
Agriculture Scheme : राज्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या फळबाग लागवडीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यात ‘रोहयो’तून ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट होते. ७७ हजार शेतकऱ्यांनी त्यासाठी मागणी अर्ज केले, परंतु पाऊस नसल्याने शेतकरी फळबाग लागवडीस धजावत नसल्याचे चित्र आहे. पावसाळा संपत आला तरी आतापर्यंत केवळ उद्दिष्टाच्या २६.७२ टक्के फळबाग लागवड झाली आहे. दहा जिल्ह्यांत तर दहा टक्क्यांच्या आत फळबाग लागवड झाली आहे.
शेतकऱ्यांनी अलीकडच्या पाच वर्षांत फळबाग लागवडीला अधिक प्रधान्य दिले आहे. गेल्या तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने ‘रोहयो’तून सुमारे सव्वा लाख हेक्टरवर फळबागा लागल्या आहेत. हा प्रतिसाद पाहून यंदाही कृषी विभागाने ६० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट केले. त्यासाठी राज्यातील ८ हजार ३९३ कृषी सहायकांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार फळबाग लागवड वाढीसाठी आवाहन केले. मुळात उन्हाळ्यात फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले जातात. त्यानंतर पाऊस पडला की लागवडीला सुरुवात होते. यंदा मात्र एकतर सुरुवातीलाच उशिराने पाऊस आला. त्यानंतर अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही.
त्यामुळे फळबाग लागवडीसाठी अनुदान मिळावे म्हणून मागणी केली. मागणीनुसार ९० टक्के तांत्रिक मान्यता व ८८ टक्के प्रशासकीय मान्यता दिली असली, तरी तरी लागवडीला मात्र वेग आला नाही. यंदा अनेक शेतकऱ्यांनी पाऊस पुरेसा नसल्याने आता फळबागा लावल्या तरी पुढे पाऊस नसल्याने जगतील का, पाऊस आला नाही तर पाणीही पुरेसे उपलब्ध होईल की नाही याबाबत शाश्वती नाही. पुरेसे पाणी नसल्याने आधीच्याही फळबागा जगवता येतील की नाही, याबाबत भीती असल्याने यंदा नव्याने फळबाग लागवडी फारशा झाल्या नाहीत. कृषी विभागाकडील अहवालानुसार, आतापर्यंत पावसाळ्याचे अडीच ते तीन महिने उलटले असले तरी पाऊस नसल्याने यंदा आतापर्यंत केवळ २६.७५ टक्के फळबाग लागवड झाली आहे.
- फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ः ६० हजार
- प्राप्त अर्ज करणारे शेतकरी ः ७७२८०
- अनुदान मागणी हेक्टर क्षेत्र ः ५८५५१ (९७.५९ टक्के)
- तांत्रिक मान्यता ः ५४३७१ (९०.६२ टक्के)
- प्रशासकीय मान्यता ः ५१३६६ (८७.७३ टक्के)
- खड्डे खोदले ः १८६५१ (३४.३० टक्के)
- लागवड ः १६,०३१ (२६.७२ टक्के)
----
ठाणे ः ११७९ (१५००), पालघर ः १७९५ (२७००), रायगड ः १४८२ (२४००), रत्नागिरी ः १४२४ (४०००), सिंधुदुर्ग ः ८९० (३४००), नाशिक ः ११३० (४०००), धुळे १४० (१०००), नंदुरबार ः ७०० (२५००), जळगाव ः २०९ (२५००), नगर ः २४७ (३०००) पुणे ः ८२ (३०००), सोलापूर ः ७० (२७००), सातारा ः ६४ (१२००), सांगली ः २५२ (१६००), कोल्हापूर ः १२ (६००), जालना : ३०५ (१८००), छत्रपती संभाजीनगर ः १३६ (१०००), बीड ः ५३ (५००), लातूर ः २६५ (१३००), धाराशिव ः १४८ (८००), नांदेड ः ८६ (७००), परभणी ः ८१ (१५००), हिंगोली ः ७४ (६००) बुलडाणा ः ४६७ (१८००), अकोला ः ३६३ (१०००), वाशीम ः ४१४ (१०००), अमरावती ः १६९ (२२००), यवतमाळ : १४३२ (२२००) वर्धा ः ३३१ (१०००), नागपूर ः ४७४ ( १५००), भंडारा ः २९३ (१०००), गोंदिया ः ५५१ (१५००), चंद्रपूर ः ४०३ (१५००). गडचिरोली ः ९६ (१०००).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.