Onion Export : कांदा निर्यातीला मंजुरी म्हणजे वरातीमागून घोडे

Onion Market : देशभरातील ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने डिसेंबरच्या सुरुवातीला कांदा निर्यातबंदी लागू केली.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik News : देशभरातील ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता व दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने डिसेंबरच्या सुरुवातीला कांदा निर्यातबंदी लागू केली. परिणामी गेल्या दोन महिन्यांत २ हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.

या मुद्द्यावर कांदा उत्पादक पट्ट्यात गेल्या दोन महिन्यांत संतापाची लाट होती. मात्र केंद्र सरकारने उशिराने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला. मात्र हा निर्णय म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची टीका शेतकरी, शेती अभ्यासक व राजकीय वर्तुळातून होत आहे.

कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावर रास्तारोको, आंदोलने व निदर्शने करण्यात झाली. यासह अनेक कांदा उत्पादक पट्ट्यातील लोकप्रतिनिधींवर शेतकऱ्यांचा संताप कायम होता. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १८) केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीबंदी मागे घेण्याबाबत मंजुरी दिली खरी; मात्र याबाबत अधिसूचना प्राप्त झालेली नसल्याने गोंधळ कायम आहे.

Onion Market
Onion Export Ban Lift : केंद्र सरकारची कांदा निर्यातबंदी उठवण्याची फक्त घोषणा; अधिसूचना नाहीच!

यंदा कमी पर्जन्यमान असल्याने खरीप हंगाम लांबणीवर गेला. परिणामी नवीन खरीप कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३,५०० रुपयांपर्यंत दर होता; मात्र ग्राहक हिताचा विचार करून केंद्र सरकारने निर्यातबंदीचे हत्यार उपसले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशीच दर निम्म्यावर आले. तर शनिवारी (ता. १७) पर्यंत हेच दर १,००० रुपयांपर्यंत होते.

Onion Market
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी मागे घेण्याच्या हालचाली

आता दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वाढ दिसून आली. मात्र निर्यातबंदीपूर्वीच्या दरानुसार ते १,५०० रुपयांनी कमीच आहेत. त्यामुळे खरीप व लेट खरीप कांद्याची काढणीपश्चात टिकवणक्षमता एक ते दोन आठवडे असते. त्यामुळे कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच हा लाभ होणार आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर शेतकरी वर्गातून शंका व्यक्त करण्यात येत आहे.

७ डिसेंबर २०२३ रोजी निर्यातबंदीची घोषणा झाल्यानंतर मुदत ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत होती. मात्र ४० दिवस अगोदर या निर्णयावर स्थगिती चर्चेतून पुढे आली. या निर्णयामुळे व्यापारी व निर्यातदारांचेच भले होईल, अशी टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर होत आहे.

सरासरी दराची अशी होती स्थिती

महिना...सरासरी दर (प्रतिक्विंटल रुपये)

नोव्हेंबर...३,७४६

डिसेंबर...२,२२२

जानेवारी...१,५७१

फेब्रुवारी...१,२०४

जेंव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याला चार पैसे मिळत होते तेंव्हा केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि मग अडलेल्या शेतकऱ्याने कवडीमोल भावात कांदा विकल्यानंतर ही निर्यात बंदी हटवली. तीही शेतकऱ्यांचा कळवळा आल्याने नाही तर उद्याच्या लोकसभा निवडणुकीत रडण्याची वेळ येऊ नये म्हणून घेतलेला हा निर्णय आहे. पण आता या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही. बड्या व्यापाऱ्यांनाच या निर्णयाचा फायदा होणार आहे. यावरुन हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
- रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
शेतकऱ्यांचा लाल कांदा संपल्यानंतर केंद्र सरकारने तीन लाख टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्याची माहिती समजली. परंतु निर्यातबंदी करताना अर्ध्या रात्री निर्यातबंदीची अधिसूचना काढणाऱ्या केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयाचं कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन न काढल्याने कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत निर्णयाची विश्वासार्हता कशी समजायची?
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
मंत्री निर्यात उठवली असे सांगतात, मात्र अधिसूचना काढायला इतका वेळ का? ज्यावेळेस निर्यात बंदची किती घाईने कार्यवाही होते. आता या चर्चेमुळे शेतकऱ्यांना किलोमागे २ ते ४ रुपयांचा फायदा दिसून आला; पण प्रत्यक्षात अधिसूचना कधी निघेल?
- निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी गट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com