Food Processing : चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच स्वादासह २५ प्रकारच्या शेवया

Shevai Making : गुंजोटी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील सौ. अस्मिता अविनाश सूर्यवंशी यांनी ज्वारी, गव्हाच्या पारंपरिक पद्धतीच्या शेवयांसह नाचणी, सावा, भगर, राळे आणि चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, अननस अशा स्वादांमधील २५ प्रकारच्या शेवया निर्मितीतून बाजारपेठेत वेगळी ओळख तयार केली. या शेवयांचा ‘राजलक्ष्मी’ ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे.
Food Processing
Food ProcessingAgrowon

सुदर्शन सुतार

Food Processing Industry : गुंजोटी (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील सौ. अस्मिता अविनाश सूर्यवंशी यांनी ज्वारी, गव्हाच्या पारंपरिक पद्धतीच्या शेवयांसह नाचणी, सावा, भगर, राळे आणि चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, अननस अशा स्वादांमधील २५ प्रकारच्या शेवया निर्मितीतून बाजारपेठेत वेगळी ओळख तयार केली. या शेवयांचा ‘राजलक्ष्मी’ ब्रॅण्ड त्यांनी तयार केला आहे.

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याच्या बाजूला अवघ्या चार किलोमीटरवर गुंजोटी हे बाजारपेठेचे गाव आहे. येथील सौ. अस्मिता अविनाश सूर्यवंशी या पंधरा वर्षांहून अधिक काळ शेवया निर्मिती व्यवसायामध्ये आहेत. त्यांची घरची नऊ एकर शेती होती. पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना ती विकावी लागली. यानंतर पुढे काय? हा त्यांच्या समोर प्रश्‍न होता. साधारण २००६ ची ही गोष्ट. पती अविनाश हे शेतीच करत होते, त्यांचेही काम सुटले. पृथ्वीराज, धनराज ही दोन मुले अनुक्रमे चौथी आणि दुसरी इयत्तेत शिकत होती. तर मुलगी राजलक्ष्मी ही केवळ चार वर्षाची होती. या संकटामुळे त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा विचार केला. त्याचवेळी गावात एक महिला घरगुती शेवया करून विक्री करत होती. त्यांच्याकडून याची थोडी माहिती घेतली आणि पुढे त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला. पुढे बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन हस्तचलित शेवया निर्मिती यंत्र घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. आज हाच व्यवसाय कुटुंबीयांचे आयुष्य उभे करण्यात महत्त्वाचा ठरला. काळानुरूप बदल करत त्या प्रक्रिया व्यवसायात आघाडीवर आहेत. सध्या त्यांचे पती अविनाश हे भाडेकरारावर शेती करतात, त्यातूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. मोठा मुलगा पृथ्वीराज मेकॅनिकल इंजिनिअर झाला, धनराज एमएस्सी करतो आहे. मुलगी राजलक्ष्मीचे डी फार्मसीचे शिक्षण झाले आहे. ही सगळी किमया केवळ शेवया व्यवसायाची आहे.

‘उमेद’ची मिळाली साथ...
अस्मिताताई पंधरा वर्षांहून अधिक काळ शेवया निर्मिती व्यवसायात आहेत. गावातील महिला त्यांच्याकडे पीठ आणून द्यायच्या आणि त्यापासून त्या शेवया करून द्यायच्या, असा त्यांचा व्यवसाय होता. २०१७ पर्यंत शेवयाचे खास असे ब्रॅण्डिंग, गावाबाहेर विक्री असा कोणताच प्रयत्न त्यांनी केला नव्हता. पण त्याच वर्षी त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) संपर्कात आल्या. या अभियानाच्या धाराशिव जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, उमेदचे गोरक्षनाथ भांगे, तालुका व्यवस्थापक बाबासाहेब नाईक यांनी त्यांना साह्य केले. शेवयाच्या मार्केटिंग, ब्रॅण्डिंगसह निर्मिती आणि विक्री परवाना आणि आवश्यक प्रशिक्षण त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यात उमेद जागी झाली.

Food Processing
Food Processing : औद्योगिक अवलंबनावर परिणाम करणारे घटक

शेवयासाठी स्वयंचलित यंत्रणा ः
पूर्वी अस्मिताताई जुन्या पद्धतीच्या यंत्राचा वापर करून शेवयानिर्मिती करत होत्या. ‘उमेद’च्या संपर्कात आल्यानंतर शेवयांचा प्रचार आणि प्रसार चांगला वाढला, व्यवसाय वृद्धी होऊ लागली. तेव्हा त्यांनी पीठ मळण्यासह शेवया निर्मितीसाठी स्वयंचलित यंत्रणा घेतली. यासाठी सव्वा लाखाची गुंतवणूक केली. या यंत्रावर एका दिवसात एकावेळी किमान ५० किलो शेवया तयार होतात.

शेवयाचे २५ स्वाद...
अस्मिताताई पूर्वी फक्त गव्हाच्या शेवया करत. अन्य धान्ये तसेच विविध स्वादांचा विचार त्यांनी कधी केला नव्हता. पण बाजारपेठेचा अंदाज, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी बदल केला. आज त्यांच्याकडे पारंपरिक शेवयांसह सोयाबीन, गाजर, मेथी, पालक, गव्हांकुर, काळे गहू यापासून शेवया होतात. तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी, कोडो, सावा, भगर आणि राळ्यापासून शेवया तयार केल्या जातात. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, अननस यासारखे

Food Processing
Food Processing : प्रक्रिया उद्योगासाठी ३७९ कोटींचे अनुदान

नावीन्यपूर्ण सुमारे २५ स्वादांच्या शेवया त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
आकर्षक पॅकिंग, ब्रॅण्डिंगमुळे बाजारपेठेत ग्राहकांकडून विविध स्वादाच्या शेवयांना चांगली मागणी वाढली आहे. २०१९ मध्ये १०० क्विंटल, त्यानंतर २०२० मध्ये २०० क्विंटल, २०२१ मध्ये २५० क्विंटल, २०२२ मध्ये ३०० क्विंटल आणि यंदा आतापर्यंत २०० क्विंटलच्याही पुढे शेवयांची विक्री झाली आहे.

महिलांना मिळाला रोजगार
गेल्या काही वर्षांत अस्मिताताईंनी महिलांचे उत्तम संघटन केले आहे. आधीपासूनच त्या राजलक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत होत्या. या गटाबरोबरच नव्याने श्री स्वामी महिला बचत गट त्यांनी स्थापन केला. यामध्ये १५ महिला सभासद आहेत. त्यापैकी १० महिलांना त्यांनी शेवया निर्मिती व्यवसायात रोजगार दिला आहे.


‘राजलक्ष्मी’ ब्रॅण्ड
शेवयासाठी अस्मिताताईंनी आकर्षक पॅकिंग आणि ब्रॅण्डिंगवर भर दिला. शेवया विक्रीसाठी ‘राजलक्ष्मी’ ब्रॅण्ड तयार केला. शंभर ग्रॅमच्या पाकिटापासून मागणीप्रमाणे आणि सुट्या पद्धतीनेही त्यांच्याकडे शेवया उपलब्ध आहेत. स्वादानुसार प्रति किलो २०० ते ३५० रुपये या दराने शेवयांची विक्री होते.

थेट ग्राहकांसह प्रदर्शनातून विक्री
अस्मिताताईंकडे शेवयांच्या खरेदीसाठी थेट ग्राहक येतात. तसेच उमेदसह विविध संस्थांच्या छोट्या-मोठ्या प्रदर्शनातून त्या शेवया विक्रीसाठी स्टॉल लावतात. आतापर्यंत त्यांनी मुंबईमधील महालक्ष्मी सरस प्रदर्शनासह खारघर, धाराशिव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील प्रदर्शनात शेवयाची विक्री केली आहे. गेल्या वर्षी हिमाचल प्रदेशमधील सिमला, धर्मशाळा येथे झालेल्या प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला होता.

पुरस्कारांनी सन्मान
अस्मिताताईंना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), श्री तुळजाभवानी जिल्हा महोत्सव आणि महिला व बालक विकास प्रकल्पातर्फे महिला उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या धडपडीमुळे उमेद अभियानाने त्यांना कृषीसखी म्हणून जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून परिसरातील गावातील शेतकऱ्यांना त्या जिवामृत, दशपर्णी अर्कासह पोषणबाग आणि सेंद्रिय शेती पद्धतीबाबत विशेष मार्गदर्शन करतात.
--------------------------------------------
संपर्क ः सौ. अस्मिता सूर्यवंशी, ७०६६१०९७८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com