Pune News : नवी मुंबई : मुंबई बाजार समितीमधील चटई निर्देशांक (एफएसआय) वाटप घोटाळ्याप्रकरणी समितीचे माजी सभापती, सचिव व सर्व संचालकांसह २५ जणांविरोधात आर्थिक फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा वाशी बाजार समिती पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. विशेष म्हणजे यात सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
‘बाजार समितीमधील विकास टप्पा-२’ मसाला मार्केटमधील भूखंडावर घाऊक व्यापाऱ्यांचे ६६० गाळे तसेच २१ कॅन्टीन आहेत. तसेच या भूखंडावर एक मध्यवर्ती बहुमजली इमारत असून त्यामध्ये २७२ कार्यालये आहेत. या बांधकामापोटी १ लाख १० हजार ३३२ चौरच मीटर इतका चटई निर्देशांक वापरण्यात आला असून ८२ हजार २७८ चौ.मीटर चटई निर्देशांक शिल्लक होता.
जुलै २००९ मध्ये मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या विविध ८ संघटनांनी त्यांच्या गाळ्यावर अतिरिक्त मजल्याचे बांधकाम करण्यास परवानगी मिळावी, यासाठी बाजार समितीकडे मागणी केली होती. त्यावेळी बाजार समितीच्या संचालक मंडळाने १५ संचालकांची एक कार्यकारी उपसमितीची स्थापना केली.
या उपसमितीने मसाला मार्केटमधील बांधकामासाठी शिल्लक असलेला ८२ हजार २७८ चौरसमीटरचा वापर करण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर बाजार समितीच्या संचालक मंडळाने कुठलीही चर्चा न करता, हा ठराव मंजूर केला होता.
गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे अशी...
या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये तत्कालीन दिलीप काळे, (सभापती), विजय देवतळे (उपसभापती), सुधीर तुंगार (सचिव), भानुदास कोतकर, दत्तात्रेय पाटील, प्रदिप खोपडे, प्रभू पाटील, अशोक वाळूंज, शंकर पिंगळे, कीर्ती राणा, जयेश वोरा, सोन्याबापू भुजबळ, विलास मारकड, बाळासाहेब सोळस्कर, भिमकांत पाटील, पांडुरंग गणेश, विलास महल्ले, संजय पानसरे, चित्रा लुंगारे, बेबीनंदा रोहिणकर, जितेंद्र देहाडे, चंद्रकांत पाटील, राजेश देशमुख कुंदुरकर, शशिकांत शिंदे, संजय ऊर्फ नाना आंबोले मिळून २५ संचालकांचा समावेश आहे.
पानसरे, वाघ यांना न्यायालयीन कोठडी
दरम्यान, बाजार समितीतील शौचालय घोटाळा प्रकरणात गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेले बाजार समितीचे संचालक संजय पानसरे व लेखाधिकारी शिवनाथ वाघ या दोघांना न्यायालयाने ९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.