Sugarcane Production : एकरी १०० टन ऊस उत्पादनात सातत्य

Sugarcane Crop : निसराळे (जि. सातारा) येथील महादेव आणि श्रीकांत या घोरपडे पितापुत्रांनी अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस व अन्य पिकांची शेती केली आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

विकास जाधव

Sugarcane Farming : निसराळे (जि. सातारा) येथील महादेव आणि श्रीकांत या घोरपडे पितापुत्रांनी अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध पद्धतीने ऊस व अन्य पिकांची शेती केली आहे. अलीकडील वर्षांत एकरी शंभर टन ऊस उत्पादनात त्यांचे सातत्य आहे. जमिनीची काळजी घेताना सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

सातारा जिल्ह्यात उरमोडी नदीच्या काठावर निसराळे (ता. सातारा) गाव आहे. येथील महादेव घोरपडे यांच्याकडे ३५ वर्षांहून अधिक काळ ऊस पीक घेतले जाते. पूर्वी ऊस गुऱ्हाळांना दिला जायचा. (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला ५०० टन ऊस पुरविण्याचा विक्रम घोरपडे यांनी केला होता.

व्यवस्थापनातील बदल

महादेव यांचे शिक्षण कमी असले तरी वाचन, नव्या गोष्टी शिकणे व तज्ज्ञ शेतकऱ्यांकडे पीकपाहणी करण्याची त्यांना आवड होती. त्या दृष्टीने कमी क्षेत्रात व खर्चात बचत करीत उत्पादनवाढ व जमिनीचा पोत टिकवणे या सुत्रीच्या वापर करीत शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन त्यांनी सुरू केले. भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने २००७ मध्ये गावात प्रथमच पट्टा पद्धतीचा प्रयोग केला. उसाच्या दोन सरी, त्यानंतर एक मोकळी सरी असे नियोजन केले. मोकळ्या सरीत ते भुईमूग, झेंडू, टोमॅटो ही पिके घेत. पुढे जैविक, सेंद्रिय घटकांच्या वापरातून रासायनिक खतांचा वापर कमी करीत नेला. महादेव यांना आता एमबीए झालेला मुलगा श्रीकांत यांची समर्थ साथ मिळते. त्यातूनच शेती अधिक उत्पादनक्षम होण्यास मदत झाली आहे.

Sugarcane
Tomato Production : आठ एकर क्षेत्रावर टोमॅटो उत्पादनात सातत्य

ऊसशेतीतील ठळक बाबी

-स्वतःचे सहा एकर व खंडाने दोन एकर असे आठ एकर क्षेत्र.
-ऊस हे मुख्य पीक. को ८६०३२ हे वाण.
-साखर कारखान्याकडील कंपोस्ट खताचा एकरी १० टन वापर दरवर्षी.
-पोल्ट्री फार्मसोबत कोंबडीखतासाठी वर्षभराचा करार. त्याद्वारे दरवर्षी तीन ट्रेलर त्याचा वापर.
-ऊस उत्पादनात दर्जेदार बियाणे ही मोठी बाब. त्यामुळे पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथून दर्जेदार बेणे आणतात. फाउंडेशन बियाणे तयार करतात.
-सन २०१९ पासून सुपरकेन नर्सरी तंत्राचा वापर करून रोपांची लागवड.
-पूर्वी साडेचार फुटी सरी व दोन रोपांतील अंतर दोन फूट होते. आता पाच फुटी सरी व दोन रोपांतील अंतर दीड फूट. अंतराच्या खुणा करून लागवड. दर्जेदार बियाणे, अंतर व रासायनिक- जैविक घटकांची आळवणी यामुळे रोपांतील डाली साधण्याची वेळ शक्यतो आली नाही.
-एकरात सरासरी पाच हजार रोपे. ५० ते ५५ दिवशी जेठा कोंब काढला जातो.
-रासायनिक खतांचे पहिले चार डोस- लागवडीनंतर १५ दिवस, ४०, ६० व ९० ते ९५ दिवस.

-मोठ्या भरणीआधी प्रति बेटात दमदार नऊ फुटवे ठेवून अन्य फुटवे काढले जातात.
-किमान दोन वेळा पाचट काढले जाते. त्यामुळे ऊस पोसण्यास व जाड बाट येण्यास मदत.
-रासायनिक खते मातीआड करून दिली जातात. जैविक खते, ‘व्हीएसआय’कडील जिवाणू खते व जिवामृत यांचा वापर. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिवामृत बनविण्यासाठी यंत्रणा.
-संभाव्य किडी लक्षात घेऊन सुरुवातीपासून प्रकाश सापळ्यांसारख्या उपायांवर भर.

उत्पादन

-एकरात गाळपयोग्य ४० ते ४५ हजार ऊस संख्या राहील असे नियोजन. प्रति उसाचे वजन अडीच किलो.
-पूर्वी एकरी ४० ते ४५ टन उत्पादन असायचे. गेल्या चार वर्षांहून एकरी १०० टन उत्पादनात सातत्य. पुढील उद्दिष्ट १२५ टनांचे. एकरी उत्पादन खर्च ८० हजार ते एक लाखांच्या दरम्यान.
-‘अजिंक्यतारा’ कारखान्याकडून प्रति टन तीन हजार रुपये दर.

शेतीची अन्य वैशिष्ट्ये
-शेतीतील कामांनुसार तसेच ताळेबंद यानुसार नोंदीच्या वह्या. त्यातून हिशेबी, व्यावहारिक शेतीला महत्त्व.
-दर व बाजारपेठांचा अभ्यास करून अन्य पिकांचे नियोजन. रब्बी कांद्याचे एकरी १८ टनांपर्यंत, सोयाबीन १६ क्विंटलपर्यंत उत्पादन. २५ टन क्षमतेची बांधीव कांदाचाळ उभारली आहे.
-मूलभूत बेण्यापासून पायाभूत बेणे तयार करून १४० हून अधिक शेतकऱ्यांत प्रसार.
-कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार, कृषी सहायक अंकुश सोनावले यांचे सहकार्य व मार्गदर्शन. घोरपडे ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक.
-श्रीकांत यांनी गावापासून काही किलोमीटरवरील वर्णे येथे औषधी व मसाले प्रक्रिया व्यवसाय सुरू केला आहे. तो प्रगतावस्थेत आहे.

सन्मान
-कऱ्हाड कृषी प्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा कृषी विभागातर्फे उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार
-पुसेगाव येथे सेवागिरी ट्रस्ट व जिल्हा परिषद यांच्यातर्फे शेतीनिष्ठ पुरस्कार.

जमिनीच्या आरोग्याकडे दिले लक्ष

जमिनीची सुपीकता टिकावी याबाबत घोरपडे दक्ष असतात. पिकावर पीक न घेता उन्हाची ताप देणे, खोल नांगरट, जिवाणू खते, वेगवेगळ्या पेंडींचा वापर आदींवर भर असतो. आले, सोयाबीन व रब्बी कांदा याद्वारे ऊसशेतीत फेरपालट होते. खोडवा राखल्याने पाचट भरपूर मिळते. खोडव्याचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन मिळते. सन २०१२- १३ पासून पाचट व्यवस्थापन केले जाते. पूर्वी सेंद्रिय कर्ब ०.२३ टक्का होता. सध्या तो ०.७५ (२०२२) वर पोहोचला आहे.

श्रीकांत घोरपडे, ९२०९९१९९१८
महादेव घोरपडे, ९४२०४९६०७०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com