
Pandharpur News : आषाढी यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सद्य:स्थितीत भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील, या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या वेळी दिल्या.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री. घोडके, मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. पुलकुंडवार म्हणाले, ‘‘चंद्रभागा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वारकरी-भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणाताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व शहरातील अतिक्रमणे तत्काळ काढावीत. पालखी मार्ग व शहरातील अधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे.
तसेच अनाधिकृत होर्डिंगवर तत्काळ कारवाई करून पुन्हा ते होर्डिंग लागणार याची दक्षता घ्यावी. होर्डिंगमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करावा. नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी माहिती फलक लावावेत, यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात.’’
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, ‘‘यावर्षी पाऊस जास्त असण्याची शक्यता असल्याने पालखी तळांवर चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करण्यात येत आहे, तसेच जलप्रवासी वाहतुकीसाठी एकूण १ हजार ५० लाइफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार आहे.’’ वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती कुलदीप जंगम यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.