
भाजीपाला नियोजन : टोमॅटो
शेतकरी : वसंत शिवराम आव्हाड
गाव : धुळवड, ता. सिन्नर, जि. नाशिक
एकूण क्षेत्र : ३५ एकर
टोमॅटो लागवड : ८ एकर
-----------
Vasant Avhad : पूर्वी आम्ही प्रामुख्याने कांदा, कोबी ही पिके घेत असू. मात्र २०११ मध्ये एक एकर टोमॅटो लागवडीपासून सुरुवात केली आहे. त्या वेळी सिंचनाची शाश्वत सुविधा नव्हती. मग २०१३ मध्ये पाइपलाइन केली. पुढच्याच वर्षी २०१४ मध्ये दोन शेततळ्यांची निर्मिती केली. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब सुरू केला. परिणामी, भाजीपाला पिकांसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टोमॅटोचे क्षेत्र वाढत गेले. २०१७ पासून ८ एकर क्षेत्रावर टोमॅटो उत्पादन सातत्याने घेतले जात आहे. एकत्र कुटुंब पद्धतीने कामकाज होत असल्याने घरातील सर्वांच्या सूचनेतून दरवर्षी टोमॅटो लागवडीचे क्षेत्र ठरते.
लागवडीचे पूर्वनियोजन :
रब्बी हंगामातील कांदा काढणी झाल्यानंतर शेत मोकळे होतात. त्यानंतर खोल पद्धतीने नांगरट केली जाते. एक महिनाभर शेत तसेच ठेवले जाते. त्यानंतर शेतात कुक्कुट खत टाकले जाते. त्यावर रोटाव्हेटर मारून शेताची मशागत करून सपाट केले जाते. त्यानंतर लागवडीसाठी ४.५ फुटाचे गादीवाफे पाडले जाते. त्यानंतर ठिबक सिंचन कार्यान्वित करण्यासाठी नळ्या पसरविल्या जातात. मजुरांच्या साह्याने २५ मायक्रॉन जाडीचा सफेद मल्चिंग पेपर अंथरला जातो. लागवड करण्यासाठी प्रतिझाडाच्या अंतरानुसार दर २ फुटांवर छिद्र पाडून ड्रीपर बसवले जातात.
वाण निवड व रोपांची उपलब्धता :
उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड असल्याने वाण निवड करताना प्रामुख्याने उन्हाच्या दिवसांत तग धरणारी, रोग प्रतिकारक्षम, अधिक फळधारणा हे मुद्दे विचारात घेतो. त्यात बाजारपेठेत ज्या वाणांना मागणी आहे, त्यांची निवड केली जाते. कारण बाजारासाठी रंग, आकार, चकाकी व टिकवणक्षमता चांगली असणे गरजेचे असते. वाणाची निश्चिती झाल्यानंतर त्यानुसार रोपवाटिकेमध्ये रोपांसाठी आगाऊ मागणी नोंदवली जाते. २ फूट अंतरावरील लागवडीप्रमाणे एकरी ५ हजार रोपांची गरज असते. एप्रिल महिन्यात ११ तारखेला किंवा दुसऱ्या आठवड्यात लागवड नियोजन असते. त्यानुसार २३ दिवसांचे सशक्त व योग्य वाढ झालेली रोपे आणली जातात.
खत व पाणी व्यवस्थापन :
लागवडीपूर्वी भरखत म्हणून एकरी १०० किलो १०:२६:२६, १०० किलो १८:४६ः३ किलो झिंक, फेरस, कॉपर, मॅग्नेशिअम, बोरॉन अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये व १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट अशा ही मात्रा गादीवाफ्यावर पसरवली जातात. पहिल्या टप्प्यात लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी अगोदर पाणी दिल्यानंतर ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक, जैव उत्तेजकाची आळवणी केली जाते. त्यानंतर फुलधरणा होण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नत्र, स्फुरद, पालाश यांच्या ६:४६:६, ११:४४:११, ५:५५:१७, ०:६०:२० व ०:५२:३४ या ग्रेडची खते वापरली जातात.
लागवड झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात दिवसात दहा मिनिटे सिंचन दिले जाते. त्यानंतर पुढील टप्प्यात वाफसा अवस्था पाहून सिंचनाची वेळ वाढवून नियोजन केले जाते. झाडांना ताण बसणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते.
कीड-रोग व्यवस्थापन ः
उन्हाळी लागवडीत सुरुवातीचा टप्प्यात थ्रिप्स, पांढरी माशीचा प्रादुर्भाव होतो. लागवडीनंतर २० ते २२ दिवसांनंतर नाग अळीचा प्रादुर्भाव असतो. तर रोगामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव भुरी व पावसाला सुरू होताच डाऊनी मिल्ड्यू यांचा होतो. फळे लागल्यानंतर फळे पोखरणारी अळी, लाल कोळी प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सातत्याने निरीक्षणे नोंदवून वेळीच शिफारशीत कीटकनाशकांचा वापर केला जातो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये चिकट सापळ्यांचा
प्रामुख्याने वापर करतो. परिणामी, थ्रिप्स, पांढरी माशी व अन्य किडींचा प्रादुर्भाव समजतो. काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
तोडणी व विक्री व्यवस्थापन :
लागवड २१ दिवसांची झाल्यानंतर तार काठी उभी करून सुतळीच्या साह्याने पाहिली बांधणी केली जाते. नंतर ४५ दिवसांचा प्लॉट झाल्यानंतर व ६० व्या दिवशी तिसरी बांधणी केली जाते. लागवडीनंतर ६५ दिवस झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने फळ तोडणी सुरू होते. मजुरांचे नियोजन करून दिवसाआड टोमॅटोचे तोडे केले जातात. तोडणीनंतर त्वरित सावलीमध्ये मालाची वाहतूक करून, हाताळणी व प्रतवारी प्राधान्याने केली जाते. मागणी आणि दराच्या विचार करून नाशिक व संगमनेर येथील हा बाजारपेठेमध्ये माल पाठवला जातो.
स्थानिक बाजारात दर कमी असल्यास पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी व निर्यातदारांना तो दिला जातो. या नियोजनामुळे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
--------
संपर्क : गोकूळ आव्हाड, ८०८०४९९८२४
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.