Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Article by Nilima Jorawar : एका व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारात ज्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो व त्यातून जितक्या प्रमाणात कर्बोत्सर्जन केले जाते, त्याला ‘कार्बन फूटप्रिंट’ म्हटले जाते. म्हणूनच आपले अन्न व कार्बन फूटप्रिंट योग्य राखायची असेल तर आपल्याला अन्न कोठून व कसे येते, शाश्‍वत अन्न म्हणजे काय, अन्न निर्मिती व कार्बन उत्सर्जन यांचे प्रमाण काय असावे हे समजून घ्यावे लागेल.
Carbon Footprint
Carbon FootprintAgrowon

नीलिमा जोरवर

भर एप्रिल महिन्यातील मध्याचा काळ. उन्हाळ्याचा पारा अनेक शहरांत ४० अंशांच्या वर गेलेला. रब्बी पिकांचा कापणीचा हंगाम. काहींची ज्वारी, गहू, हरभरा कापून साठवला देखील गेला तर काहींची पिके अजून वावरातच. उशिरा पेरणी केलेल्या पिकांना अचानक पावसाचा दणका बसला. वादळ-वाऱ्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाऊस कोसळला. शेतातील उभी पिके त्याने झोपवली. पडलेली पिके उभी करून कापून घेता येतील पण त्यांची गुणवत्ता ढासाळते. त्याचा परिणाम म्हणून ज्वारीचे भाव वाढणार. अन्नाचे अर्थशास्त्र हे अशा घटकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यात आता भर पडत आहे ती वातावरण बदलाच्या (क्लायमेट चेंज) परिणामांची.

पावसाची अनियमितता वाढत आहे. तापमान अनेक ठिकाणी सरासरी मोडीत काढून पुढे जात आहे. अशावेळी ‘अन्न’ या गोष्टीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आणि वातावरण बदलास कारणीभूत असलेले कार्बन उत्सर्जन व अन्न निर्मिती याचाही परस्पर संबंध असतो. एका व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारात ज्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो व त्यातून जितक्या प्रमाणात कर्बोत्सर्जन केले जाते, त्याला ‘कार्बन फूटप्रिंट’ म्हटले जाते. म्हणूनच आपले अन्न व कार्बन फूटप्रिंट योग्य राखायची असेल तर आपल्याला अन्न कोठून व कसे येते, शाश्‍वत अन्न म्हणजे काय, अन्न निर्मिती व कार्बन उत्सर्जन यांचे प्रमाण काय असावे हे समजून घ्यावे लागेल.

शाश्‍वत अन्न म्हणजे काय?

जे अन्न पर्यावरणपूरक व नैतिकतेने उगवलेले असेल, ज्यात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीची दक्षता घेतलेली असेल, ज्याचा मानवी आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल, ज्यासाठी कष्टकरी, शेतकरी किंवा कोणत्याही श्रमजीवीचे शोषण न होता त्याचे योग्य मूल्य अदा केलेले असेल त्याला शाश्वत अन्न (Sustainable Food) म्हणता येईल. अशा प्रकारे उगवलेले अन्न हे पोषणसमृद्ध असते, यात शंका नाही.

वरील व्याख्येतील प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर विचार करूया. शाश्‍वत अन्न निर्मिती करताना घ्यावयाची पहिली दक्षता म्हणजे ते अन्न हे पर्यावरण पूरक आहे का? पर्यावरण पूरक म्हणजे जे आपली माती, पाणी, हवा यासोबतच परिसरातील जीव-जंतू-प्राणी-झाडे अर्थातच जैवविविधतेचे रक्षण करणारे असावे. यातोल माती हा घटक अनेक जीवांपासून बनलेला असतो. ती निर्जीव नसते तर त्यात अनेक सजीवांचा सहवास असतो. आणि हेच सजीव आपल्या शेतीसाठी लागणारे आवश्यक मूलद्रव्ये तयार करत असतात.

उदाहरण घ्यायचे झाले तर जंगलातील माती. पावसाळा आला की ताज्यातवान्या भाज्या, उन्हाळा आला की करवंदं, जांभूळ, आंबा आणि अशा कितीतरी फळांचे भरगच्च उत्पन्न मिळते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव नसलेली महुआची फुले असोत की निरोगी करवंद, टेटू अशा फळांची रास असो; आपल्याला निसर्गाच्या जंगल शेतीतून अगणित ठेवा मिळतो. या मातीत नत्र, पालाशसारखी अन्नद्रव्य भरपूर असतात. माती निरोगी असली, की अन्नही कसदार मिळते, हे साधे समीकरण आहे. थोडक्यात, काय तर सजीवयुक्त माती जोपासना, रसायनमुक्त जलस्रोताची राखणूक आणि शुद्ध हवा ठेवून मिळवलेले अन्न हे खरे पर्यावरण पूरक अन्न असे म्हणता येईल.

Carbon Footprint
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीला हवी जैविक घटकांची जोड

पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अन्न तयार करण्यासाठी कमीत कमी कर्बोत्सर्जन आवश्यक आहे. काही वर्षांपासून दिल्लीला ठरावीक हंगामात काळे धुके विळखा घालते, त्याबद्दल आपण ऐकले असेल. हे अगदीच अनैसर्गिक आहे. यामागे सांगितले जाणारे एक कारण म्हणजे पंजाब-हरियानामध्ये पिकांचे अवशेष (उदा. भाताचे काड) मोठ्या प्रमाणात जाळले जातात आणि त्यामुळे धुराचे अर्थात कार्बनचे प्रमाण वाढते व दिल्ली शहरात त्याचे परिणाम दिसतात.

आधुनिक यांत्रिकी शेतीमुळे शेतीला एक बाजारकेंद्री स्वरूप आले आहे. जास्तीत जास्त नफा मिळवताना पर्यावरण रक्षणाकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. याउलट दुर्गम व आदिवासीं भागातील शेती ही आजही पर्यावरणपूरक आहे. शेतातून निघणारे गवत व पिकांचे अवशेष इथले गायी-गुरे खातात. त्यांनी दिलेले शेण व मुत्र पुन्हा शेतात पडते, जे इथल्या जैवविविधतेला पोषकच आहे. मातीत वाढलेले जिवाणू शेती सुपीक बनवतात. शेतातून पौष्टिक व आरोग्यदायी अन्न तयार होते. पर्यावरणाचे 4R हे सूत्र देखील यामुळे पाळले जाते.

Reduce – जाळण्याच्या प्रक्रियेतून निघणाऱ्या कर्बाचे प्रमाण कमी केले जाते.
Reuse – शेतातील काडी-कचऱ्याचा खाद्य म्हणून वापर केला जातो.
Recycle – वनस्पतींचे अवशेष व शेण-मूत्राद्वारे पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते.
Restore – जैविक शेती पद्धतीमुळे सर्वांचे भरण-पोषण होते व निसर्गातील परिसंस्थेचे (Ecosystem) संवर्धन होते.

Carbon Footprint
Food Security : शाश्‍वत अन्नसुरक्षेचा धोपट मार्ग

अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाला- शेतकरी, कष्टकरी व श्रम करणाऱ्याला- त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जैविक प्रक्रियेतून पिकवलेल्या अन्नाला योग्य मूल्यभाव मिळायला हवा. त्यांचे कष्ट कमी करण्यासाठीचे जैविक तंत्र विकसित व्हायला हवे. पिकाचे उत्पादन नैसर्गिकरीत्या वाढविण्यासाठी योग्य तंत्राचा वापर करायला हवा.

उदाहरणार्थ, नाचणी पिकासाठी उत्पन्न वाढविण्याच्या काही पारंपारिक पद्धती देशभर विकसित झालेल्या आहेत. सकस पारंपरिक बियाण्यांची निवड हा कळीचा मुद्दा असतो. पावसाचे कमी-अधिक प्रमाण व बदलती भौगोलिक परिस्थिती यात टिकाव धरणाऱ्या गरी-हळवी, दिवाळ बेंद्री, पितर बेंद्री, जाबड- मुटकी अशा विविध जाती आहेत.

सुयोग्य वाण आणि अनुरूप शेतीपद्धती यांचा वापर करून नाचणीचे एकरी १० ते ४५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते. शिवाय यातून निर्माण होणारे उत्पादन शाश्‍वत अन्नाची आपली वरील व्याख्यादेखील पूर्ण करणारे असते. भरपूर रासायनिक खतांचा वापर कराव्या लागणाऱ्या आणि कीड-रोगांना बळी पडणाऱ्या संकरित वाणांपेक्षा ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. जास्त उत्पादन आल्यामुळे श्रम करणाऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देता येईल व ग्राहकांनाही शोषणमुक्त अन्न उपलब्ध होईल.

पारंपरिक बियाणे, कसदार माती व जैविक संसाधने वापरून मिळालेले अन्न हे मानवी आरोग्यासाठी देखील पोषक व आरोग्य वर्धक असते. निरोगी व सुदृढ समाजाची पायाभरणी ही शाश्‍वत अन्नातूनच होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची जी काही जीवनशैली असते, त्यानुसार तिची ‘कार्बन फूटप्रिंट’ बनत असते. जीवनशैली ही जास्त भौतिकवादी असेल तर त्या व्यक्तींची ‘कार्बन फूटप्रिंट’ जास्त असते.

त्यामुळे एखादी व्यक्ती वीज, पाणी, तेल, वाहतुकीची साधने, कागद, लाकूड, धातू आदी संसाधनांचा किती वापर करतो हे महत्वाचे ठरते. २०२३ च्या आकडेवारीनुसार कार्बन उत्सर्जनामध्ये जगात चीन पहिल्या क्रमांकावर असून भारत तिसऱ्या स्थानी आहे. असे असले तरी भारतातील प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचा दर हा जागतिक सरासरीच्या निम्माच आहे. तुमची आधुनिक जीवनशैली वातावरण बदलाची समस्या वाढण्याला हातभार लावत असते.

यात महत्त्वाचा वाटा आहे तो अन्न निर्मिती प्रक्रियेचा. सर्वांत जास्त कर्बोत्सर्जन करणारे अन्न म्हणजे मांस, चीज व डेअरी उत्पादने, चॉकलेट, कॉफी, पामतेल, तांदूळ इ. यातील काही पदार्थ शिजवण्यासाठी जास्त ऊर्जा व पाणी लागते तर काहींची वाढती मागणी भागवण्यासाठी जंगले तोडून त्यांची लागवड केली जाते. भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची निर्मिती होते. त्यामुळे ‘शाश्‍वत अन्ना’चा आग्रह आवश्यक आहे. आपल्या आहारात असणारे घटक कमीत कमी कर्बोत्सर्जन करणारे असावेत. त्यासाठी ते स्थानिक (Local), हंगामानुसार ( Seasonal) आणि प्रदेशनिहाय (Regional) असतील याचे पथ्य पाळायला हवे.

खूप दुरून आलेली उत्पादने तापमान वाढीस कारणीभूत असतात. जेव्हा वाहतुकीचे अंतर वाढते तेव्हा आपण जास्तीत जास्त कर्ब वातावरणात सोडत असतो. शिवाय आपले स्थानिक अन्न हे आपल्या प्रकृतीला देखील मानवणारे असते. हंगामी फळे व भाज्या पिकवण्यासाठी कमीत कमी रसायनांचा वापर होतो. म्हणून ज्या हंगामात जे पिकते तेच खाणे हितावह आहे. आपापल्या भागातील अन्न उत्पादनांना महत्त्व द्यायला हवे.

आपल्याकडे खाद्यतेलाची भरमसाठ आयात केली जाते. दूर देशांतून येणारे तेल वाहतूक खर्च वाढवतेच शिवाय पामसारख्या तेलाची मागणी वाढते तेव्हा मलेशिया, इंडोनेशियात मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते आणि त्या जागी पाम लागवड केली जाते. पूर्वी अनेक भागांत लागणारे घरातील अन्नामध्ये मीठ सोडून बाहेरून काहीच येत नसायचे. तेलसुद्धा मोह, कोकम किंवा करडई, खुरसाणीचे घाण्यावर काढलेलेच वापरले जायचे. तेच तर खरे ‘शाश्‍वत अन्न’ होते.

(लेखिका निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com