छाया वारंगे
रोजचे अन्न म्हटले तरीही वरण, भात, भाजी, पोळी किंवा असे अन्नाचे ताट नजरेसमोर येते. मात्र घरात अन्न शिजत असले तरी त्यासाठी लागणारे घटक धान्ये, कडधान्ये, डाळी, मसाल्याचे पदार्थ असे सर्व काही बाजारातून खरेदी करून आणावे लागते. ही खरेदी करताना दुकानात दिसणाऱ्या वस्तू निरखून, पारखून घेण्याचा प्रयत्न आपापल्या परिने प्रत्येकजण करत असतो आणि त्यानुसार त्याचे आर्थिक मूल्यही देत असतो. ग्राहक आज खूप जागरूक, सुजाण व सजग झाला आहे.
कोणतीही वस्तू खरेदी करताना खूप सजग असतो. अनेक बाबींचा विचार करून वस्तू खरेदी करतो हे योग्यच आहे.कोणतीही वस्तू खरेदी करताना, त्यासाठीचे आर्थिक मूल्य मोजताना त्या वस्तूची गुणवत्ता, दर्जा पारखून त्यासाठी मोजले जाणारे आर्थिक मूल्य याचीही सांगड घालतो. ग्राहकांच्या गरजा, अपेक्षा, समाजातील भिन्न आर्थिक स्तरातील ग्राहकांची खरेदी करण्याची अपेक्षा क्षमता हा दृष्टिकोन ठेऊन शेतकऱ्यांकडून शेतीमाल उत्पादन झाले तर शेतकऱ्यांनाही योग्य बाजारभाव मिळेल व ग्राहकही खूष होतील. समाजातील भिन्न आर्थिक स्तरातील ग्राहकांच्याकडून आर्थिक मूल्यानुसार जे खरेदी केले जाईल तेही योग्य दर्जाचे उत्पादन शेतकऱ्यांनी सामंजस्याने केले तर ग्राहक आणि शेतकरी यांचे सुख साधले जाईल.
शहरी ग्राहकांची मागणी
बदलत्या काळानुसार कुटुंबातील सदस्यांची संख्या रोडावत चालली आहे. तांदूळ आणि गव्हाचा विचार केला तर, पॉलीश तांदळाऐवजी लाल तांदळाला मागणी वाढली आहे. गव्हाऐवजी ज्वारी हा पर्याय निवडला जातो. शाळा, कॉलेज, कार्यालयात डबे द्यायचे असतील तर गव्हाला पसंती आहे.
पूर्वी वर्षभरासाठी धान्याची साठवणूक केली जायची, आता धकाधकीच्या काळात गृहिणी कामानिमित्ताने दिवसभर बाहेर असल्याने हे सोपस्कार होत नाहीत. रोजच्या गरजेनुसार खरेदी केली जाते. कुटुंबाच्या आकाराप्रमाणे २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो, २ किलो आणि क्वचित ५ किलो असे वाणसामान घेतले जाते.
शहराची मूळ मध्यवर्ती वसाहती ः येथील ग्राहक सामान्यतः वाण्याकडून सुटा माल किंवा स्थानिक उपलब्ध पॅकिंगमध्ये मध्यम दर्जाचा माल घेताना आढळतो.
नव्याने विकसित झालेल्या वसाहती ः यात सुखवस्तू नव्या जुन्याची सांगड घालणाऱ्या कुटुंबांचा समावेश होतो. अव्वल दर्जाचा आकर्षक वेष्टण असलेला माल खरेदी करण्याकडे यांचा कल राहतो.
परराज्यातून आलेले सधन, आयटी कर्मचारी आणि उच्चभ्रू ग्राहक ः ही मंडळी वाण्याकडे जाऊन सुट्टा माल आणण्यापेक्षा, मॉलमध्ये जाऊन उच्च गुणवत्तेचा माल खरेदी करणे पसंत करतात.
याचाच अर्थ असा की, १,२,३ या सर्व प्रकारच्या गुणवत्तेच्या, प्रतवारीच्या मालाची शहरामध्ये विक्री होऊ शकते, तेवढी मागणी नक्की आहे.
शेतकरी गट, महिला बचत गटांना संधी
भुसारीमाल पॅकींगमध्ये विकत घेत असलेल्या वर्गासाठी छोट्या शेतकऱ्यांनी गावपातळीवर स्वतःचा एक उत्पादक गट स्थापन करावा. धान्य प्रतवारी यंत्र घ्यावे. यामध्ये बरेच प्रकार उपलब्ध आहेत. शेतकरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन स्वतः चार पद्धतीने प्रतवारी करू शकतात. दाण्यांचा आकार, रंग, चमक, वजन आणि पौष्टिकतेचे प्रमाण यावर शेतीमालाचा दर ठरत असतो. भुसारी पिकांसाठी खरेदी किंमत सरकारने ठरवून दिलेली असली तरी चांगल्या दर्जाचा माल शेतकऱ्यांकडे आहे असे समजले तर व्यापारीदेखील आगाऊ रक्कम देऊन हा माल खरेदी करतात, म्हणून प्रतवारी करणे आवश्यक आहे.
ग्राहकांना २५० ग्रॅमपासून पॅकिंग हवे असले, तरी असे पॅकिंग गावपातळीवर या गटांकडून अपेक्षित नाही. कारण मागणीचा वाहतूक खर्च आणि वेळ यांचा ताळमेळ बसत नाही. गावातून माल घाऊक स्वरूपात शहरात येईल आणि दुकानदार तो घेऊन आपापल्या पातळीवर पॅकिंग करतील.शेतकऱ्यांनी शेतीमाल मध्यवर्ती ठिकाणी किंवा गटांच्या कार्यालयात आणावा. त्यानंतर महिला बचत गटांच्या सदस्यांनी त्याची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग करावे. गटाचा ट्रेडमार्क करून शेतीमाल शहरामध्ये विक्रीस पाठवावा.
निर्माण होणाऱ्या संधी
स्थानिक शेतीमालाचा दर्जा उंचावणे, उच्च प्रतीच्या शेतीमालाची मागणी वाढणे, चांगला हमीभाव मिळणे, स्थानिक रोजगाराची व्याप्ती वाढणे अशा अनेक संधींना शेतकरी ते ग्राहक या विक्री व्यवस्थेमध्ये चांगला वाव आहे. स्थानिक पातळीवरच प्रतवारी झाल्यास वाहतूक खर्चात बचत होईल. व्यापारी शेतकऱ्यांचा गुणवत्तापूर्ण प्रतवारी केलेला शेतीमाल खरेदी करतील.
शेतकरी ते ग्राहक साखळी
शेतकऱ्यांनी शहरातील दुकानदार किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने ग्राहक बांधून घ्यावेत. मागणी आणि पुरवठ्यामध्ये कमीत कमी वेळ लागावा यासाठी सोशल मिडियाचा वापर करून त्यांच्या संपर्कात राहणे अपेक्षित आहे. ग्राहकांची गरज आहाराशी निगडित असल्याने त्याची पूर्तता कशी करता येईल यावर विचार करावा. प्रत्येक शेतकऱ्याने प्रतवारीचा अभ्यासकरून स्वतःच्या शेतीमालाची वर्गवारी नीट समजून घेतली पाहिजे. अडत व्यापाऱ्याकडे शेतीमाल दिला की आपले काम झाले अशी विचारधारा असलेल्या शेतकऱ्यांना हा मार्ग अंगिकारायला थोडा वेळ लागेल. चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी सुरवातीपासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.
- छाया वारंगे, ९५५२५९८८५१
(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये कार्यरत आहेत)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.