सतीश खाडे
Water Management : सर्वच डोंगराळ प्रदेशात पाऊस भरपूर पडत असला तरी हे पाणी बहुधा वाहून जाते. कारण पाण्याच्या प्रवाहाची मोठी व्याप्ती आणि प्रचंड वेग यामुळे पाणी साठवणुकीवर मर्यादा येतात. या भागात सिमेंट काँक्रीट बंधारे बांधतानाही भिंतीची रुंदी अधिक ठेवावी लागते. तसेच संरक्षण भिंतीची लांबीही बरीच अधिक ठेवावी लागते. त्यामुळे या भागात सिंमेट बंधारे बांधणे हे अधिक खर्चिकही ठरते. इतके करूनही पाण्याच्या वेगामुळे तयार होणाऱ्या मोठ्या दबावापुढे ते कितपत टिकाव धरतील, याबाबत साशंकता राहते. त्याच प्रमाणे पावसाळ्यात भरपूर पावसामध्ये उन्मळून पडलेली झाडे, तुटलेल्या लहान मोठ्या फांद्या वाहून बंधाऱ्यात येत राहतात. त्यामुळे वरील भागामध्ये थोड्या काळासाठी का होईना, पूरजन्य परिस्थिती तयार होते. पाण्याला अडथळा तयार झाल्यामुळे ओढ्याच्या बाजूच्या शेतामधून हे वेगाने पाणी वाहू लागते. जाताना शेतातील सुपीक माती वाहून नेते. काही ठिकाणी तर यामुळे ओढ्यांचे मार्ग सुद्धा बदलले पाहण्यात आले आहेत.
या बंधाऱ्यांचा आणखीन एक महत्त्वाचा तोटा म्हणजे वरच्या भागातील डोंगरावरून वाहून आलेले दगड, गोटे, वाळू व रेवसा (रेवसा म्हणजे भरड, दगड, वाळूपेक्षा थोडे मोठे, माती मिश्रित गोटे.) या बंधाऱ्यात अडकून राहतात. बंधाऱ्याच्या मागील भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साठतो. परिणामी नदी, ओढ्याचे पात्र हळूहळू अरुंद व उथळ होत जाते. त्यामुळे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमतेबरोबर पाणी जमिनीत मुरवण्याची क्षमताही कमी होत जाते.
या तोट्याबरोबरच जीवसृष्टीसाठीही हे बंधारे अरिष्ट ठरतात. नदी व ओढ्यात असणाऱ्या माशांच्या मुळावरच उठतात हे बंधारे! पावसाळा बहुतांश सर्व माशांच्या विणीचा (प्रजननाचा) काळ आहे. बऱ्याच माशांची प्रसूतिगृहे ही डोंगरांमधील छोट्या ओढ्यामध्ये आणि शेतांमध्ये असतात. हे मासे पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्यातून उताराच्या विरुद्ध बाजूस वर चढतात. समुद्रातील मासळी खाडीमध्ये, खाडीतील मासळी नदीमध्ये, नदीतील मासळी छोटे ओढे-नाले यांच्यामध्ये प्रवाहाच्या उलट दिशेने प्रवास करून येते. पावसाळ्यातील सुरुवातीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दाखल होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारा, केरळ किनारा तसेच पूर्व किनाऱ्यावरील सर्व खाड्या यातून मासे वर वर जात असतात. जगातील साऱ्या नद्या व ओढे यात हे होत असते. नदीतली ही मासळी साधारण आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रात डोंगरातील छोट्या ओढ्यांच्या पात्रात किंवा त्या जवळपासच्या शेतांमध्ये अंडी घालते. त्यातून त्यांची पिलावळ जन्माला येते. ती स्वतः पुढील अनेक मोठ्या अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही पिले थोडी मोठी झाल्यानंतर उत्तरा नक्षत्रात पाऊस कमी व्हायच्या काळात उतारावरून वाहून नद्या, खाड्या यांच्या भागात, तर काही खोल मोठ्या समुद्रात निघून जातात.
या माशांच्या प्रवासाला प्रवाहांमध्ये बांधलेल्या बांधांचा अडथळा होतो. त्यामुळे मासोळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी पोचण्यास आडकाठी होते. तसेच त्यातूनही जे मासे नदी, नाले, ओढे येथे पोहोचतात, अंडी घालतात. त्यांची पिलेसुद्धा पुढे बांधामुळे अडकली जातात. ती समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी या माशांच्या संख्येमध्ये घट होत राहते.
थोडक्यात सांगायचे तर उन्हाळ्यात पाणी मिळविण्यासाठी, पर्यावरण बदलाला तोंड देण्यासाठी नदी, ओढे, नाले यांच्या पात्रातील पाणी अडवून साठवले तर पाहिजेच. परंतु ते अशा पद्धतीने साठवले पाहिजे, की ते पाणी पावसाळ्यामध्ये मुक्तपणे वाहत राहील. ज्यायोगे वाहणाऱ्या पाण्याला अडथळा होणार नाही. वाहत येणारे गाळ, दगड-गोटे वाहून जातील आणि वर चढणाऱ्या मासळीलाही त्रास होणार नाही. म्हणजेच आपल्याला बांध तर हवाच, पण तो धो-धो पडणाऱ्या पावसात नको, तर पाऊस संपता संपता पात्रांमध्ये घालता यायला हवा. ज्यामुळे शेवटच्या पावसामधील पाणी पावसाळा संपल्यानंतरही नदी, ओढ्यामध्ये साठून राहील. या विचारांमधूनच ‘नॅचरल सोल्यूशन’ या पाणी व पर्यावरणावर प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कंपनीचे डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली घडीच्या बांधांचे बांधकाम केले गेले. ही संकल्पना २०११ मध्ये प्रथम शहापूर तालुक्यात वेहळोली येथे, व नंतर २०१६ मध्ये मुरबाड तालुक्यात अंबेमाळी येथे प्रत्यक्षात आणली गेली. तसेच २०१९ मध्ये कडवाई येथे ३ बंधारे बांधले. २०१९ व २०२० मध्ये बदलापूरजवळ बेंडशीळ गावात कृषिभूषणप्राप्त शेतकरी राजेंद्र भट यांच्या शेताशेजारून वाहणाऱ्या ओढ्यावर असे बांध तयार केले आहेत. हा बंधारा पावसाळ्यामध्ये पूर्णपणे काढून ठेवता येतो. तसेच या बंधाऱ्याचा एकही खांब पावसाळ्यात नदीमध्ये दिसत नाही. या बांधांना ‘निसर्गमित्र बांध’ असे समर्पक नाव राजेंद्र भट यांनी सुचवले.
...अशी असते बंधाऱ्याची साधारण रचना
बांध बांधताना जागेची निवड सर्वात महत्त्वाची ठरते. जागेची निवड करताना भक्कम खडकाचा पाया, प्रवाहाला उंच काठ, कमीत कमी उतार असे निकष लावले जातात. काँक्रीटचा भक्कम पाया तयार करून त्यात प्लेट्स जोडण्यासाठी ॲंगल रोवून ठेवतात. ॲंगलला नटबोल्टने प्लेट्स जोडतात. हे जोड इतके घट्ट असतात की त्यातून पाणी गळती होत नाही. या पोलादी प्लेटला पुढील बाजूने लोखंडी ॲंगलचेच सपोर्ट दिले जातात. यामुळे प्लेट्सवर येणारा पाण्याचा दाब सहन करणे शक्य होते. बंधाऱ्यातील साठलेले पाणी शेताला देण्याची सोय सुलभ व्हावी, यासाठी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना फ्लँजयुक्त पाइपही बसवलेले असतात. तसेच अतिरिक्त पाणी वाहून जण्यासाठी (ओव्हर फ्लो) सांडवा काढलेला असतो. पहिला पाऊस पडण्यापूर्वी हा बंधारा नदीच्या किंवा ओढ्याच्या पात्रातून काढून ठेवायचा. या प्लेट काढण्याआधी बंधाऱ्यातील पाणी काढून टाकून रिकामा करण्याची गरज भासल्यास त्यासाठी बंधाऱ्याच्या तळाशी फ्लँजयुक्त पाइप ठेवलेला असतो. पावसाळ्यात पात्रामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा राहत नाही. परिणामी, पुढील पूरस्थितीसह मासळीच्या जिवितासाठीची सर्व अघटिते टाळता येतात.
पाण्याच्या प्रवाहानुसार म्हणजेच छोट्या ओढ्यांमध्ये गणेशोत्सवाच्या आसपास, त्याहून थोड्या मोठ्या ओढ्यांमध्ये दसऱ्याच्या आसपास आणि भरपूर पाणी असलेल्या नदी किंवा मोठ्या ओढ्यांमध्ये दिवाळीच्या आसपास हा बंधाऱ्याला पूर्ववत नट बोल्टचा वापर करून पात्रांमध्ये उभा करायचा. म्हणजे थोडबहूत वाहते आणि शेवटच्या काही पावसाचे पाणी साठून राहते. या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पाणी साठून कोणाचेही शेत पाण्याखाली जात नाही.
मर्यादा :
निसर्गमित्र घडीचे बांध ज्या नदीच्या पात्रातील पाणीपातळी खूप कमी असते, त्यावर घालता येतात. पावसाळ्यानंतर तीन-चार महिने वाहत्या राहणाऱ्या छोट्या नद्या, नाले, ओढे यावर हे बांध घालता येतात. मात्र जिथे नदीच्या पाण्याची पातळी साधारण दीड ते दोन फूट पेक्षा जास्तच राहत असेल अशा ठिकाणी हे घडीचे बांध यशस्वी होत नाहीत.
घडीच्या बंधाऱ्याचे फायदे :
घडीचे बंधारे काढणे आणि बसवणे तुलनेने सोपे असून, त्यासाठी फार कमी वेळ लागतो.
पावसाळ्यात वाहत्या पाण्याला कोणताच अडथळा निर्माण होत नसल्याने पूरस्थिती टाळली जाते.
या बंधाऱ्यात गाठ फारसा साठत नाही. त्यामुळे पाणी साठवण क्षमता अधिक राहते.
या बंधाऱ्याच्या प्लेट या एकमेकांशी एकसंध जोडता येतात. त्यातून गळती फारशी राहत नाही.
थोड्या वाहत्या प्रवाहातसुद्धा हा बंधारा जोडता येतो.
या बंधाऱ्याला सांडवा (ओव्हर फ्लो जाण्यासाठी) काढता येतो.
सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.