Maharashtra Assembly: मराठीवरून सभागृहांत गदारोळ

Marathi Controversy: मराठी भाषेवरून विधिमंडळात तुफान गदारोळ झाला. भैयाजी जोशी यांच्या मराठीविरोधी वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले, विधान परिषद दोन वेळा तहकूब झाली, तर विधानसभेत भाजप आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने आले!
Maharashtra Assembly
Maharashtra AssemblyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी मुंबईत केलेल्या मराठीविरोधी वक्तव्याचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी मांडत सरकारला कोंडीत पकडले. या मुद्द्यावर विधान परिषद दोन वेळा तहकूब झाली, तर विधानसभेत मराठी हीच महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा असेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकला.

त्यानंतर अभिनंदनासाठी उभे राहिलेल्या आदित्य ठाकरे यांना भाजपचे मंत्री आशिष शेलार, नितेश राणे आणि अन्य आमदारांनी रोखल्याने जोरदार गोंधळ झाला. या वेळी सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. तरीही एकमेकांसमोर जात हातवारे केल्याने तणाव निर्माण झाला.

Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Budget Session : शेतीच्या अनेक प्रश्‍नांना उत्तराची प्रतीक्षा

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) भास्कर जाधव यांनी मराठीचा विषय उपस्थित करताना सांगितले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथे संबोधन करताना घाटकोपरमध्ये गुजराती समाजाची संख्या जास्त आहे, त्यामुळे येथे गुजराती भाषा बोलली गेली तरी हरकत नाही, असे विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. यावर फडणवीस म्हणाले, ‘मुंबई-महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहणार. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, प्रत्येकाला ‘मराठी’ बोलता आली पाहिजे.’

विधान परिषद दोन वेळा तहकूब

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद विधान परिषदेतही उमटले. शिवेसेनेच्या ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी यासंदर्भात २८९ अन्वये मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती प्रा. राम शिंदे यांनी फेटाळला. त्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.

Maharashtra Assembly
Agriculture Minister Manikrao Kokate: कोकाटेंच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती; न्यायालयाचा मोठा निर्णय!

मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरवले. मात्र याच मराठी भाषेला दुय्यम दर्जाची वागणूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा अपमान सहन केला जाणार नाही. त्याचप्रमाणे मराठी भाषेवरील अन्याय, अपमानही सहन केला जाणार नाही. आरएसएसला मराठी भाषेला, मराठी माणसाला डावलून मुंबईतील भागांचे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय असे भाषिक तुकडे करायचे आहेत का, असा सवाल करत सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी परब यांनी केली.

काँग्रेसचे भाई जगताप यांनी आता मुंबईत विभागनिहाय भाषा वापरली जाणार आहे का? काही काळानंतर मुंबईचा कारभार गुजरातीत होणार असल्याचे संकेत सरकार देत आहे का? असा सवाल केला. सभापती राम शिंदे यांनी हा स्थगन प्रस्ताव दालनात फेटाळल्याने सांगताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली. झालेल्या गदारोळामुळे दोन वेळा १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

आदित्य ठाकरेंना रोखले

या वेळी आदित्य ठाकरे हे अभिनंदन करण्यासाठी बोलायला उभे राहिले. मंत्री नितेश राणे आणि इतर भाजप सदस्यांनी आता मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता हे काय बोलणार, असे म्हणत ठाकरे यांना रोखले. नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यात मंत्री आशिष शेलार यांनी उडी घेतली. त्या वेळी आक्रमक झालेल्या ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले.

राणे, शेलार, योगेश सागर, अमित साटम यांच्यासह अन्य आमदार हातवारे करत ठाकरे यांच्याकडे पाहून बोलत होते. तर ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदारही आक्रमक झाले. त्यामुळे सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब केले. त्यानंतरही हा वाद सुरू झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार संजय कुटे यांनी मध्यस्थी करत सदस्यांना शांत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com