Agriculture Enterpreneurs Scheme : कृषी उद्योजकांसाठी नवी योजना आणू

Vidyadhar Anaskar : कृषी उद्योजकांना वेळेवर पुरेसे आर्थिक भांडवल मिळवून देणारी स्वतंत्र योजना ‘अॅग्रोवन’च्या मदतीने शिखर बॅंकेकडून आणली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केली.
Vidyadhar Anaskar
Vidyadhar AnaskarAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी उद्योजकांना वेळेवर पुरेसे आर्थिक भांडवल मिळवून देणारी स्वतंत्र योजना ‘अॅग्रोवन’च्या मदतीने शिखर बॅंकेकडून आणली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केली. राज्यातील निवडक कृषी उद्योजकांच्या यशकथांचे संकलन असलेल्या ‘आयकॉनिक्स ब्रॅंन्डस् इन अॅग्रिकल्चर’ या कॉफी टेबल बुकचे तसेच शेखर गायकवाड लिखित ‘बदलता ग्रामीण महाराष्ट्र’ पुस्तकाचे एका दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले.

त्यासाठी ‘अॅग्रोवन’कडून पुणे येथील शेरेटन ग्रॅंड हॉटेलमध्ये बुधवारी (ता. २६) आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अनास्कर बोलत होते. ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी उदय जाधव, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर होते. या वेळी टाळ्यांच्या गजरात निवडक कृषी उद्योजकांचा गौरव करण्यात आला.

Vidyadhar Anaskar
Agriculture Insurance Scheme : मृग बहारातील फळपिकांसाठी विमा योजना

श्री. अनास्कर म्हणाले, ‘‘कोणत्याही उद्योगात भांडवली गुंतवणूक, खेळते भांडवल मोलाचे असते. त्यानंतर व्यवस्थापनावर आधारित नफा तोटा ठरत असतो. दुर्दैवाने उद्योजकांना भांडवलाबाबत पुरेसे मार्गदर्शन व वेळेत कर्जही मिळत नाही. नफ्यातून कर्जाचे व्याज दिले जाते. हे चुकीचे गणित उद्योगाला पुरते अडचणीत आणते. त्यामुळे ‘अॅग्रोवन’ने मध्यस्थी केल्यास कृषी उद्योजकांच्या समस्या विचारात घेत भांडवल पुरवणारी एक योजना आणता येईल. ती जबाबदारी घेण्यास शिखर बॅंक तयार आहे.’’

अॅग्रोवन व सकाळ परिवाराचा जुना ऋणानुबंध असल्याचा उल्लेख श्री. अनास्कर यांनी केला. ‘‘विविध कार्यकारी सोसायट्यांच्या अडचणी मांडण्याबाबत आम्ही ‘अॅग्रोवन’मधून आवाहन केले होते. त्यामुळे हजारो पत्रे शिखर बँकेला आली. त्याचा अभ्यास करून बॅंकेने केंद्रीय सहकार विभागाला सुधारणा सुचविल्या. त्यामुळे केंद्राने धोरणात्मक बदल केले. यातून ‘अॅग्रोवन’चा आवाका अधोरेखित होतो. त्यामुळे आता कृषी उद्योजकांसाठी ‘अॅग्रोवन’ पुढाकार घ्यावा. त्यासाठी आम्ही राज्यस्तरीय कार्यशाळा घेऊ. उद्योजकांच्या वित्तीय समस्यांबाबत मंथन करीत त्यातून उपाय काढण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून केला जाईल,’’ असेही श्री. अनास्कर यांनी नमूद केले.

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘शेतीवर अवलंबून असलेला समाज अधिक मागासलेला असतो, असे जगातील अर्थशास्त्रज्ञ सांगतात. राज्यातील शहरीकरण आताच ७० टक्क्यांपर्यंत गेले आहे. ही चांगली बाब आहे. वाढत्या कृषी उद्योजकतेमधील आयकॉन गोळा करून त्याचा सन्मान करणारा सकाळ अॅग्रोवनचा उपक्रम अभिनंदनीय आहे. राज्याला आता काटेकोर, तंत्रज्ञानयुक्त आणि उत्तम व्यवस्थापनावर आधारित शेती व्यवस्थेची गरज आहे. त्यासाठी अॅग्रोवनकडून घेता जाणारा पुढाकार मोलाचा ठरतो आहे.’’

Vidyadhar Anaskar
Agriculture Scheme Corruption : कापूस, सोयाबीन योजनेत १४१ कोटींचा भ्रष्टाचार

‘सकाळ माध्यम समुहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव म्हणाले, ‘‘१९ वर्षांपूर्वी ‘अॅग्रोवन’ सुरू करताना खप, नफा नव्हे; तर शेतकऱ्यांच्या जीवनात होणारा बदल डोळ्यासमोर ठेवा, असा बहुमोल सल्ला सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आम्हाला दिला होता. तोच धागा पकडून ‘अॅग्रोवन’ने यशस्वी वाटचाल केली. त्यातून प्रयोगशील शेती वाढली. हजारो शेतकरी समृद्ध झाले. राज्यातील शेतकरी व कृषी उद्योजकांच्या यशकथा यापुढेही आम्ही मांडत राहू.’’

या वेळी ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक श्री.चव्हाण म्हणाले की, राज्यात कृषी उद्योजकता सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी रुजवली. पुढे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या योगदानातून ती भरभराटीला आली आहे. आता मराठी मातीमधील आपला जिद्दी कृषी उद्योजक नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करतो आहे. ही उत्पादने आता जगभर पोहोचत आहेत. कष्टकरी शेतकरी व जिद्दी कृषी उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी ‘अॅग्रोवन’ सातत्याने विविध उपक्रम राबवतो आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन आर. के. अक्षय यांनी तर ‘अॅग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले.

खुमासदार गोष्टींनी कृषी उद्योजकांना हसवले

शेतजमीन व महसूल कायद्याचे अभ्यासक शेखर गायकवाड यांनी खुमासदार भाषणातून उद्योजकांना हसवून सोडले. ते म्हणाले की, आपला देश म्हणजे इरसाल माणसांची खाण आहे. ही माणसं अगदी आयएएस अधिकाऱ्यालाही रोज नवा धडा शिकवत असतात. स्वातंत्र्यांपूर्वी अशी इरसाल माणसं निर्यात केली असती तर आतापर्यंत इंग्लंडमध्ये थॅचरबाईच्या घरासमोर म्हसोबा उभारला गेला असता. युक्रेनमध्ये पाठवलेल्या आपल्या इरसाल माणसाने बांध कोरून थेट मास्कोची जमीन ताब्यात घेतली असती.(हशा).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com