
डॉ.पराग घोगळे
Animal Diseasease Management : प्रतिकारक्षमता कमी असलेल्या गाईंना,म्हशींना कासदाह होतो.व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते. कासदाह होऊ नये यासाठी गोठ्याची रचना, स्वच्छता, गाय- म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा.
कासदाह हा मुखत्वे जिवाणूंमुळे होतो (ई-कोलाय, स्टॅफायलोकोकस, स्ट्रेपटोकोकस इत्यादी) तसेच काही प्रमाणात विषाणू व बुरशीमुळे होऊ शकतो. हे सूक्ष्मजीव सडांच्या मुखाद्वारे कासेत प्रवेश करतात. कासेचे सडांप्रमाणे चार कप्पे असल्यामुळे एका वेळी एकाच सडामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो. वाढत गेलेले संकरीकरण, जास्त टक्केवारीच्या एचएफ आणि जर्सी गायी या भारतातील उष्ण व दमट वातावरणात लवकर आजारी पडतात. त्यामुळे कासदाह आजाराचा धोका वाढतो.
कासदाहाचे प्रकार ः
१. अदृश्य कासदाह: गाय, म्हैस बाहेरून काहीच लक्षणे दाखवत नाही, परंतु दुधामध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढलेले असते. यामुळे जनावर तणावात राहाते.
२. दृश्य कासदाह : यामध्ये दूध दह्या सारखे येते, पातळ येते. काहीवेळा रक्ताच्या गुठळ्या येतात. कास हाताला गरम लागते, लालसर होते व दुखते. गाय, म्हैस दूध काढू देत नाही.
कारणे आणि उपाययोजना ः
१) रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर गाई,म्हशी लवकर आजारी पडतात.व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते. सडावाटे हे जीवाणू कासेत प्रवेश करीत असल्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. गोठ्याची रचना, स्वच्छता, गाय- म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा.
२) दूध काढणी यंत्राची स्वच्छता राखावी, प्रत्येक गायीचे दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यावेत. जंतुनाशक द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे. आहार व्यवस्थापनात प्रथिने आणि ऊर्जा यांचे संतुलन, शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्त्व ई तसेच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा.
३) कासदाह झाल्यानंतर किंवा लक्षणे दिसून आल्यानंतर लागणारी प्रतिजैविके, पशुवैद्यकीय मदत, खराब दुधाची योग्य विल्हेवाट लावावी.
४) काही गोठ्यांमध्ये दिवसातून तीन वेळेस गायींचे दूध काढणे हा उपाय केला जातो. यामुळे दूध जास्त काळ सडांमध्ये साठत नाही. दूध उत्पादन १० ते १५ टक्के वाढते. आठ तासांच्या फरकाने तीन वेळा दूध काढल्यास प्रादुर्भाव कमी करता येतो किंबहुना ताज्या व्यायलेल्या गायींमध्ये जास्त वेळा दूध काढून ते कासेत साठू न देणे श्रेयस्कर ठरते.
५) कास दुधाने भरली म्हणजे कासेत अजून दूध बनणे थांबते हा गैरसमज आहे. दुधामधील एक प्रथिन कासेत जास्त दूध बनण्यास अडथळा आणते. म्हणून तीन वेळा दूध काढल्यास नवीन दूध बनण्यास जागा तयार होते. दूध तयार करणाऱ्या जास्त उती तयार होतात. तर याउलट दूध पूर्ण न काढल्यास किंवा कासेत दूध शिल्लक राहिल्यास दूध उत्पादन कमी होते. वेताच्या शेवटच्या काळात जेव्हा आपण आटवतो, तेव्हा त्या ६० दिवसांच्या आराम काळात कासेत नवीन उती तयार होतात. जुन्या उतींची दुरुस्ती केली जाते. कासेची प्रत सुधारते. पुढील वेतात त्या अधिक क्षमतेने काम करतात. गायी, म्हशींना न आटवल्यास पुढील वेतात दूध ३० टक्के दूध कमी होऊ शकते. कासदाह बरा झाल्यानंतरही २० ते २५ टक्के गायींना हा आजार परत होऊ शकतो.
६) गोठ्यात नवीन येणाऱ्या गायी, म्हशी जीवाणूंच्या सुप्त वाहक असू शकतात. म्हणून नवीन जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून कुठलाही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.
७) सडामधील आतील अस्तराच्या पेशी जीवाणूंच्या प्रादुर्भावाला विरोध करतात, त्यामध्ये केरॅटीन नावाचा थर असतो. तो जीवाणू वाढीला विरोध करतो. सडाच्या तोंडावरचे स्प्रिंगटर स्नायू तोंड घट्टपणे बंद करतात, ज्यामुळे जीवाणू सडामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. सडामध्ये असलेले केरॅटीन व काही जीवाणू दूध काढताना सडाच्या टोकांना जमा होतात. त्यामुळे पहिल्या २,३ धारा बाहेर जाऊ द्याव्यात. ज्याने सड स्वच्छ होतील.
पान्हा सोडण्याची प्रक्रिया ः
१) गाय, म्हशींमध्ये पान्हा सोडण्याची प्रक्रिया ऑक्सिटोसीन या संप्रेरकामुळे (हार्मोन) होते, जे दूध काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मेंदूमध्ये स्त्रवायला सुरवात होते. जसे की, दूध काढण्याच्या बादलीचा आवाज, मिल्किंग मशिन सुरु होणे, दूध काढण्याअगोदर खाद्य खायला देणे, वासरू जवळ येणे इत्यादी. यामुळे कासेच्या अल्व्हीओलायमध्ये तयार झालेले दूध कासेच्या मध्य भागात यायला सुरवात होते. त्यामुळे कास भरली जाते. काही गायी, म्हशीमध्ये थेंब थेंब दूध गळायला सुरवात होते.
२) सडाच्या मुळाशी असणारे स्नायू कडक होतात, त्यामुळे सडाचे मुख उघडते. वासरू दूध पिताना किंवा यंत्राने, हाताने दूध काढताना सडाच्या मुळाचे स्नायू कडक होऊन सडाचे मुख उघडते, दूध बाहेर येते. याच वेळी सडाचे स्नायू शिथिल होतात, जेणेकरून दूध विना अडथळा बाहेर येऊ शकेल आणि आतमध्ये कुठलीही इजा होणार नाही. दूध काढण्याअगोदर गाय, म्हशींनी पान्हा सोडला असल्याची खात्री करावी.
३) पान्हा न सोडता अगोदरच बंद सडातून दूध काढण्याचा प्रयत्न केल्यास सडाचे नुकसान होते. कासदाह होण्याचे प्रमाण वाढू शकते. ऑक्सिटोसीन हार्मोन मेंदू मधल्या पीच्युटरी ग्रंथी मधून स्त्रवले जाते. त्याला विविध प्रतिक्षिप्त क्रिया कारणीभूत असतात. ते प्रत्येकवेळी सारखेच असायला हवेत अन्यथा तयार झालेले दूध वर अल्व्हीओलायमध्ये अडकून पडते. दूध उत्पादन कमी मिळते.
४) दूध काढण्याची प्रक्रिया सुरु झाली की, जी उत्तेजना येते ती साधारण १५ ते २० मिनिटे टिकून राहाते. याच वेळात पूर्ण दूध काढायला हवे. कास दुधाने भरल्यावर लगेच दूध हाताने किंवा मिल्किंग मशिनने काढले गेले नाही, तर ज्या अल्व्हीओलाय मधून दूध कासेत येते, त्या पुन्हा उघडतात आणि दूध मागे ओढून घेतात, यालाच पान्हा चोरणे असे म्हणतात. म्हणून पान्हा सोडण्याचे एक नियमित वेळापत्रक गोठ्यात असावे, त्याप्रकारे गायी, म्हशींना सवय लागेल.
५) पान्हा चोरण्याची प्रक्रिया अजून एका कारणामुळे होऊ शकते, ती म्हणजे गाय जर घाबरली असेल, मोठा आवाज, नवीन माणसे, जनावराची अयोग्य हाताळणी ज्यामुळे अॅड्रीनालीन नावाचे संप्रेरक स्त्रवते आणि गाय, म्हशीचे दूध कमी होऊ शकते. म्हणून दूध काढताना शांत वातावरण असणे फार आवश्यक आहे. काही गाई, म्हशी घाबरून शेण टाकतात,पान्हा चोरतात. दूध काढून झाल्यावर सडाचे मुख बंद व्हायला सुरवात होते. ते पूर्ण बंद व्हायला सुमारे ३० ते ३५ मिनिटांचा अवधी लागतो. तो काळ आपण जनावरांना चारा, खाद्य खायला घालून पूर्ण करू शकतो. या नंतर गाय खाली बसल्यास कासदाह होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. परंतु गाय, म्हैस जास्त वेळ उभी राहिल्यास सांधेदुखी निर्माण होऊ शकते. गाय आजारी असल्यास तिला उभी न करता साफ बेडिंग देऊन आराम देणे गरजेचे असते.
६) सडातून कासेत आलेल्या जिवाणूंना शरीराबाहेर काढायचे काम दूधच करते. बहुतांश जिवंत वा मृत जीवाणू दुधावाटे बाहेर येतात. या व्यतिरिक्त गायी, म्हशींची रोग प्रतिकारशक्ती विविध जीवाणू जसे ई कोलाय, ई-कोलाय, स्टॅफायलोकोकस, स्ट्रेपटोकोकस इतर जीवाणूशी लढा देण्याचे काम करते. रक्तातील पांढऱ्या पेशी यासाठी मदत करतात. दुधामध्ये म्हणूनच न्यूट्रोफीलस या पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढलेले असते.
७) स्वच्छ दूध उत्पादनासाठी दुधामधील एकूण पेशींचे प्रमाण प्रती मिलि दोन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. स्टॅफायलोकोकस, स्ट्रेपटोकोकस जातीच्या जिवाणूंपासून झालेला संसर्ग हा ई- कोलाय जीवाणू पासून झालेल्या संसर्गापेक्षा खूप घातक ठरतो. एकदा हा संसर्ग झाला की, अल्व्हीओलायच्या नलिका जिथून दूध बाहेर येते त्या जीवाणूंच्या अति वाढीमुळे तसेच पांढऱ्या पेशी, इतर मृत उतींमुळे बंद होतात, काहीवेळा कायमस्वरूपी बंद होतात. तिथे प्रतिजैविके पोहोचू शकत नाहीत आणि संसर्ग वाढत जातो. अशा संसर्ग झालेल्या गायी, म्हशींच्या दुधातून जीवाणू बाहेर येतात. त्या इतर जनावरांना संसर्ग देणाऱ्या बनतात. ताज्या व्यायलेल्या गायी, म्हशीमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते. त्यामुळे त्या कासदाह आजाराला लवकर बळी पडतात. अशा गायींची कास हाताला गरम लागते, सुजलेली असते.
दूध काढताना घ्यावयाची काळजी ः
१) दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. कास व सड कोमट पाण्याने धुवून, कोरड्या कपड्याने पुसून, निर्जंतुकीकरण द्रावणाने डीप करून मगच दूध काढावे.
२) मिल्किंग मशिनने दूध काढताना सड ओले राहिल्यास, कप ग्रीप चुकल्यास , व्हॅक्यूम किंवा निर्वातीकरणात बाधा आल्यास, गाय दूध काढताना तणावात असल्यास, कासेचा मागचा भाग खाली येऊन सड वरखाली होत असल्यास दूध काढण्याची प्रक्रिया अनियमित होऊन कासदाह होण्याचा धोका वाढतो.
३) एकूण दुधाच्या ६० टक्के दूध हे मागील पायांजवळील दोन सडामधून येत असते. त्यामुळे समोरील दोन सडातून दूध लवकर काढून होते. मागील सडांना थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे समोरच्या सडाचे ड्राय पंपिंग होऊ शकते, परंतु यामुळे कासदाहाचे प्रमाण वाढत नाही. कासदाह झालेल्या गायीचे दूध शेवटी काढावे आणि दूध काढणी यंत्र निर्जंतुक करून घ्यावे.
४) कासदाह झालेल्या गायी, म्हशीचे दूध अगोदर काढल्यास नंतरच्या ६ ते ८ गायींना कासदाह होऊ शकतो.
५) गाभण गायी, म्हशींला आटवताना प्रादुर्भाव आत राहून गेल्यास तो जिवाणूंची वाहक बनतो. तर काही गायी संसर्ग दाखवत नाहीत आणि अदृश्य कास दाहाला आमंत्रण देतात. म्हणून गाई, म्हशींला आटवताना लॉंग अॅक्टिंग प्रतिजैविके वापरून गाय आटवावी.
६) एकदा कास दाह सुरु झाला की, प्रतिजैविकांना कमी प्रतिसाद मिळतो परंतु कासेतील लॅक्टोफेरीनमुळे गाय जीवाणू वाढीला प्रतिबंध करते. तरीही काही जीवाणू सुप्त अवस्थेत उरले असल्यास विल्यानंतर एका महिन्यात कासदाहाचे प्रमाण वाढते. म्हणून गायी, म्हशीला आटवतानाचे १५ दिवस स्वच्छतेची काळजी घ्यावी.
७) पशुआहारात झिंक, बायोटीन आणि सेलेनियम व जीवनसत्त्वांचा वापर करावा.
८) गाय, म्हशी बसण्याच्या जागी राख, वाळू, लाकडाचा भुसा, मुरूम, गाव्हांडा इत्यादीचा वापर करावा. राखेचा सामू सर्वात जास्त म्हणजे ११ इतका असल्याने त्यात जीवाणूंची वाढ सर्वात कमी होते. कासदाह होण्याचा धोका कमी करता येतो.
संपर्क - डॉ.पराग घोगळे, ९४२०९३९३६९
( लेखक पशु व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.