
डॉ. आदिनाथ ताकटे, राहुल पाटील
Indian Agriculture : फळझाडांच्या लागवडीसाठी अनुकूल जमीन आणि हवामान आवश्यक असते. विशिष्ट हवामानात विशिष्ट फळझाडे चांगली वाढतात. त्यासाठी फळबाग लागवडीसाठी स्थानिक हवामान लक्षात घेऊन योग्य फळझाडांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. हवामानामध्ये उष्णतामान, प्रकाश, आर्द्रता, पाऊस, धुके, गारा व वारा इत्यादी बाबींचा समावेश होतो. कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी ठरावीक तापमानाची अवलंबून असते.
विशिष्ट तापमानाच्या खाली किंवा वर तापमान गेल्यास त्याचा झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादन कमी येते. तापमानाच्या बाबतीत फळझाडे ही संवेदनशील असतात. वाढत्या थंडीमध्ये कमी झालेल्या तापमानाचा फटका द्राक्ष, केळी, आंबा, डाळिंब इत्यादी फळपिकांना बसतो. वाढलेल्या थंडीमुळे फळझाडांना जमिनीतून अन्नद्रव्ये घेण्यास अडचणी येतात आणि वाढ खुंटते. केळी पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. द्राक्षात मण्याची वाढ थांबते, मणी तडकतात. डाळिंबात फूलगळ होते. अशा विविध समस्या दिसून येतात.
जास्त उष्णता किंवा अति थंड तापमानाचा जास्त परिणाम फळझाडांवर होतो. विशेषतः शीत लहरींमुळे फळझाडांचे नुकसान होते. हिवाळ्यामध्ये तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले, तरी त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कमी झालेल्या तापमानाचा होणारे परिणाम :
झाडांची वाढ मंदावते.
जमिनीचे तापमान कमी होते.
वनस्पतींच्या पेशी मरतात.
फळपिकांमध्ये फळे तडकतात. विशेषतः द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इ. फळपिकामध्ये हे प्रमाण जास्त असते. अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही.
केळी पिकांमध्ये घड बाहेर पडण्यास अडचण येते.
रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
रोग आणि किडींचे प्रमाण वाढते.
प्रतिबंधात्मक उपाय :
थंड वारे, उष्णतेच्या लाटा यापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक वनस्पती जसे की सुरू, बोगनवेल, बांबू, घायपात, मलबेरी, शेवगा, शेवरी, ग्लिरिसिडीया इत्यादींची लागवड करावी.
बागेभोवती मध्यम उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी. उदा. शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ.
झाडांची निगा व छाटणीची कामे नियमित करावीत.
रब्बी हंगामात फळबागेतील मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांच्या मधील मोकळ्या जागेत दाट पसरणाऱ्या आंतरपिकांची लागवड करावी. उदा. हरभरा, वाटाणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मूग, मटकी इ.
प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपाय :
स्थानिक हवामान केंद्र तसेच वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी हवामानविषयक माहिती दिली जाते. कडक्याची थंडी किंवा शीत लहरींची माहिती मिळाल्यास त्वरित उपाय करावेत.
फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा, जुन्या रबरी वस्तू, टायर, ओली लाकडे टाकून धूर व उष्णता निर्माण करावी. जेणेकरून रात्रभर बागेत धूर आणि उष्णता राखली जाईल.
बागेस शक्यतो रात्री सिंचन करावे. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते आणि पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
थंडीची लाट येणार असल्याची माहिती मिळताच फळझाडांना सायंकाळच्या वेळी विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते. अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
झाडांच्या खोडाजवळ व आळ्यात गवत, कडबा, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आवरण घालावे.
केळी बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. प्रति झाड १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
द्राक्ष बागेभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. त्यामुळे बागेत थंड हवेची लाट येण्यापासून रोखली जाईल.
डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून बागेस नियमित पाणी द्यावे. बागेत ०.२ टक्का बोरॅक्सची फवारणी करावी.
रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालून सकाळी काढावे. त्यासाठी तुराटी, कडबा यांचे तट्टे, काळे प्लॅस्टिक, पोती यांचा उपयोग करता येईल.
पालाशयुक्त वरखत किंवा राख दिल्यास झाडांची पाणी, अन्नद्रव्य शोषण आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो.
डाळिंबाचा नवीन बहर धरलेला असल्यास फुले येण्यामध्ये समस्या येऊ शकतात. फुलधारणा चांगल्याप्रकारे होण्यासाठी २८ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान आवश्यक असते. तापमान कमी असताना वाढ संजीवकाच्या फवारण्या करू नयेत.
काही वेळा दिवसाचे तापमान अधिक आणि रात्रीचे तापमान एकदम कमी होते. अशावेळी फळे तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. त्याकरिता बागेस पाणी देणे आवश्यक आहे. एकाच वेळी जास्त पाणी न देता दररोज थोडे थोडे पाणी संध्याकाळी द्यावे. यामुळे डाळिंब बागेत आर्द्रतेचे प्रमाण योग्य राहून थंडी कमी राहण्यास मदत होते.
केळी बागांची काळजी :
थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर केळी बागेचे संरक्षण करण्यासाठी शक्यतो रात्रीच्या वेळी सिंचन करावे.
बागेतील जुन्या झाडांना प्रति झाड ५०० ग्रॅम, तर नवीन लागवडीस २५० ग्रॅम या प्रमाणे निंबोळी पेंडेची मात्रा द्यावी. या शिवाय पोटॅशची मात्रा नेहमीपेक्षा थोडी जास्त द्यावी.
बागेत पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
थंड वाऱ्यांचा थेट बागेत शिरकाव होऊ नये यासाठी बागेच्या भोवती सजीव कुंपण अथवा शेडनेट लावावे. शक्य झाल्यास सकाळी चौफेर शेकोटी पेटवून धूर करावा. जेणेकरून तापमानात थोडीफार वाढ होईल.
फळझाडांवर होणारा परिणाम :
शीत हवामानामुळे झाडांच्या फुले, फळे, पाने, खोड आणि मुळांवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशीत हवामानात वनस्पतीच्या पेशी मरू लागतात. खोड आणि फांद्या यांच्या आतील भाग काळा पडून ठिसूळ बनतो.
रोपवाटिकेतील कोवळी फळझाडे शीत हवामानास जास्त बळी पडतात. रोपांची कोवळी पाने, फूट आणि फांद्या सुकतात. झाडांना इजा पोहोचते. खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. सालीला झालेल्या जखमेमधून बुरशीचा शिरकाव होण्याची शक्यता असते.
उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोहोचते. आंब्याचा मोहर जळतो.
सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा जास्त नाजूक असल्याने ती थंडीच्या दुष्परिणामास लवकर बळी पडतात.
तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. झाडे मरतात.
केळी पिकाच्या बाबतीत तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले, तर झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात. केळफूल बाहेर पडण्यास अडचण येते. फळांना चिरा पडतात.
द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा अनिष्ट परिणाम होतो. द्राक्षामध्ये फळगळ होते, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फूट, पाने आणि मणी यांचे नुकसान होते.
संत्रा, मोसंबी बागेत तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास झाडाची वाढ मंदावते. फलधारणा होत नाही.
डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
महत्त्वाच्या टिप्स :
बागेत पहाटेच्या वेळी धूर करावा.
बागेस रात्री पाणी द्यावे.
सिंचनासाठी शक्यतो विहिरीचे पाणी वापरावे.
झाडांच्या खोडांना बोर्डोपेस्ट लावावी.
झाडाच्या खोडाभोवती, आळ्यात गवत, कडबा, पालापाचोळा, गव्हाचे तूस यांचे आवरण घालावे.
पिकास पालाशयुक्त खते द्यावीत
रोपांना आच्छादन घालावे.
डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.