Contract Farming : स्वतःच्या शेतीसोबत करारशेतीतून साधली व्यवसाय वृद्धी

Fruit Farming : स्वतःच्या पारंपरिक आंबा बागेबरोबरच व्यवसायवृद्धीसाठी कराराने शेतीचे उत्तम नियोजन केले आहे. अर्थात, यात वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक अनियमितता यामुळे वाढत्या नुकसानीची जोखीम कमी करण्यासाठी वर्षभरात योग्य नियोजन व व्यवस्थापनातून वाटद-खंडाळा (ता. जि. रत्नागिरी) येथील उमेश संभाजी रहाटे यांनी मार्ग काढला आहे.
Contract Farming
Contract FarmingAgrowon
Published on
Updated on

राजेश कळंबटे

Farm Management : स्वतःच्या पारंपरिक आंबा बागेबरोबरच व्यवसायवृद्धीसाठी कराराने शेतीचे उत्तम नियोजन केले आहे. अर्थात, यात वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक अनियमितता यामुळे वाढत्या नुकसानीची जोखीम कमी करण्यासाठी वर्षभरात योग्य नियोजन व व्यवस्थापनातून वाटद-खंडाळा (ता. जि. रत्नागिरी) येथील उमेश संभाजी रहाटे यांनी मार्ग काढला आहे.

त्यांच्या हापूस आंब्याचा ‘यू.एस.आर.’ ब्रॅण्ड मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यातही ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. आंब्याच्या व्यवसायातून वार्षिक पंधरा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवत आहेत.

बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर २००३ मध्ये वडिलोपार्जित आंबा व्यवसायाची धुरा उमेश यांनी स्वीकारली. त्यातील कामे शिकता शिकता एका बाजूला कृषी विषयाचा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला.

उमेश यांना आंबा व्यवसायाचे बाळकडू घरातच मिळाले असले तरी शिक्षणाचा फायदा स्वतःच्या २५० हापूस कलमांच्या व्यवस्थापनात होत गेला. सुरुवातीच्या काळात २००५ ते २००६ त्यांनी एका कृषी सेवा केंद्रात नोकरीही केली. त्यातून जयगड पंचक्रोशीतील अनेक आंबा बागायतदारांशी त्यांचा परिचय झाला. २००७ मध्ये धाडस करून दीडशे कलमांची सैतवडे-जाकादेवी येथील आंबा बाग ८० हजार रुपये प्रति वर्ष या बोलीवर कराराने घेतली.

या व्यवहारात मोठा भाऊ तुषार आणि बहीण आकांक्षा यांची मोलाची मदत झाली. या बागेच्या व्यवस्थापनावर सुमारे सव्वा लाखांचा खर्च केला. या बागेतील आंबा ते मुंबई, पुणे बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे पाठवू लागले. या वेळी एका कीडनाशक कंपनीत २००९ मध्ये त्यांना ‘मार्केटिंग फिल्ड असिस्टंट’ म्हणून नियुक्ती झाली. कीडनाशकाच्या विक्रीसाठी रोज २५ ते ३० कि.मी. फिरती सुरू होती.

या काळात संपर्कात आलेले आंबा बागायतदार आनंदा मुळ्ये, अनिल जोशी यांचे दर्जेदार आंबा उत्पादनासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. त्यातून २०१५ पासून नेवरे, गणपतीपुळे, मालगुंड या परिसरातील बागा कराराने घेत बागांच्या संख्येत वाढ केली. आता त्यांच्याकडे दहा शेतकऱ्यांची १५०० कलमे कराराने आहेत.

Contract Farming
Contract Farming : करार शेतीद्वारे राबविला व्यावसायिक शेतीचा ‘पॅटर्न’

दर्जेदार हापूसचा ‘यू.एस.आर.’ ब्रॅण्ड ः

दर्जेदार फळांना मागणी व दरही चांगला मिळतो, हे लक्षात आले. मग फळ झाडावर तयार होण्यापासून काढणी व काढणीपश्‍चात हाताळणीपर्यंत काळजी घेतली जाते. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये बागांच्या साफसफाईवर भर दिला जातो.

मोहोर आल्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत झाडांची हलवणी केली जाते. सुकलेला मोहोर पडून गेल्याने कणी सेटिंग व्यवस्थित होते. सुपारीएवढी कैरी झाल्यानंतर अन्य खराब, सुकलेल्या कैऱ्या पाडून टाकल्या जातात. बहुसंख्य बागायतदार मार्च महिन्यात आंबा तयार झाला की फवारणी थांबवतात.

परंतु फळाला चकाकी येण्यासाठी एखादी फवारणी केली जाते. १४ ते १६ आणे तयार फळांची काढणी, सावलीमध्ये वाहतूक, चार ग्रेडमध्ये प्रतवारी यामुळे फळांची दर्जा उत्तम मिळतो. दर्जेदारपणातील सातत्यामुळेच ‘यू.एस.आर.’ ब्रॅण्ड म्हणून वाशी व पुणे बाजार समितीत प्रस्थापित झाला असल्याचे उमेश सांगतात.



Contract Farming
Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

खर्चातील बचतीसाठी...
१) हापूस बागेमध्ये अलीकडे संजीवकांचा वापर वाढला आहे. मात्र त्यातून झाडाचे आयुष्य व उत्पादन कमी होते. हे टाळण्यासाठी एक वर्षाआड आणि झाडाच्या अवस्था व कॅनॉपीप्रमाणे संजीवकांचा वापर करतात. पुढे वाढीच्या अवस्थेनुसार एकात्मिक खतांचे नियोजनही केले तर खर्चात बचतीसोबतच उत्पादनही चांगले मिळते.

बागेच्या सुपीकतेविषयी विचार करत असल्यामुळे बागायतदार कराराने हापूस कलमे देण्यासाठी उत्सूक असतात.
२) रासायनिक कीडनाशकांवरील ऑफर वगैरे पेक्षाही शिफारशीप्रमाणे फवारणीवर भर असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च होत नाही.


३) पूर्वी आम्ही आंबा पाठविण्यासाठी लाकडी खोके वापरत असू. त्याचे वजन दोन ते अडीच किलो असून, खर्च १३० ते १४० रुपये पडतो. त्यात खोक्यासाठी झाडांची तोड होते. तसेच खोक्यामध्ये गवतही अधिक भरावे लागते. त्या तुलनेत प्लॅस्टिक क्रेट १०० रुपयांना मिळतो, गवतही कमी लागते आणि हाताळणीही सोपी जाते. हे क्रेट पुन्हा पुन्हा वापरता येतात.
४) झाडावरील बांडगुळे मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काढून टाकली जातात. त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी व पुढील उत्पादनासाठी फायदा होतो.

करारातील बागांमधून नफा ः
२०१२-१३ नंतर रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये कराराने बागा घेण्यात चढाओढ सुरू झाली. चढ्या दराने घेतलेल्या बागेमध्ये अधिक उत्पादन मिळवण्यासाठी संजीवकांचा वारेमाप वापरही सुरु झाला. मात्र त्यातून उत्पादन आणि उत्पन्नांवरही परिणाम झाला. मात्र उमेश रहाटे यांनी करारावरील बागांतून उत्पन्नांचे गुणोत्तर साधण्याचा प्रयत्न केला.

छोट्याछोट्या गोष्टींमधून बचत करण्यावर त्यांनी भर दिला. व्यवसायाच्या सुरुवातीला बँकेमधून पाच लाख रुपये कर्ज घेतले. वर्षाअखेरीस कर्ज फेडल्यानंतर पुन्हा पुढील वर्षी पाच लाखांचे कर्ज घेत व्यवस्थापन केले. मात्र त्यानंतर हंगामाच्या अखेरीस मिळणाऱ्या नफ्यामधून व्यवस्थापन खर्च करण्यास सुरुवात केली.
- गतवर्षी स्वतःची २५० अधिक कराराची १५०० झाडे होती.
- करारापोटी वर्षाला सुमारे १७ लाख रुपये दिले.


खते, संजीवक, साफसफाई इ. मजुरीसह ७ लाख रुपये, फवारणीचा खर्च ७ लाख रु., राखण, मजुरी यावर १० लाख रु., वाहतूक खर्च ५ लाख रु. व अन्य खर्च ५ लाख या प्रमाणे हंगामामध्ये सुमारे ३५ ते ४० लाख रुपये एकूण खर्च होतो. सरासरी १२ ते १५ लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो. गतवर्षी सरासरी २४०० रुपये प्रति पेटी (पाच ते आठ डझन, १९ इंच खोक्यासाठी) असा दर मिळाल्याचे उमेश यांनी सांगितले.


विक्री व्यवस्थेत बदलातून नफ्यात वाढ

मुंबई, पुण्यात बाजार समितीमधील एखाद्या दलालाकडे आंबा पाठविल्यानंतर त्याची एकूण रक्कम जून महिन्यामध्ये बागायतदारांना मिळते. आजही अशी परंपरा कायम आहे. मात्र कोरोनाच्या काळात बाजारावर मर्यादा आल्याने थेट विक्रीचा पर्याय अवलंबला गेला.

मात्र त्याही आधी २०१३-१४ पासून उमेश रहाटे हे कल्याण (मुंबई) येथील बहीण आकांक्षा राऊत आणि घाटकोपर येथील मित्र स्वप्नील पालांडे यांच्या साह्याने थेट ग्राहकांपर्यंत ७०० ते ८०० पेटी आंबा पाठवतो. त्याला दलालांपेक्षा ३०० ते ५०० रुपये अधिक दर मिळतो.

सामान्यतः मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत आंब्याचा बाजारातील दर स्थिर असतो. त्यानंतर दर कमी कमी होत जातो. त्यामुळे उमेश यांनी अक्षय तृतीयेनंतर (साधारणपणे एप्रिलनंतर) ३० ते ४० टक्के माल नाशिक, नागपूर, औरंगाबादसह मुंबई, पुण्यात विक्रीला पाठवतात. त्यातून दर वाढण्यासोबत जोखीम कमी होते.

आंतरपीक आणि प्रक्रियेतून उत्पन्न

आंबा बागेत आंतरपीक करून, त्यातून बाग व्यवस्थापनाचा खर्च भागवला जातो.
-उमेश यांनी २०१२-१३ मध्ये ३ ते साडेतीन टन भोपळा पिकवला. घाऊक बाजारात त्याला २५ ते ३० रुपये आणि स्थानिक बाजारात ४० ते ४५ रुपये प्रति किलो दर मिळाला.
-२०१३-१४ मध्ये अननसाचे एक टनाहून अधिक उत्पादन मिळाले. त्याला १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळाला.


-२०१६-१७ या वर्षात केलेल्या झेंडू लागवडीतून खर्च वजा जाता ३५ ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले.
- २०१५-१६ पासून आंबा कॅनिंगला सुरुवात केली. दरवर्षी १५ ते २० टक्के आंबा डागी निघतो. त्यापासून सुमारे एक ते दीड टन पल्प बनवला जातो. कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता बनविलेल्या आंब्याच्या पल्पची ५०० ग्रॅमची बाटली १५० रुपयांना विकली जाते.


- गेल्या तीन वर्षांपासून आई श्रीमती संगीता व पत्नी सौ. सीमा या दोघी कैरीफोड, आंबापोळी, बागेतील कोकम, आमसुले, तळलेले फणस गरे अशा प्रकारे घरगुती प्रक्रियेतून उत्पन्नात २.५ ते तीन लाखांचा हातभार लावतात.
- मागील दहा वर्षांत त्यांनी स्वतःची ४०० झाडांची हापूस बाग विकसित केली आहे. तसेच केसर आंब्याची १३० झाडे, पायरीची १५ झाडे, रत्ना १० कलमे आहेत. त्यामधून वर्षाला २०० पेटी केसर आंबा मिळतो. कोकणातील केसरच्या पाच डझनाच्या पेटीला सरासरी १७०० ते १८०० रुपयांपर्यंत दर मिळतो. कारण तो सर्वांत आधी बाजारात येतो.

उमेश संभाजी रहाटे, ८८८८०९६९११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com