
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील जवळपास ४ लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. या मोहिमेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह परिमंडलातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी सामील झाले आहेत.
थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणीही या मोहिमेत करण्यात येत आहे.अनधिकृत वीजपुरवठा घेतलेला आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा इशारा महावितरणच्यावतीने देण्यात आला आहे.जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे.
तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. वीजग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा उपविभागात शनिवारी (ता. १५) मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी स्वत: थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची पडताळणी केली.
यात काही थकबाकीदार ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित केला असतानाही वीजबिल प्रतिसाद न दिल्याने त्यांचे मीटर काढून घेण्यात आले. मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीजबिल वसुलीस वेग आला आहे. मोहिमेत शेकडो ग्राहकांनी तातडीने बिल भरून सहकार्य केले. अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले. दरम्यान, मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ३४१३, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १४८७ व जालना मंडलातील १६११ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी तात्पुरता खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली.
अशी आहे थकबाकी
वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील जवळपास ४ लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील १ लाख १२ हजार २७१ ग्राहकांकडे ५१ कोटी ५४ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १ लाख ७२ हजार ८६७ ग्राहकांकडे ५५ कोटी ५२ लाख व जालना मंडलातील १ लाख १४ हजार ४२३ ग्राहकांकडे १०७ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.