Fish Products : माशांपासून मिळते कोलॅजीन, तेल, कायटिन

Fish Product Business : माशांचे मांस तसेच त्यांच्या इतर अवयवांपासून विविध उप-उत्पादने तयार केली जातात. मत्स्य उद्योगातील या उप उत्पादनाची वाढती मागणी पर्यावरणीय संतुलन राखून अधिक कार्यक्षमतेने आणि आर्थिकदृष्ट्या शाश्‍वत पद्धतीने वापरल्यास, हे उत्पादन उद्योगांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
Fish Products
Fish ProductsAgrowon
Published on
Updated on

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते

Fish Product Production : महाराष्ट्रात वार्षिक अंदाजे ६.४ लाख टन मत्स्य उत्पादन होते. माशांपासून मिळणारी उपउत्पादने (मत्स्यतेल, मत्स्यपीठ, कोलॅजन आणि जिलेटिन, कुटी) अन्नधान्य उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मासे हे प्रथिनांचे समृद्ध स्रोत असल्याने ते खाद्य उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

मत्स्य तेल

माशांपासून मिळणारे तेल औद्योगिक तसेच औषधीदृष्ट्या फार महत्त्वाचे समजले जाते. माशांच्या शरीरापासून आणि यकृतापासून तेल काढतात. चरबीयुक्त माशांच्या (उदा. तारली) सबंध शरीरापासून तेल काढण्याकरिता पुरेशा प्रमाणात मासा उकळवतात आणि त्यातून सुटणारे तेल वेगळे करतात.

तेलाचा तवंग काढून शिजलेला मासा काथ्याच्या चटईवर ठेवून दाब दिला जातो. नंतर पाणी आणि तेल सिमेंट टाकीत जमवितात. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते.हे तेल दोन दिवसांनंतर पाण्यापासून वेगळे केले जाते.

तेलात फॅटी ॲसिड्‍स विशेषतः ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, विपुल प्रमाणात असल्याने तेलाचा विविध प्रकारे उपयोग करतात.

Fish Products
Fish Seed Storage : मत्स्यबीज संचयनाचे नियोजन

स्टिअरिन हा घटक वेगळा केलेल्या तेलात लवकर सुकण्याचा गुणधर्म असतो. कृत्रिम रबर निर्मिती उद्योग, छपाईची शाई, वंगणयुक्त तेल, अल्काईड रेजिन्स आणि सल्फोनेटेड पदार्थ बनविण्यात या तेलाचा उपयोग केला जातो.

गंधरहित आणि रंगरहित केलेल्या तेलाचा वापर डबाबंद मासे, डिटर्जंट, मेण कापड, लिनोलियम इत्यादी पदार्थ आणि वस्तू बनविण्यासाठी होतो.

कमी प्रतीच्या तेलाचे चोपडण नौकांना लावतात. त्यामुळे नौकेच्या लाकडावर जलरोधक थर राहतो. ताग, चामडे, धातू इत्यादींवर विविध प्रक्रिया करण्यासाठी माशांचे तेल वापरतात. शुद्धीकरण प्रक्रियेत खराब वास घालविल्यावर हे तेल खाद्यतेल म्हणून वापरता येते. या तेलाचे पचन सुलभपणे होते. त्याचा उपयोग मार्गारिन, धुण्याचा साबण आणि स्वस्त प्रकारचा अंगाचा साबण तयार करण्यासाठी केला जातो.

कातड्याच्या उद्योगधंद्यात, रंग, वॉर्निश आणि तत्सम पदार्थ बनविण्यासाठी तेलाचा उपयोग होतो.

मत्स्य पीठ

स्वस्त, फार लहान आणि चवदार नसलेल्या माशांपासून मत्स्य पीठ बनवितात. याचा उपयोग प्रामुख्याने कोंबड्यांच्या आहारात केला जातो.

माशांचे तेल काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेला भाग, छोटे-छोटे तुकडे, कोळंबीचा टाकाऊ भाग वगैरे वाळवून नंतर चूर्ण तयार करतात. यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने कोंबड्या, जनावरांच्या आहारात मिसळतात.

मत्स्यपीठात प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे आणि वाढीस उपयुक्त अशी सूक्ष्मद्रव्ये असतात. पोषणास उत्तम असून कोंबड्याचे पूरक अन्न म्हणून बाजारात उपलब्ध आहे.

कोळंबीसाठी खाद्य म्हणून मत्स्यपीठ हा महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतीच्या माशांपासून तयार केलेले शुद्ध मत्स्य पीठ प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी मानवी आहारात वापरता येईल.

मोत्याचा अर्क, माशांचे खत

बऱ्याचशा जातींच्या माशांच्या खवल्यात ग्वानिन या घटकाचे बारीक, चकचकीत स्फटिक असतात (उदा. तारली, वागटी वगैरे). कृत्रिम मोती बनविण्यासाठी, काचेच्या मण्यांवर आवरण देण्यासाठी या पदार्थांचा मोत्याचा अर्क म्हणून वापर केला जातो. माशांचे खवले पाण्यात भरपूर ढवळल्यावर खवल्यांतून ग्वानिन पाण्यात उतरते. नंतर विरल अमोनिया द्रावाची क्रिया करून खवल्यांपासून त्वचेचे छोटे-छोटे तुकडे वेगळे केले जातात. शुद्ध केलेले ग्वानिन गॅसोलिन आणि लॅकरमध्ये मिसळून काचेच्या बरण्यांमध्ये सीलबंद केले जाते.

खवल्यासहित चामड्यास शाग्रीन म्हणून ओळखले जाते. त्याचा उपयोग चष्याचे झाकण वगैरेसारख्या शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी केला जातो.

तारलीचे तेल काढल्यानंतर उरलेल्या चोथ्यामध्ये नत्र व स्फुरदाचे प्रमाण भरपूर असल्याने याचा उपयोग चहा, कॉफी, नारळ, ऊस, तंबाखू इ. लागवडीत खत (कुटी) म्हणून करतात.

Fish Products
Fish Pond : मत्स्य तळ्यातील स्थानिक माशांचे नियंत्रण

आयसिंग्लास

आयसिंग्लास हे ढोमा व विशेषतः घोळ माशाच्या शरीरात असणाऱ्या हवेच्या पिशवीपासून तयार केले जाते. ही हवेची पिशवी आपल्याकडे बोथ म्हणून ओळखली जाते.

फिश मॉ म्हणूनही ओळखली जाणारी ही हवेची पिशवी इतर माशांच्या प्रजातींमध्येही आढळते. या पिशव्या सुकवून आयसिंग्लास हे उत्पादन तयार होते.

आयसिंग्लासचा उपयोग फळांचे रस, वाइन किंवा बिअरसारख्या द्रवातील अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी केला जातो.

आयसिंग्लास द्रवांमध्ये टाकल्यावर त्यातील तंतू वेगळे होतात. द्रवातील तरंगणारे पण गाळून वेगळे न करता येणारे निलंबित कण आणि इतर अशुद्धता त्यामध्ये अडकते. यामुळे पेय अधिक स्वच्छ आणि आकर्षक होते.

खाद्य पदार्थांमध्ये आयसिंग्लासचा स्थिरीकरण एजंट म्हणून वापर केला जातो. आयसिंग्लास नैसर्गिक आणि प्रभावी उप-उत्पादन आहे, जे खाद्य आणि पेय उद्योगात अत्यंत महत्त्वाचे आहे.

कायटिन, कायटोसान

कायटिन आणि कायटोसान कोळंबी किंवा झिंग्याच्या कवचापासून मिळते. कायटिन एक नैसर्गिक पॉलिमर आहे. कायटोसान म्हणजे कायटिनचा एक रूपांतरित प्रकार आहे, जे कायटिनच्या डिअसेटिलेशन प्रक्रियेद्वारे तयार केला जातो. यासाठी विविध रासायनिक आणि भौतिक पद्धती वापरल्या जातात.

कायटोसानमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते विविध जिवाणूंच्या आणि बुरशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवू शकते.

कायटिन आणि कायटोसानचा वापर औषध, जलशुद्धीकरण, खाद्यपदार्थमध्ये केला जातो. कायटोसानचा वापर पशुखाद्यामध्ये प्रतिजैविक म्हणून केला जातो. यामुळे कोळंबीच्या कचऱ्याचा उपयोग करून मूल्यवर्धन साधता येते. पर्यावरणीय प्रदूषण कमी करता येते.

कोलॅजीन आणि जिलेटिन

माशांची त्वचा आणि हाडांपासून कोलॅजीन आणि जिलेटीन मिळविले जाते. कोलॅजीन हे एक मुख्य प्रथिन आहे, जे त्वचेची लवचिकता, हाडांची मजबुती आणि सांध्यांचे स्वास्थ्य राखण्यासाठी महत्त्वाचे असते.

जिलेटीन हे कोलॅजीनपासून बनवले जाते. खाद्यपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

माशांच्या त्वचा आणि हाडे स्वच्छ करून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यावर आम्लाची प्रक्रिया करून कोलॅजीन मिळते. कोलॅजीनवर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून जिलेटीन मिळवता येते.

माशांच्या त्वचा व इतर टाकाऊ गोष्टींपासून मिळणाऱ्या जिलेटीनचे उत्पादन, माशांची प्रजात, आकार अशा गोष्टींवरही अवलंबून असते. उदा. तिलापिया मासाच्या त्वचेपासून चांगल्या दर्जाचे (१० ते २२ टक्के) जिलेटीन मिळते. जिलेटीनचा वापर मिठाई, जेली, सूप, कँडी आणि आइस्क्रीम तयार करण्यासाठी केला जातो. जिलेटीनचा उपयोग औषधांच्या कॅप्सूलचे आवरण तयार करण्यासाठी केला जातो.

मोठ्या माशांचे पर कापून काढून, चिकटलेले मांस काढून स्वच्छ धुतात. नंतर मीठ चोळतात. त्यावर चुन्याची भुकटी टाकतात. उन्हात त्यातील पाण्याचे प्रमाण सुमारे ७ ते ८ टक्के येईपर्यंत वाळवितात आणि आकाराप्रमाणे पिशवीत बंद करतात. वाळलेले पर ५ ते ६ दिवस पाण्यात भिजत ठेवतात.

हायड्रोक्लोरिक किंवा असेटिक आम्लाबरोबर प्रक्रिया करून परामधील कोलॅजीनचे जिलेटिनमध्ये रूपांतर केले जाते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरिज टेक्नॉलॉजी (सीआयएफटी) या संस्थेने माशांच्या कोलॅजीन पासून शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी वापरले जाणारे धागे (सर्जिकल सूचर) तयार केले आहेत. हे धागे विरघळणारे असल्याने शस्त्रक्रियेत महत्त्वाचे ठरतात.

डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२, (मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com