Mumbai Market Cess Scam: मुंबई बाजार समितीत शेकडो कोटींची सेस चोरी – चौकशी अहवालात धक्कादायक निष्कर्ष!

APMC Corruption: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील चौकशी अहवालानुसार, २००२ पासून फळबाजारात होणाऱ्या सेस वसुलीमध्ये ८०% चोरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यात व्यापारी आणि काही बड्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची चर्चा आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon
Published on
Updated on

Pune News: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळबाजार आवारामध्ये सेसची (बाजार शुल्क) सुमारे ८० टक्क्यांपर्यंत चोरी होत असल्याचा निष्कर्ष या संदर्भातील चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद करून या लुटीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. या कोट्यवधींच्या लुटीमुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितींचा महसूल बुडत असून, सेस चोरीचे हे रॅकेट मोडीत काढून, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये सेस चोरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट होत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. पुणे आणि मुंबई बाजार समित्यांमधील गैरव्यवहारांची चर्चा होत असताना, आता मुंबई बाजार समितीमधील सेस चोरीप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने सेस चोरी होत असल्याचे आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

Mumbai APMC
Pune APMC: पुणे बाजार समितीत दुचाकी प्रवेशबंदीवरून संचालकांमध्ये ‘तू तू-मैं मैं’

याबाबतची अहवालातील माहिती अशी, की मुंबई बाजार समितीमध्ये फळ बाजार आवारात व्यापाऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाच्या दरावर सेस आकारणी करून व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याची पद्धत होती. मात्र २००२ मध्ये काही व्यापाऱ्यांनी गेटवर खरेदीदाराकडून थेट वसुलीबाबत तत्कालीन प्रशासनाकडे मागणी केली. त्या अनुषंगाने २००२ पासून खरेदीदाराकडून सेसची थेट वसुलीची पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली, मात्र ही पद्धत तब्बल २३ वर्षांपासून सुरू आहे.

या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात सेस बुडत असल्याच्या शंका उपस्थित होऊ लागल्यानंतर अखेर प्रशासनाने एक समिती नेमून नोव्हेबर २०२३ सखोल चौकशीसाठी समिती नेमली. या समितीला प्रत्यक्ष बाजारात होणारी खरेदी आणि दिली जाणारी बिले यामध्ये प्रचंड तफावत आढळली, यामुळे अल्प सेस वसुली होत असल्याची माहिती समोर आली. थेट तपासणीच्या दोन प्रकारांमध्ये वाहनांमधील शेतीमालाचा पंचनामा केला गेला.

यात एका प्रकारात व्यापारी पावतीनुसार केवळ ६० हजार रुपयांच्या शेतीमालाची नोंद होती, मात्र प्रत्यक्षात या शेतीमालाची किंमत ३ लाख ४२ हजार ८०० रुपये एवढी निघाली. यामध्ये केवळ ६०० रुपये सेस भरण्यात आला होता. मात्र पंचनाम्यानुसार शेतीमालाच्या मूळ रकमेवर ३ हजार ४२८ रुपये सेस आकारून त्यावर ३ पट दंड आकारून एकूण ११ हजार ३१२ रुपये रक्कम भरून घेण्यात आली. दुसरे प्रकरणही अशीच सेस चोरी आढळून आली.

Mumbai APMC
APMC Market Dispute : ‘त्या’ जागेचा कर व्यापाऱ्याकडून वसूल करा

दरम्यान, या प्रकरणांत सुमारे २० टक्के सेस भरला जात असल्याचे आणि ८० टक्के सेस बुडविला जात असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील सेस चोरी उघड झाल्याने गेल्या २३ वर्षांत शेकडो कोटींचा तोटा बाजार समितीस झाला आहे. कोट्यवधींच्या या सेस चोरीच्या रॅकेटमध्ये प्रशासनातील बडे अधिकारी सामील असल्याशिवाय हे शक्य नाही, अशी चर्चा पणन विभागात आहे.

चौकशी समितीमधील महत्त्वाची निरीक्षणे

- २००२ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू प्रवेशद्वारावर सुरू केलेले सेस संकलन आजतागायत सुरू

- या व्यवस्थेत शेतमालाचा बाजारभाव पडताळणी करण्याची कोणतीही सुविधा संगणकप्रणालीमध्ये नाही

- व्यापारी खरेदीदारास शेतीमालाच्या कमी दराची बिले देतात.

- शेतीमालाच्या विक्रीची बिले तीन प्रतींमध्ये असतात, मात्र अनेक व्यापारी कार्बन पेपर न वापरता, बाजार समितीला देण्यात येणाऱ्या बिलावर पेनाने कमी बाजार भाव टाकतात.

- यामुळे वाहन बाजार समितीच्या बाहेर गेल्यास शेतीमालाच्या सेसबाबत पडताळणी करता येत नाही.

चौकशी समितीचा निष्कर्ष

बाजार समितीमधील प्रवेशद्वारावरील सेस संकलनाची सध्याची कार्यपद्धती बंद करून, उपविधी क्रमांक १६ (अ) नुसार तरतुदीनुसार सेसचा भरणा अडत्यांमार्फत किंवा ज्याच्यामार्फत व्यवहार होईल त्यांच्यावर बाजार शुल्क व देखरेख खर्च खरेदीदारांकडून वसूल करून, बाजार समितीकडे भरण्याची जबाबदारी देण्यात यावी. असे केल्यास अडत्या व्यापारी यांची दफ्तर तपासणी घेऊन, तफावत रक्कम भरून घेता येईल. ही रक्कम संगणकप्रणालीद्वारे क्यूआर कोडसारखे ऑनलाइन पेमेंटचे पर्याय देता येतील, असे चौकशी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दफ्तर तपासणी टाळण्यासाठीचे षड्‍यंत्र

प्रवेशद्वारावर खरेदीदारांकडून होणारी सेस वसुली कार्यप्रणालीमध्ये व्यापाऱ्यांची दफ्तर तपासणी घेता येत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे दफ्तर तपासणीमधून मोठी सेस चोरी उघड होऊ नये यासाठी तत्कालीन काही प्रशासक आणि प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अडत्यांनी षड्‍यंत्र रचल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com