Weather Update : थंडी फक्त दिवसाच, पहाटेचा गारवा कमीच!

Cold Season : २०२३ च्या ‘एल-निनो’ वर्षात दरवर्षीसारखी थंडी पडत नाही. थंडी या वर्षी कशी वळण घेईल, हे बघणेही गंमतीशीर आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

माणिकराव खुळे

Weather News : २०२३ च्या ‘एल-निनो’ वर्षात दरवर्षीसारखी थंडी पडत नाही. थंडी या वर्षी कशी वळण घेईल, हे बघणेही गंमतीशीर आहे. शुक्रवार (ता. ८)पासून डिसेंबर महिन्यातील थंडीला सुरुवात झाली असली, तरी थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच असल्याचे जाणवते आहे.

दुपारचे सध्याचे कमाल तापमान व त्याचा परिणाम

विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे २७ अंश सेल्सियसच्या, तर विदर्भात २५ अंश सेल्सियसच्या दरम्यान दिसत आहे. म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास ४ अंश सेल्सियसने, तर कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात २ अंश सेल्सियसने कमी आहे. दुपारच्या तापमानातही ठळक व स्पष्ट घट दिसत असल्याने दिवसा चांगलीच थंडी जाणवत आहे.

पहाटेचे सध्याचे किमान तापमान व त्याचा परिणाम

खरेतर डिसेंबर हा अतिथंडीचा महिना. थंडीची तीव्रता मोजण्याचा निर्देशांक हा किमान तापमान हाच अशतो. म्हणजे थंडी कमी किंवा जास्त हे किमान तापमानावरून ठरते. सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असले तरच चांगली थंडी जाणवते.

परंतु या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात (पहाटेचे) किमान तापमान हे १७ अंश सेल्सियस दरम्यान आहे. हे दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा कोकण व दक्षिण महाराष्ट्रात २ अंश सेल्सियसने, तर उर्वरित महाराष्ट्रात जवळपास ४ अंशांनी अधिक आहे. म्हणजेच थंडी जाणवत असली तरी ती कडाक्याची नाही.

Weather Update
Weather Update : थंडी गायब, उकाडा वाढला

डिसेंबरची सध्याची सापेक्ष आर्द्रता व त्याचा फायदा

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डिसेंबर महिन्यात दैनिक सापेक्ष आर्द्रता सकाळच्या वेळेस ७५ ते ८५ टक्के आसपास, तर दुपारनंतरची सापेक्ष आर्द्रता ही ५५ ते ६५ टक्क्यांदरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रतेपेक्षा जवळपास १० ते २० टक्क्यांने कमी आहे. ही ठळक व स्पष्ट जाणवणारी घट आहे.

त्यामुळे दिवसा चांगलीच थंडी वाजते. पण निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळाही नाही. तोही भरपूर असला तरी या काळात दिवसाची लांबी कमी असते. अशा परिस्थितीत दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खूप घसरली आहे. साहजिकच कोरडेपणा अधिक असून, दमटपणा कमी आहे. म्हणून किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असूनही सकाळी थंडी वाजत आहे.

दव कमी पडण्याची कारणे ः

सध्या प्रतिकूल वातावरणामुळे सकाळी  दव किंवा बाष्प विशेष पडत नाही. म्हणजे दरवर्षी पडते त्यापेक्षा कमी आहे. त्यामागील कारणे साधारणपणे पुढील प्रमाणे दिसतात.

निरभ्र आकाश, शांत वारा.

जमिनीतील कमी ओलावा.

जमिनीपासून २-३ किमी अंतरापर्यंत कमी असलेली सापेक्ष आर्द्रता (साधारण साठ सत्तरीकडे झुकणारी).

निरभ्र आकाशामुळे सूर्याकडून येणारी व जमिनीला मिळणारी पुरेशी उष्णता.

पहाटेचे किमान तापमान व दुपारचे कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास तीन अंशांनी वाढ.

असमान हवेचा दाब म्हणजे पहाटेच्या व उशिरा सकाळपर्यंत त्यात होणारा लक्षणीय बदल.

रात्रीचा वाढलेला दवांक निम्न पातळीचा (खोली) निर्देशांक.

सध्या पहाटेच्या वेळी बादड किंवा दव पडत नसल्याचा शेतपिकांना फायदा होऊ शकतो.

थंडीचा हा पॅटर्न कदाचित संपूर्ण हिवाळ्यात म्हणजे फेब्रुवारीअखेरपर्यत असाच राहू शकतो, असे वाटते.

परिणामी, फेब्रुवारी व मार्चमध्ये होणारी गारपीटही कमी होऊ शकते. पुढेही दव पडण्याचे प्रमाण कमी राहू शकते.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे वहनही कमी ः

उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्‍चिमी वारे वायव्येकडून पूर्वेला मार्गस्थ होत आहे. त्यामुळे तेथे थंडी व बर्फ पडत आहे. मात्र ती थंडी खेचण्यासाठी पुरेसे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर नसल्यामुळे ईशान्य वारे कमकुवत आहे. महाराष्ट्राच्या भू-भागावर मूळ स्रोताचे थंड वारे येत नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीचा अभाव दिसत आहे.

(निवृत्त हवामानशास्त्र तज्ज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com