Dr. Jane Goodall Research on Chimpanzee : गोम्बेच्या परिसरात पोहोचल्यावर जेन गुडॉलने लगेचच आपल्या संशोधन कामाला सुरुवात केली. ती सकाळीच उठून जंगलात चिंपांझींना शोधायला निघायची. सुरुवातीला तिच्यासोबत दोन स्थानिक मुलं यायची, जेनला त्यांची सोबत नको होती. कारण एकापेक्षा अधिक जणांना एकत्र पाहून चिंपांझी दूर पळून जातील, अशी तिला काळजी वाटत होती.
ती मुलं थोड्याच दिवसांत कंटाळली आणि जंगलात येणं टाळू लागली. आईला मात्र जंगली श्वापदं आणि विषारी कीटक याबाबत जेनची काळजी वाटत राहायची. ती दिवसभर कॅम्पवरच्या तंबूतली कामं आटोपत राहायची, आजूबाजूच्या लोकांशी ओळखी करून घ्यायची.
तिच्याकडे प्रथमोपचाराचं साहित्य होतं, त्याच्या मदतीने ती स्थानिक लोकांच्या दुखण्यांवर उपचार करायची.जेनसाठी सुरुवातीचे काही दिवस फार निराशेचे गेले. मैलोन् मैल भटकूनसुद्धा तिला चिंपांझींचं दर्शन होत नव्हतं. त्या नैराश्यातून बाहेर येण्यासाठी तिला आईची फार मदत व्हायची.
तीन महिन्यांनी गुडॉल मायलेकी मलेरियाने आजारी पडल्या. दोन, तीन आठवडे त्या तापाने फणफणल्या होत्या. पण तिथे ना मलेरियाची औषधं होती, ना डॉक्टर. होडीने प्रवास करून किमोगाला जाण्याचं बळही त्यांच्या अंगात नव्हतं. या काळात डॉमिनिकने त्यांची मनापासून शुश्रूषा केली.
बरी झाल्यावर जेन पुन्हा जंगलात जायला लागली. एके दिवशी एका टेकडीवर चढलेली असताना चिंपांझींची एक मोठी टोळी तिच्या स्पष्टपणे नजरेस पडली. जेन आनंदाने हरखून गेली. लवकरच तिने त्यांच्या वास्तव्याच्या जागा शोधून काढल्या. सुरुवातीला चिंप्स तिच्या उपस्थितीबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त करायचे. तिही घाबरायची.
पण हळूहळू त्यांनी जेनकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि जेनची भीतीही चेपली. चिंपांझींनी आपल्याला स्वीकारावं म्हणून ती जंगलात झाडांखाली रात्रीचा मुक्काम करू लागली, मळके कपडे घालू लागली. गोम्बेमधल्या वास्तव्याच्या काळात जेनने चिंपांझींच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनाचा, भावभावनांचा अभ्यास केला. त्यासंबंधीची मुद्देसूद निरीक्षणं ती आपल्या डायरीत रोज नोंदवत होती.
माणसांप्रमाणेच चिंपांझींमध्येही मैत्री, प्रेम, वात्सल्य, असूया, आकर्षण आणि वर्चस्व गाजवण्याची आवड अशा भावना असतात, हे तिच्या लक्षात आलं. इतकंच नव्हे तर चिंपांझी माणसांप्रमाणे शस्त्र बनवून वापरतात हेही तिने शोधून काढलं. एका चिंप्सला तिने गवताची काडी वारुळात खोचून त्यावर चिकटून येणाऱ्या मुंग्या खाताना बघितलं होतं. काही चिंप्स दगडाने पोळ्यातील मध काढून खातात हेही तिने पाहिलं होतं. चिंपांझी मुख्यतः शाकाहारी असतात असं तोवर मानलं जात होतं, पण ते शिकार करून मांसाहारसुद्धा करतात, हे जेनने पुराव्यानिशी शोधून दाखवलं.
चिंप्स समूहात सामंजस्याने राहतात, त्यांच्यात वागण्याचे काही नियम आहेत, ते आपल्यातील शक्तिशाली नराचं नेतृत्व मान्य करतात आणि समूहातील लहान बाळांचं मायेने संगोपन करतात हे जेनने अभ्यासलं. अभ्यासाच्या सोयीसाठी तिने चिंप्सला त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरून डेव्हिड, गोलीएथ, फिफी, माईक, ओली आणि सोनिया अशी नावं दिली होती. अधूनमधून जेन केंब्रिज विद्यापीठात जाऊन येत होती. आपल्या संशोधनाच्या बळावर जेनने पीएच. डी. मिळवावी, असा डॉ. लिकी यांचा आग्रह होता.
सहा महिन्यांनी जेनची आई वेन लंडनला परत गेली. त्यामुळे जेनला एकटेपणा जाणवू लागला होता. पण लवकरच डॉ. लिकी यांच्या शिफारशीने ह्युगो नावाचा एक व्यावसायिक फोटोग्राफर तरुण जेनच्या कॅम्पवर येऊन राहिला. लिकी यांच्या सांगण्यावरून तो नॅशनल जिओग्राफीकसाठी डॉक्युमेंटरी बनवायला आला होता.
जेन आणि ह्युगो दिवसभर जंगलात जाऊन चिंपांझींचा अभ्यास करत होते, फोटो घेत होते. त्यांनी कॅम्पवर चिंप्ससाठी केळी ठेवायला सुरुवात केल्याने त्यांचं अगदी जवळून निरीक्षण करता येणं शक्य झालं. चिंप्स आता स्पर्श करू देण्याइतपत जवळ येऊ लागले होते. पण अधूनमधून त्यांचा आक्रस्ताळेपणा उफाळून यायचाच. ते कॅम्पवरील साहित्याची नासधूस करायचे. जेनला कधी कधी त्यांच्या वागण्याची भीतीही वाटायची.
जेनप्रमाणे ह्युगोला सुद्धा प्राण्यांबद्दल ममत्व होतं. दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या होत्याच, पुढे त्यांची मनं देखील जुळली. जेन आणि ह्युगो विवाहबद्ध झाले. त्यांचा मुलगा ग्रब याचा जन्मही गोम्बेच्या कॅम्पवर चिंपांझींच्या सहवासात झाला. जेन आपलं संशोधन दर महिन्याला डॉ. लिकी यांच्याकडे पाठवत होती. ते नामांकित वृत्तपत्रं आणि मासिकांत छापूनही येत होतं. त्यामुळे जेनला वेगवेगळ्या संस्थांकडून संशोधनासाठी मदत मिळत राहिली. गोम्बेत लिहिलेल्या डायऱ्यांच्या आधारे जेनने आपलं आत्मचरित्र लिहिलं, ‘इन द शॅडो ऑफ मॅन’ या पुस्तकाला जगभर प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जेन एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली.
कायद्याने बंदी असूनसुद्धा आफ्रिका, अमेरिका आणि युरोपात चिंपांझींची मांसाहार आणि इतरही कारणांसाठी तस्करी होत होती. प्राणिसंग्रहालयांत ठेवलेल्या चिंपाझींचीही नीट काळजी घेतली जात नाही, त्यांना क्रूरपणे वागणूक दिली जाते हे पाहून जेन अस्वस्थ झाली. हे थांबविण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटू लागलं. आपल्या कामासाठी तोवर जेनला अनेक आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले होते.
आपल्या प्रसिद्धीचा आणि मिळालेल्या पैशांचा तिने विधायक वापर करून घेतला. ‘जेन गुडॉल इन्स्टिट्यूट’च्या मदतीने तिने ‘टेक केअर’ हा कार्यक्रम आखला. त्याअंतर्गत जंगलतोड थांबवणे, वनीकरण, खेड्यातील लोकांचं जीवनमान उंचावणे, आरोग्यसुविधा, जनजागृती, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षण अशी कामं हाती घेतली गेली.
वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, अभयारण्ये आणि चिंपांझींचे पुनर्वसन यासाठी जेनने बळ पुरवलं. ‘रूट्स अँड शुट्स’ या कार्यक्रमातून तिने जगभरातील युवकांशी संवाद साधला. पर्यावरण आणि मानवतावादाबद्दल त्यांच्यात जाणीवजागृती केली. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी जेनला २०२१ या वर्षीचा टेम्पलटन हा अतिशय मानाचा पुरस्कार दिला गेला. चिंपांझींवरील संशोधनासाठी तिला डॉक्टरेटही प्रदान करण्यात आलेली आहे.
संशोधन काळात कौटुंबिक जीवनात वेदनादायी आघातही जेनला सोसावे लागले. तरीसुद्धा ती आपल्या ध्येयापासून तसूभरही ढळली नाही. तिने चिंपांझींच्या जीवनपद्धतीबद्दल अनेक अभ्यासपूर्ण निरीक्षणे आपल्या भाषणांतून मांडली, काही महत्त्वपूर्ण ग्रंथही लिहिले. तिचं काम खरोखर अतुलनीय म्हणावं असंच आहे.
या कामाचं जगभर अनेक जण अनुकरण करत आहेत. १९८० नंतर डॉ. जेन गुडॉल यांनी संशोधनकार्यातून काहीशी उसंत घेत पर्यावरण चळवळीत स्वतःला वाहून घेतले आहे. सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखणे या बाबी अतिशय कळीच्या आहेत, असे त्यांना वाटते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.