Hapus Mango : हापूसपुढे परराज्यातील आंब्याचे आव्हान

Hapus Mango Market : वाशीमध्ये कोकणातून ५ हजार पेट्या; गतवर्षीपेक्षा दर कमी
Hapus Mango
Hapus MangoAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : रत्नागिरी ः कोकणचा हापूस मुंबईतील वाशीसह पुणे, अहमदाबाद येथील बाजारांत दाखल झाला आहे. मात्र हापूसपुढे परराज्यातील आंब्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

वाशी बाजारात सोमवारी (ता. १९) दाखल झालेल्या एकूण ९ हजार १२१ पेट्यांमध्ये परराज्यातील ४ हजार २० पेट्या होत्या. त्यामुळे सध्या हापूसच्या चार ते आठ डझनच्या पेटीला ३ हजारांपासून ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. हा दर गतवर्षीपेक्षा कमी असल्याचे बागायतदारांचे मत आहे.

पहिल्या टप्प्यात हाती आलेल्या हापूस उत्पादनाला चांगला दर मिळणे अपेक्षित असतानाच वाशीतील वाढत्या उलाढालीने बागायतदारांची चिंता वाढवली आहे. यंदा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कोकणात हापूसचा हंगाम चांगला जाईल, असे अंदाज बांधले जाऊ लागले.

त्यानंतर उशिरा आलेली थंडी, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा कडाका अशा विचित्र वातावरणाचा आंबा हंगामावर परिणाम झाला. सध्या थ्रीप्सने बागायतदार त्रस्त झाले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशकांवर मोठा खर्च सुरू आहे. तरीही जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील हापूस आंब्याच्या पेट्या वाशीसह अन्य बाजारात पाठवण्यात आल्या आहेत.

Hapus Mango
Mango Rate : कळमनामधील बाजारात आंब्याचे दर दबावात

गतवर्षीपेक्षा कोकणातील हापूसचे प्रमाण अधिक आहे. सुरुवातीलाच पाच डझनाच्या पेटीला सहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यानंतर पेट्यांची संख्या प्रतिदिन पाच हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी (ता. १९) ५ हजार १०१ पेट्या बाजारात आल्या आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील साधारणपणे ३० ते ४० टक्के असल्याचे वाशीतील व्यावसायिकांचे म्हणणे आहे. उर्वरित सर्व देवगड येथील माल आहे.

या बरोबरीने परराज्यातील म्हणजेच कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथील पेट्यांची संख्या ४ हजार २० इतकी आहे. तुलनेत यंदा परराज्यातील पेट्या अधिक आल्या आहेत. गतवर्षी हापूसच्या पेटीला ७ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. याबाबत वाशी बाजार समितीचे संचालक तथा व्यावसायिक संजय पानसरे म्हणाले, की कोकणातील हापूसच्या पेट्या गतवर्षीपेक्षा अधिक आहेत. आवक अधिक असल्यामुळे त्यानुसार दर निश्‍चित केले जात आहेत. हापूसच्या बरोबरीने परराज्यातील आंबेही विक्रीला आले आहेत.

पहिल्या टप्प्यातील आंब्याचा बहर संपत आला आहे. दुसऱ्या बहरातील उत्पादन १० मार्चपासून सुरू होईल. यंदा गतवर्षीच्या तुलनेत आंबा अधिक आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या आंब्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे दर तुलनेत कमी आहेत.
- राजेंद्र कदम आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com