Kolhapur / Sangli News : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी (ता. ३०) रात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने काहीसा दिलासा अनुभवणाऱ्या नागरिकांना पुन्हा धडकी भरली. बुधवारी (ता. ३१) पहाटे राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे सुरू झाल्याने पुन्हा चिंतेत भरच पडली. हे पाणी अजून नदीपात्रात पोहोचले नसल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत धीमी घट असली, तरी वाढणारा पाऊस मात्र चिंतेचे ढग पुन्हा गडद करत असल्याचे चित्र जिल्ह्यात होते.
बुधवारी पहाटे चार ते पाच या एक तासात तब्बल ५ स्वयंचलित दरवाजे उघडले. यापूर्वी आठवडाभर दोन दरवाजे सुरू असल्याने सात ही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. दुपारी बारा वाजता एक दरवाजा पुन्हा बंद झाला. पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी ५ नंबरचा, तर अवघ्या मिनिटांनी ३ नंबरचा यानंतर ५ वाजून १६ मिनिटांनी ४ नंबरचा ५ वाजून ३३ मिनिटांनी १ नंबरचा यानंतर ५ वाजून ५५ मिनिटांनी २ नंबरचा असे अवघ्या तासाभरात उर्वरित पाच स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून पहाटे ६ वाजता १७२ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. भोगावती नदी पात्रात सर्व स्वयंचलित दरवाजांचा मिळून १० हजार क्युसेक, तर विद्युतगृहासाठीचा १ हजार ५०० क्युसेक असा एकूण ११ हजार ५०० क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.
या विसर्गामुळे पंचगंगेची पाणीपातळी गुरुवारी रात्रीपासून पुन्हा वाढणार असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदी अद्यापही धोका पातळीच्यावरून वाहत असल्याने पाणी संथ गतीने कमी होत आहे.
वारणेतून विसर्ग वाढवला
वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने बुधवारी (ता. ३१) दुपारी साडेबारा वाजता वारणा धरणातून सद्यःस्थितीत सुरू असलेल्या ८०९२ क्युसेक विसर्गात वाढ करून वक्री दारातून १० हजार ११५ क्युसेक व पॉवर हाउसमधून १ हजार ४७० क्युसेक, असे एकूण ११ हजार ५८५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आले.
यामुळे धीम्या गतीने कमी होणाऱ्या पाण्याला पुन्हा ब्रेक लागला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये काही ठिकाणी वाढ काही ठिकाणी घट असे चित्र सुरूच आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण सांडव्यावरून गुरुवारी सकाळी दहा वाजता १ हजार ५०० ने सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून २ हजार इतका विसर्ग करण्यात आला
अलमट्टी धरणातून सध्या ३ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक आणि पूरस्थिती पाहूनच विसर्ग वाढवणे, कमी करण्याचा निर्णय चर्चा करून घेतला जाणार असल्याची शक्यता संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व गेट उघडण्यात आले आहेत.
मात्र काल हिप्परगी बंधाऱ्याजवळ फुगवटा वाढला. त्यामुळे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. मंगळवारी दिवसभर ३ लाख क्युसेकने सुरू असलेला विसर्ग बुधवारी रात्री ५० हजार क्युसेकने वाढवून तो ३ लाख ५० हजार क्युसेक इतका केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.