
Amravati News: बंद पडलेली ‘सीसीआय’ची (भारतीय कापूस महामंडळ) कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली असून, शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) अमरावती जिल्ह्यातील केंद्रांवर ४ हजार क्विंटलची आवक नोंदविण्यात आली. ही खरेदी आणखी आठवडाभर चालण्याचा अंदाज आहे.
खरिपातील कापसाच्या हंगामाची जवळपास उलंगवाडी झाली आहे. दुसऱ्या वेच्यातील कापसानंतर सीसीआयने तांत्रिक कारण देत कापसाची खरेदी गेल्या पंधरवड्यात बंद केली होती. पोर्टलमध्ये अडचणी असल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले असले तरी केंद्रांवर येत असलेल्या कापसाची प्रत व त्यातील उतारा कमी येण्याच्या शक्यतेने ही खरेदी बंद करण्यात आली होती, असे ‘सीसीआय’च्या केंद्रांवरील एका ग्रेडरने सांगितले.
दोन वेच्यानंतर फरदळ प्रतीचा कापूस बाजारात येतो. ‘सीसीआय’ हा कापूस खरेदी करीत नाही. पहिल्या दोन वेच्यातील कापसाची खरेदी करतानाही दुसऱ्या वेच्यातील कापसाचे हमीदर सीसीआयने शंभर रुपयांनी कमी केले होते.
खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी आधी सीसीआयलाच प्राधान्य दिले. पहिल्या वेच्यातील बहुतांश कापूस सीसीआयने हमीदराने खरेदी केला आहे. त्यामुळे खासगी बाजारातील उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक जिनिंग प्रेसिंग बंद पडल्यात. काही जिनिंग सीसीआयनेच भाडेतत्त्वावर घेत गाठी बांधल्यात.
दुसऱ्या वेच्यातील काही प्रमाणात कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. या दरम्यान सीसीआयने कापसाची खरेदीच बंद ठेवली. त्याचा लाभ व्यापाऱ्यांनी घेत शेतकऱ्यांकडील कापसात प्रतिक्विंटल दोन किलोपर्यंत रुईचा उतारा कमी येत असल्याचे कारण देत कट्टी कापण्यास सुरुवात केली आहे. सीसीआयला ३४ किलोपर्यंत रुईचा उतारा आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांच्या कापसात ३८ किलोपर्यंत उतारा गेला आहे.
आठवडाभर खरेदी चालण्याची शक्यता
कापसाचा हंगाम संपत आला असून उलंगवाडी होऊ लागली आहे. सीसीआयची खरेदी बंद झाल्याने काही शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. तो आता खरेदी पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी हा कापूस केंद्रांवर आणला आहे. फार थोडा कापूस शिल्लक असल्याने या आठवडाभर खरेदी चालू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी झडती बघून खरेदी सुरू करत एक ते दोन किलो कट्टी कापण्यास सुरुवात केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.