Chana Cultivation : बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड फायदेशीर

BBF Method of Chana Farming : रब्बी हंगामामध्ये उपलब्ध ओलाव्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.
Chana Cultivation
Chana CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद गोरे, डॉ. वासुदेव नारखेडे

Chana Farming : या वर्षी विशेषत: सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या पावसाचा योग्य वापर करून रब्बी हंगाम साधणे अत्यंत गरजेचे आहे. या हंगामात हरभऱ्या­ची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरेल. सद्यःस्थितीत कोरडवाहू हरभरा पिकाची लागवड ही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तर बागायती हरभरा पिकाची लागवड ही १० नोव्हेंबरपर्यंत करता येईल.

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद (क्रिडा) यांनी बीबीएफ (रुंद वरंबा सरी) यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे (६० ते १५० सेंमी) तयार करता येतात.

ओळीमध्ये जास्त अंतर असलेल्या पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या तीन ते चार ओळी रुंद वरंब्यावर घेता येतात. आवश्यकतेनुसार छोट्या बदलाद्वारे पेरणी सुलभपणे करता येते. आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित बीबीएफ यंत्रही उपलब्ध आहे.

Chana Cultivation
Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

बीबीएफ यंत्राचे भाग

बीबीएफ यंत्रासोबत पेरणीयंत्र, बियाणे व खताची पेटी विविध कप्प्यासह उपलब्ध आहे.

यंत्रामध्ये दोन फाळ, चार छोटे पेरणीचे फण, आधार देणारी दोन चाके आणि ही संपूर्ण यंत्रणा चालविणारे चाक असे विविध भाग आहेत.

हे यंत्र चालविण्यासाठी ३५ ते ४५ ते ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर पुरेसे ठरतात.

बीबीएफ यंत्राची लांबी २२५० मि.मी., रुंदी ११३३ मि.मी., तर उंची साधारण ८६८ मि.मी. आहे. त्याची चौकट ही २२५० मि.मी. लांबीची, ४८० मि.मी. रुंदीची असून वजनाला अंदाजे २८५ किलो इतके असते.

रुंद वरंबा सरी यंत्रामध्ये ३० ते ४५ सेंंमी अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सेंंमी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सेंमी अंतरावर कमी- जास्त करता येणारे दोन सरीचे फाळ देण्यात आलेले आहेत.

या यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सेंमी ते १५० सेंमी रुंदीचा रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सेंमी अंतरावरील २ ते ४ ओळी घेता येतात.

तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकण यंत्राच्या साह्याने बियाणे व खते पेरता येतात.

पिकांच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारशीनुसार कमीजास्त करता येते. त्यामुळे हेक्टरी आवश्यक एवढी रोपांची संख्या ठेवता येते.

हरभरा पिकाच्या एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी (आवश्यक अंतरानुसार) घेता येतात. यासाठी दोन ओळींतील अंतर गरजेनुसार ३० सेंमी किंवा ४५ सेंमी किंवा कमी जास्त करावे.

वरंब्याची आवश्यक तितकी रुंदी मिळविण्यासाठी ठरावीक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळात आवश्यक अंतर ठेवून) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी ३० ते ४५ सेंमी रुंदीच्या पडतात.

Chana Cultivation
Chana Variety : हरभरा पिकाच्या विविध वाणांची वैशिष्ट्ये

हरभरा लागवडीच्या पद्धती

अ) चार ओळी (३० सेंमी अंतर)

एका वरंब्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी (३० सेंमी अंतरावर) घ्यावयाच्या असल्यास, सरी घेण्यासाठी खुणा म्हणजेच फाळातील अंतर १५० सें.मी. (१.५ मीटर) ठेवावे. ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्र फाळाचा मध्य खुणेवर घेऊन चालवावे. यामुळे १२० सेंमी अंतराचा रुंद वंरबा तयार होतो. त्यावर हरभरा पिकाच्या चार ओळी ३० सेंमी अंतरावर बसतात. या वेळी दोन्ही बाजूंच्या सरी ३० सें.मी. रुंदीच्या पडतात.

ब) तीन ओळी (३० सेंमी अंतर)

एका वरंब्यावर ३० सेंमी अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घेताना, ९० सेंमी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करावा लागतो. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार दोन्ही बाजूंच्या सरी ३० सेंमी रुंदीच्या मिळू शकतात. त्यासाठी दोन फाळांतील अंतर १२० सेंमी ठेवून बीबीएफ यंत्र (फाळाचा मध्य खुणेवर ठेवून) चालवावे लागते. या वेळी सरीच्या फाळामुळे तयार होणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सरी या गरजेनुसार ३० सेंमी किंवा कमी जास्त रुंदीच्या मिळू शकतात.

क) तीन ओळी (४५ सेंमी अंतर)

एका वरंब्यावर ४५ सेंमी अंतरावर हरभरा पिकाच्या तीन ओळी घ्यावयाच्या

असल्यास, त्यासाठी १३५ सेंमी रुंदीचा वरंबा तयार करावा. त्यासाठी दोन फाळांतील

अंतर १८० सेंमी ठेवून बीबीएफ यंत्र

फाळाच्या मध्य खुणेवर घेऊन चालवावे. या वेळी दोन्ही बाजूंच्या सरी या ४५ सेंमी

रुंदीच्या पडतात त्यांची रुंदी कमी जास्त करता येते.

रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे

चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे (सीडबेड) तयार होतात.

रुंद वरंब्यावर पीक असल्याने पिकात हवा खेळती राहण्यास मदत होते. पिकास नेमके पाणी मिळते.

दोन्ही बाजूंनी असलेल्या सरींमुळे अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. यामुळे पाणी व हवा यांचे संतुलन राखले जाऊन पिकाची जोमदार वाढ होते.

बीबीएफ यंत्राने एकाच वेळी आवश्यक रुंदीचे वरंबे, दोन्ही बाजूंनी सऱ्यांसह तयार होतात. त्यात बियाणे पेरणी व खते देण्याचे कामही त्याच वेळी होते. त्यामुळे वेळ, मजुरी, खर्च, इंधन यात बचत होते.

डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com