
शेतकरी नियोजन वांगी
शेतकरी : सचिन (केदार) पांडुरंग माने
गाव : कसबेडिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
वांगी क्षेत्र : एक एकर
कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा शेतकरी सचिन (केदार) पांडुरंग माने हे सन २०१६ पासून साधारण एक एकरावर चमकी कुडची या वांगी लागवड करतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन योग्य जातीची निवड, काटेकोर पीक व्यवस्थापनातून दर्जेदार वांगी उत्पादनात त्यांनी सातत्य राखले आहे.
सांगली-इस्लामपूर राज्य मार्गालगतचे कसबे डिग्रज हे गाव. या पट्ट्यातील हळद, ऊस ही प्रमुख पिके. मात्र या परिसरात पाणी आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेती क्षारपड होण्याचे प्रमाण मोठे आहे. परिणामी, ऊस उत्पादन एकरी ५० ते ६० टनांवर आले. कसबे डिग्रज येथील सचिन (ऊर्फ केदार) पांडुरंग माने हे युवा शेतकरी.
त्यांनी एम. ए. (राज्यशास्त्र) शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता हळूहळू शेतीची जबाबदारी घेतली. कुटुंबीयांच्या एकूण २० एकर शेतीचे नियोजन करू लागले. कसबे डिग्रज येथील शेती उपसा सिंचन योजनेवर, तर बेडग येथील शेती विहीर आणि कूपनलिकेवर अवंलबून आहे.
ठिबक सिंचन केले आहे. त्यांच्या एकत्र कुटुंबामध्ये वडील पाडुरंग, आई रुक्मिणी, बंधू कृष्णा व भावजय सौ. वर्षाराणी, केदार आणि त्यांची पत्नी सौ. श्रुतिका आणि मुले यांचा समावेश आहे. बंधू ट्रॅक्टर आणि आर्थिक व्यवहार पाहतात.
लागवडीचे नियोजन
आपल्या वांगी पिकाचे नियोजन सांगताना केदार माने म्हणाले, की मशागतीपासून ते विक्रीपर्यंतचा दररोजचा हिशेब ठेवून ताळेबंद मांडतो. प्रत्येक पिकाचा पिकाचा नफा-तोटा समजल्यामुळे पुढील पिकात अनावश्यक खर्च टाळता येतो. सर्वसाधारणपणे ३८ गुंठ्यांत वांग्याच्या ‘चमकी कुडची’ या वाणाची लागवड करतो.
पाट पाण्याची सोय असलेल्या जमिनीमध्ये उत्तम मशागतीनंतर ४.५ ते ५ फुटांची सरी पाडून तीन फुटांवर रोपांची लागवड करतो. पिकाची वाढ जोमाने झाल्यास हवा खेळती न राहिल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेता सहा फूट सरीचा वापर करतो. पुढे त्यात सात फुटापर्यंत वाढ करण्याच मानस आहे. पीक वाढीच्या टप्प्यानुसार ठिबकद्वारे विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते. वातावरणाचा अंदाज घेऊन अत्यावश्यक असल्यास शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली जाते. जमीन सुपीकतेवर भर देत असल्याने वांग्याचा दर्जा चांगला राहतो.
मध्यम आकाराच्या हिरवट, चमकदार वांग्यांना चांगली मागणी असते. अनेक व्यापारी स्वतः शेतावर येऊन वांगी खरेदी करतात. त्यांच्या मागणीनुसार तोडणी केल्यानंतर व्यापारी शेतात प्रतवारी आणि वजन करून जागेवर पैसे देतात. त्यामुळे कमिशन, पॅकिंग आणि वाहतूक खर्चात बचत होते.
बदलत्या वातावरणामुळे खर्चात वाढ झाल्याने एकरी सरासरी अडीच ते तीन लाख खर्च येतो. २५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळतो. यंदाच्या हंगामात दिवाळीनंतर वांग्याला अपेक्षित दर न मिळाल्याने आतापर्यंत पिकासाठी झालेला खर्च कसाबसा हाती आला आहे. उत्तम उत्पादन असूनही बाजारपेठेतील आवक आणि मागणी अवलंबून असलेल्या दरामुळे नफ्याचे प्रमाण दरवर्षी कमी अधिक होते.
नियोजनातील महत्त्वाचे...
हंगाम संपल्यानंतर उभी, आडवी नांगरट
मशागतीनंतर एक ते दीड महिने रान तापवले जाते.
रोटर मारून साडेचार फुटाचा गादीवाफा निर्मिती.
दोन रोपांतील अंतर तीन फूट, झिगझॅग लागवड.
३५ गुंठ्यांसाठी २२०० ते २५०० रोपे लागतात.
रोपवाटिकेतून १.८० रुपये प्रति रोप या दराने खरेदी.
लागवड केल्यानंतर ह्युमिक अॅसिडची पहिली आळवणी केली जाते. पांढरी मुळी वाढीस मदत होते.
१२ः६१ः०, बोरॉन, कॅल्शिअम नायट्रोजन युक्त खताची आळवणी घेतो. त्यामुळे फुटवा चांगला मिळत असल्याचा अनुभव आहे.
वाढीसाठी वातावरणाच्या बदलानुसार खताची मात्रा दिली जाते. त्यातही प्रामुख्याने फुलकळी वेळी २४ः२४, १३ः०ः४५, या खते दिली जातात, तर फळवाढीच्या काळात १३ः०ः४५, वाढसंवर्धकांचा वापर केला जातो.
७५ ते ९० दिवसाच्या दरम्यान पॉवर टिलरने भरणी केली जाते.
कोळप्याच्या मदतीने कोळपणी करतो
देठ काळा पडल्यास वांग्याची गुणवत्ता कमी होते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित अंतराने प्रतिबंधात्मक फवारणीचे नियोजन असते.
शेतीतील वाफसा टिकविण्यासाठी वांगी पिकाला पाटपाणीही दिले जाते.
ऑगस्ट - सप्टेंबरमधील लागवडीचे फायदे
तापमान कमी असल्याने उगवण क्षमता चांगली राहते.
अनुकूल हवामानामुळे रोपांची चांगली वाढ.
वाफसा पद्धतीने पाणी नियोजन.
फुटवा, रोपाची उंची वाढण्यास मदत.
कमीत कमी ८ ते ९ महिने वांगी उत्पादनाचे नियोजन.
मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही
कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
खर्चात २५ टक्के बचत
कमीत कमी ८ ते ९ महिने वांग्याचे उत्पादन मिळते
बाजारपेठेत सरासरी चांगला दर मिळण्याची शक्यता.
- सचिन (केदार) माने ९४२१२२५६५२, (शब्दांकन ः अभिजित डाके)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.