Shaktipeeth Highway Oppose Farmers : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात कृती समितीच्यावतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. बाधित शेतकऱ्यांनी या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रतीकात्मक आंदोलन केले. शेतकऱ्यांनी आपापल्या शिवारात, जनावरांच्या गोठ्यावर, 'जिल्हाधिकारी कार्यालय' असे फलक लावून त्यासमोर प्रतीकात्मक धरणे आंदोलन केले.
गेल्या २३ मार्चला सांगलीवाडी येथे झालेल्या महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता. तथापि, आचारसंहितेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारली. तेव्हा कृती समितीने प्रतीकात्मक आंदोलन करीत १९ गावांतील शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. आपापल्या गावात प्रतीकात्मक धरणे आंदोलन केले.
सांगली जिल्ह्यातील शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडीसह १९ गावांतील शेतजमिनी बाधित होत आहेत. तेथील शेतकऱ्यांनी कृती समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत आंदोलन केले.
या भागात सिंचन योजना बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे सर्व जमिनी बागायती झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी जिरायती जमिनी कर्ज काढून विकसित केल्या आहेत. शासनाने २०१३ च्या जमीन अधिग्रहण कायद्यातील मोबदल्यातील कलमांमध्ये वेळोवेळी दुरुस्ती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळणार नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून हा महामार्ग रद्द करून अस्तित्वात असलेल्या पर्यायी महामार्गाचा उपयोग करून महाराष्ट्रातील देवस्थाने जोडण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, उदय पाटील, शवंत हारुगडे, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, घनःश्याम नलावडे, भूषण गुरव, पैलवान विष्णू पाटील, उमेश एडके, विलास थोरात, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील आदी शेतकऱ्यांनी भाग घेतला.
आज जिल्ह्यातील १९ गावांत पुकारलेल्या प्रतीकात्मक आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात राज्यव्यापी मेळावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर हा मेळावा पंढरपूर परिसरात घेतला जाईल. शासनाने आमच्या मागणीची योग्य दखल घ्यावी; अन्यथा तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल.
- उमेश देशमुख, प्रदेश अध्यक्ष, किसान सभा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.