Silk Farming : अनुभवातून दर्जेदार रेशीम उत्पादनात सातत्य

Article by Manik Rasve : हिंगोली जिल्ह्यातील टाकळगव्हाण (ता. कळमनुरी) येथील श्रीधर शृंगारे यांनी मागील १४ वर्षांपासून रेशीम शेतीमध्ये सातत्य राखले आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Farmer Management of Silk Farming :

शेतकरी नियोजन

रेशीम शेती

शेतकरी : श्रीधर बळवंतराव श्रृंगारे

गाव : टाकळगव्हाण (ता.कळमनुरी,जि.हिंगोली)

एकूण क्षेत्र : ४५एकर

तुती लागवड : २ एकर

हिंगोली जिल्ह्यातील टाकळगव्हाण (ता. कळमनुरी) येथील श्रीधर शृंगारे यांनी मागील १४ वर्षांपासून रेशीम शेतीमध्ये सातत्य राखले आहे. दोन एकर तुती लागवडीपासून वर्षाकाठी २ ते २.५ लाख रुपयांचे कोष उत्पादन ते घेत आहेत.

टाकळगव्हाण येथील भास्कर, गंगाधर, श्रीधर, पंडित, प्रभाकर शृंगारे या पाच भावांचे एकत्रित कुटुंब आहे. शृंगारे कुटुंबीयांची ४५ एकर जमीन आहे. शेतीला दुग्धव्यवसाय व रेशीम शेतीची जोड दिली आहे. श्रीधर हे रेशीम शेतीचे व्यवस्थापन करतात. २०१० पासून रेशीम शेतीत त्यांनी सातत्य राखले आहे. रेशीम शेतीसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एच. देशपांडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशोक वडवाले यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळते.

तुती बाग व्यवस्थापन

जुलै २०१० मध्ये १ एकरावर तुतीच्या व्ही १ वाणाची लागवड केली. तत्पूर्वी शेतामध्ये एकरी ५ ट्रॉली प्रमाणे शेणखत टाकून घेतले. त्यानंतर जमिनीची खोल नांगरट केली. लागवड ४ बाय १.५ फूट अंतरावर केली आहे.

त्यानंतर २०१७-१८ मध्ये तुती रोपांची पट्टा पद्धतीने दोन झाडांमध्ये २ फूट तर दोन ओळींमध्ये ५ फूट अंतर ठेवत लागवड केली. लागवडीवेळी बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची प्रक्रिया करून घेतली होती.

सिंचनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. तुषार संचाद्वारे पाणी दिल्यामुळे पाने स्वच्छ होऊन रेशीम कीटकांना दर्जेदार पाने मिळतात. त्यातून चांगले कोष उत्पादन मिळण्यास मदत होते.

Silk Farming
Silk Farming : आदिवासी पट्ट्यात रुजतेय रेशीम शेतीची चळवळ

नोव्हेंबर महिन्यात पहिली बॅच घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार तुती बागेची पहिली छाटणी केली. छाटणी केल्यानंतर एकरी ७५ किलो मिश्र खतांच्या मात्रा दिल्या. प्रत्येक छाटणीला यानुसार खतांच्या मात्रा दिल्या जातात.

पावसाळा व उन्हाळ्यात ५० दिवसांनी तर हिवाळ्यात ६० ते ७० दिवसांनी दुसरी बॅच घेण्यासाठी पाने उपलब्ध होतात.

दर्जेदार पानांच्या उपलब्धतेसाठी छाटणीनंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची २१ ते २२ दिवसांनी पहिली त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी केली जाते. याशिवाय १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांची मात्रा दोन्ही फवारणीच्या वेळी दिली जाते.

वर्षातून एकवेळ एप्रिल किंवा मे महिन्यात शेणखताची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.

सध्याचे कामकाज

मागील बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करून घेतले. त्यानंतर वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील कपिल सोनटक्के यांच्याकडून १५० चॉकीची मागणी केली होती. त्यानुसार रविवारी (ता.७ एप्रिल) रात्री १५० चॉकी शेडवर आणली.

शेडवर आणल्यानंतर दुसरा मोल्ट पास केला. सध्या तापमानात वाढ होत असल्यामुळे सकाळी लवकर म्हणजे सहापर्यंत फिडींग (तुती पाने देणे) व सायंकाळी पाच नंतरच्या फिडिंगवर भर दिला जाईल. रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध देण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे शेडमध्ये गारवा निर्माण होऊन वातावरण थंड राहील यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. या बॅचमधील कोषाची साधारण ३० एप्रिलच्या दरम्यान काढणी केली जाईल.

Silk Farming
Subsidy for Silk Shade : रेशीम उद्योगातील मशिन शेड उभारणीसही अनुदान; महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य

आगामी नियोजन

कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर कीटकांची विष्ठा, खाल्लेली पाने तसेच इतर टाकाऊ घटकांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. विशेषतः गाडून किंवा जाळून टाकले जातील. जेणेकरून पुढील बॅचसाठी रोगमुक्त राहण्यास मदत होईल.

याशिवाय निर्जंतुकीकरण द्रावणाने संगोपनगृह स्वच्छ केले जाईल. त्यानंतर ब्लिचिंग पावडर आणि इतर निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी केली जाईल.

पुढील बॅच घेण्यासाठी संगोपनगृहाची पूर्वतयारी केली जाईल. त्यानंतर एक महिना तुती बागेस पाण्याचा ताण दिला जाईल. साधारण १५ ते २० मे च्या दरम्यान तुतीचे बागेची छाटणी केली जाईल. त्यानंतर तुषार संचाद्वारे हलके पाणी देऊन आंतरमशागत केली जाईल.

साधारण १५ ते २० जून दरम्यान तुतीची पाने कीटकांना खाण्यासाठी उपलब्ध होतील. त्यावेळी १५० अंडीपुंजाची पुढील बॅच घेतली जाईल.

संगोपनगृहाची काळजी

रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी शेतामध्ये २० बाय ५० फूट आकाराचे रेशीम किटक संगोपनगृह उभारले आहे. त्यात बायव्होल्टाईन जातीच्या १५० अंडिपुंजाच्या ७ बॅच घेतल्या जातात. त्यापासून सरासरी १२५ ते १३५ किलो रेशीम कोष उत्पादन घेत आहेत.

मागील १४ वर्षांच्या अनुभवातून व्यवस्थापन तंत्रात सातत्याने सुधारणा करत दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. रेशीम किटकांचे थंडी, ऊन,वारा, पावसापासून संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याभोवती प्लास्टिक लावले आहेत.

हिवाळ्यात शेडमधील तापमान योग्य राखण्यासाठी शेगड्या लावल्या जातात. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक तापमान राखणे शक्य होते. उन्हाळ्यात ग्रीन नेट लावतात.

टिन पत्र्यावर पांढरा रंग लावला जातो. तसेच छतावर चार बाजूंनी १६ एमएम लॅटरल लावलेली आहेत. त्या माध्यमातून दिवसभर पाणी पडत राहते. त्यामुळे उन्हाळ्यात शेडमध्ये गारवा निर्माण होतो.

उत्पादित कोषाची बंगलोर जवळील रामनगरम येथील मार्केटमध्ये कोष विक्री केली जाते. याशिवाय जालना तसेच बीड येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी पाठविले जातात. सध्या ए ग्रेडच्या कोषाचे प्रतिकिलो ४५० ते ५०० रुपये दर मिळत आहेत.

श्रीधर शृंगारे ९२८४१४४७८३

(शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com