशीमध्ये समावेश असून, त्यांचा रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपयोग होतो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.