
शेतकरी पिकाच्या वाढीसाठी खतं (Fertilizers) देतात. परंतु खत देण्याची पध्दत चुकीची असेल तर ती प्रत्यक्षात पिकाला न मिळता वाहून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतं. पण त्याचबरोबर जमिनीची प्रतही खराब होते.
पीक लागवडीपासून ते पिकाच्या वाढीच्या काळात वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची (Nutrients) आवश्यकता असते. पिकाची अन्नद्रव्याची गरज खतांमधून भागवली जाते. नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorous) आणि पालाशयुक्त खतं (Potash) हे खतांचे मुख्य प्रकार आहेत. स्फुरद, पालाशयुक्त खते पिकाला उपलब्ध होण्यास वेळ लागतो. त्यामुळे या खतांची मात्रा पीक पेरणीच्या वेळेस द्यावी लागते. तर युरियासारखी नत्रयुक्त खतं वाया जाण्याचं प्रमाण मोठं आहे. ही खतं पिकाला मिळण्याऐवजी बऱ्याच वेळा पाण्यात, जमिनीत वाहून जातात. त्यामुळे नत्राची मात्रा आवश्यकतेनुसार दोन ते तीन भागात विभागणी करून पिकास द्यावी लागते. युरियाला अनुदान जास्त असल्यामुळे त्याचा वापरही जास्त असतो.
पिकाच्या वाढीसाठी नत्र किती महत्वाचे आहे?
वनस्पतींच्या वाढीसाठी नत्र आवश्यक आहे. कडधान्य पिकांच्या मुळावर गाठी असतात. या गाठींमध्ये स्थिर केलेलं नत्र पिकांना आमोनियाच्या स्वरुपात मिळते. परंतु तृणधान्य पिकामध्ये मुळांवर गाठी नसतात. त्यामुळे तृणधान्य पिकांना नत्रासाठी खतावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे तृणधान्य पिकांत नत्रयुक्त खतांचा वापर जास्त होतो.
नत्र खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम काय होतात?
नत्रयुक्त खतांचा अतिवापर केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. याशिवाय हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो. खतांचा अतिवापर टाळण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक एजुआर्डो ब्लमवाल्ड यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तृणधान्य पिकातील नत्रयुक्त खतांचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्यातील जनुकांमध्ये बदल करुन नत्र स्थिरीकरण वाढवण्यावर भर दिला आहे.
ब्लमवॉल्ड यांनी तृणधान्य पिकामध्ये नत्र स्थिरीकरण वाढवण्यासाठी वनस्पतीमध्ये काही जनुकीय बदल केले. यामध्ये मातीतील जीवाणूंचे हवेतील नायट्रोजन वायूचे अमोनियममध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला.
काय आहे संशोधन ?
वनस्पतींनी तयार केलेल्या विशिष्ट रसायनांमुळे मातीतील जिवाणू हवेतील नायट्रोजन वायूचे स्थिरिकरण करतात. ते वनस्पतीला उपलब्ध होते. ब्लमवॉल्ड यांनी वनस्पतीमध्ये जनुकीय बदल करुन वनस्पतीतील रसायनांचे प्रमाण वाढवले त्यामुळे जमिनीतील जीवाणूद्वारे नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण वाढले. संशोधकांना भात पिकातील नत्र स्थिरीकरण वाढवणारी रसायने ओळखण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे भात पिकातील नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे शक्य होणार आहे. याशिवाय इतर तृणधान्य वर्गातील पिकांचाही आभ्यास केला जात आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाने या तंत्रासाठी पेटंट अर्ज दाखल केला असून तो सध्या प्रलंबित आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.