
Washim News : येत्या हंगामात यशस्वी फुलधारणेसाठी संत्रा फळांची काढणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करावी. फळे काढणीनंतर लगेच झाडांवरील सल काढून बुरशी नाशकाची किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी, असा सल्ला केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी दिला.
रिसोड येथे आयोजित संत्रा मृग बहर २०२५ नियोजन कार्यशाळेत पाटील बोलत होते. वाशीम जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र कमालीचे वाढत असून या शेतकऱ्यांना बहर नियोजनासाठी फायदेशीर व्हावे यासाठी केव्हीकेचा उद्यान विद्या विभाग, नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने बुधवारी (ता. २२) रिसोड येथे ही कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी सुविधे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर होते. नवचैतन्य कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू खडसे, श्री. कृष्णमूर्ती, शेतकरी प्रतिनिधी केशवराव बोरकर, शेखर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले, की यावर्षी बऱ्याच भागांमध्ये पानगळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात नत्र, स्फुरद, पालाश व सेंद्रिय खतांची शिफारशीत मात्रा जमिनीतून द्यावी. मार्चनंतर कोणत्याही नत्रयुक्त खताचा वापर करू नये.
आता येणाऱ्या आंबिया बहराची नवतीची चांगल्या पद्धतीने जोपासना करून ही नवती लवकरात लवकर पक्व करण्याच्या दृष्टिने उपाययोजना कराव्यात. तांत्रिक सत्रात श्री. पाटील यांनी संत्रा या फळपिकाची फिजिओलॉजी व मृग बहरच्या यशस्वी फुलधारण्यासाठी संभाव्य परिस्थिती कशी निर्माण करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विलास बोरकर यांनी केले. कृष्णा मानवतकर, कृष्णमूर्ती, शेखर पवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष संजय उकळकर यांनी कृषी विज्ञान केंद्र हे संत्रा पिकाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याबद्दल कौतुक केले. वाशीम, बुलडाणा व हिंगोली जिल्ह्यांतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. सूत्रसंचालन दीपक इडोळे यांनी केले. आभार अजय बोरकर यांनी मानले.
डोळस नियोजन करा
वाशीममध्ये संत्रा हे प्रमुख फळपीक म्हणून समोर आले आहे. यावर्षी संत्रा उत्पादकांनी मृगबहर घेत यशस्वीपणे एकरी चार ते दहा लाखांपर्यंत उत्पन्न घेतले. परंतु वातावरण बदलामुळे बऱ्याच बागांत पानगळ वाढली आहे. ही बाब पुढील हंगामात यशस्वी फुलधारणेसाठी अडचणीची राहू शकते. त्यामुळे डोळसपणे नियोजन करण्याचा सल्लाही या वेळी देण्यात आला.
मृग बहर नियोजनासाठी महत्त्वाच्या टिप्स
फुलधारणेसाठी संत्रा फळांची काढणी फेब्रुवारीअखेरपर्यंत करा
सल काढून बुरशीनाशक किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी
शिफारशीत खतमात्रा
अवास्तव नत्राचा वापर टाळावा
संजीवकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा
अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये गोकृपा अमृत, जिवाणू खते आणि सेंद्रिय खतांचा वापर
शेतकऱ्यांचा सत्कार
वडजी येथील संत्रा उत्पादक शेतकरी डॉ. सुनील बोरकर यांनी मागील वर्षी संत्रा बागेचे संपूर्ण नियोजन हे नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये गोकृपा अमृतचा वापर करून यशस्वी केले. गोविंद देशमुख यांनीही याच पद्धतीचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.