
डॉ. एस. डी. सावंत
माझ्या माहितीप्रमाणे द्राक्ष बागेतील सेंद्रिय कर्ब ०.३ ते १.८ टक्का या दरम्यान आहे. जमिनीतील सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी सेंद्रिय कर्ब ०.७ टक्का किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण नेमके कोणत्या जमिनीमध्ये अधिक आहे, याचा विचार करू. सर्वसाधारणपणे नदी किनाऱ्याच्या जमिनीमध्ये किंवा कंपोस्ट, शेणखतांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या जमिनीमध्ये ते अधिक आढळते.
उदा. सांगली भागातील बागायतदार राधानगरी आणि गगनबावडा या पशुधनाचे प्रमाण अधिक असलेल्या भागातून शेणखत आणतात. काही जण जवळपासच्या साखर कारखान्यातून उपलब्ध होणारा ‘प्रेस मड’ कंपोस्ट करून बागेत वापरतात. या दोन्ही घटक सुपीकतेसाठी फायदेशीर असले तरी त्यांचा वापर प्रत्येक वर्षी करावा लागतो. (हे सामान्य शेतकऱ्यांना शक्य आहे का, हा खरेतर वेगळ्या चर्चेचा विषय आहे.)
दरवर्षी बागेमध्ये केली जाणारी खरड छाटणी, फळ छाटणी याद्वारे मोठ्या प्रमाणात जैवभार (बायोमास) बागेबाहेर जात असतो. अलीकडे अनेक बागायतदार यातील एकही काडी बागेबाहेर जाणार नाही, या दिशेने प्रयत्न करत आहेत. ते बायोमास बारीक करण्यासाठी श्रेडरसारखी यंत्रे वापरतात. बारीक केलेला जैवभार बोदावर कुजण्यासाठी टाकला जातो. ही पद्धत चांगली असून, सर्वांनी तिचे अनुकरण करावे.
मात्र ज्या जमिनीमध्ये मुळात सेंद्रिय पदार्थ फार कमी आहेत, अशा ठिकाणी बायोमास कुजण्यासाठी आवश्यक ते सूक्ष्मजीवही कमी असतील. अशा बागेत कुजण्याची क्रिया वेगाने होण्यासाठी ‘कंपोस्टिंग कल्चर’ वापरणे फायद्याचे ठरते. दरवेळी हे कल्चर खरेदी करण्याची आवश्यकता भासते.
त्यावर मात करण्यासाठी मंगेश भास्कर यांनी ‘सह्याद्री फार्म्स’च्या माध्यमातून लोकप्रिय केलेली ‘टेन ड्रम थिअरी’ उपयोगी ठरेल. त्यांच्या या दहा ड्रमपैकी सहा ड्रममध्ये मातीमध्ये वापरण्याचे सूक्ष्मजीव वाढवले जातात. अशा प्रकारे नियोजन केल्यास आपल्या बागेत वापरण्यासाठी नियमितपणे सूक्ष्मजीवांचे कल्चर बागेतच उपलब्ध होऊ शकते.
द्राक्षात वापरण्यायोग्य पद्धती
मागील काही दिवस प्रवासादरम्यान माझ्याबरोबर प्रताप चिपळूणकर होते. ‘तण देई धन’ ‘नांगराविना शेती’ यासारख्या संवर्धित शेतीनिगडित विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास व अनुभव आहे. त्यांच्याबरोबर खूप चर्चा झाली. अशा प्रकारचे द्राक्ष बागेतील अनुभव वासुदेव काटे यांनीही वेळोवेळी मांडले आहेत. सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही गोष्टी पाहू.
मातीमध्ये बायोमास कुजण्याची क्रिया होत असताना मातीमध्ये विशिष्ट रचना तयार होत असते. या रचनेमध्ये सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्म जीव आणि अन्नद्रव्ये एकत्रितपणे काम करत असतात. यातील एक घटक जरी बिघडला तरी एकमेकांच्या कामावर त्याचा परिणाम होतो.
म्हणूनच मातीची ही रचना शक्यतो बिघडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. संपूर्ण कुजलेले खत मातीत मिसळण्याऐवजी हळूहळू कुजणारे सेंद्रीय पदार्थ मातीत मिसळणे गरजेचे आहे. या सावकाश कुजण्याच्या प्रक्रियेतून तयार झालेले सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये जास्त वेळ टिकतात. त्यातील सेंद्रिय कर्ब बनत जाते आणि त्याचा फायदा पिकाला होतो.
पावसाळ्यात बागेत वाढणारे तण जूने होईपर्यंत वाढू द्यावे. नंतर कल्टिव्हेटरने उपटून काढण्यापेक्षा फक्त वरून कापावे. तणाच्या वरच्या भागात जास्त करून सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजसारखे पदार्थ असतात. अशा प्रकारचे बायोमास लगेच कुजते. त्याचा फायदा पिकाला लगेच मिळतो. तणाचा मातीखालील भागात जास्त लिग्नीनयुक्त पदार्थ असल्याने त्याच्या कुजण्याची क्रिया हळूहळू होते.
याच्या कुजण्यामुळे मातीला आकार मिळतो. जो पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी व अन्नपदार्थांच्या शोषणासाठी पोषक असतो. तण वरून कापल्यानंतर ते पुन्हा वाढू नये किंवा मातीतील भाग मरून त्याची कुजण्याची क्रिया लवकर सुरू व्हावी, यासाठी सामान्यतः ‘ग्लायफोसेट’ सारख्या तणनाशकाचा वापर केला जातो. मात्र ग्लायफोसेटचा वापर द्राक्ष बागेमध्ये सध्या शक्य नाही. यासाठी योग्य पर्याय शोधता येईल.
शेतातील चारा किंवा वनस्पतीच्या आहार गायी, म्हशी देऊन त्यांच्या शेणखताचा वापर शेतात करतो. त्याऐवजी सरळ त्याच वनस्पती, तणे शेतातच कुजवली जातात, तेव्हा सेंद्रिय कर्ब उपलब्ध होण्याची व्याप्ती कितीतरी अधिक वाढलेली असते. याच धर्तीवर दशपर्णी अर्कही कार्य करतो. त्यातील काही वनस्पती रोगांच्या बुरशींचा नाश करतात, काही पिकावरील किडींचा, तर काही वनस्पती विशिष्ट अन्नद्रव्ये पुरवतात तर काही उपयुक्त सूक्ष्मजिवांना वाढवतात. शेतात वेगवेगळ्या प्रकारची तणे वाढू देऊन तिथेच मातीत कुजवणे हे एक प्रकारे दशपर्णी अर्क वापरण्यासारखेच आहे.
पावसाळ्यामध्ये बागेतील दोन ओळींमध्ये हिरवळीची खतपिके लावल्यास फायदा होतो. मात्र बागेमध्ये फवारणीवेळी अडथळा येऊ शकतो किंवा काही किडी वाढू शकतात, म्हणून अनेक शेतकरी हिरवळीची खतपिके घेणे टाळतात. एक एकरमध्ये धैंचा पीक घेऊन गाडणे म्हणजेच १० ते १५ टन कंपोस्ट वापरण्यासारखेच आहे.
त्यामुळेच सेंद्रीय कर्ब वाढविण्याच्या मोहिमेमध्ये हिरवळीच्या खतांचाही समावेश करण्याची आवश्यकता वाटते. प्रत्येकाने आपापल्या सोयीप्रमाणे त्याच्या लागवडीचे वेळ ठरवता येईल. उदा. ज्या बागेमध्ये डिसेंबर - जानेवारीमध्ये काढणी होऊन जाते आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, त्या बागेत खरड छाटणीनंतर लगेच हिरवळीच्या पिकांची पेरणी करता येईल.
द्राक्ष बागेमध्ये गांडूळखताचा वापर फार कमी करताना दिसतात. खरेतर ही गांडुळांच्या साह्याने पिकांच्या अवशेषापासून वेगाने उच्च दर्जाचे
कंपोस्ट बनविण्याची पद्धत आहे. आपल्या बागेसोबत अन्य शेतातील व पडीक जमिनीतील अवशेषांपासून गांडूळ खत बनवता येईल. गांडूळ खतामध्ये बाकीच्या कंपोस्टपेक्षा कर्बाचे प्रमाण जास्त असते. सोबतच गांडुळाच्या विष्ठेमुळे (कास्टिंग) विविध संप्रेरके, अन्नद्रव्ये आणि उपयुक्त सूक्ष्मजीवही पिकाला मिळतात.
गांडुळखताची निर्मिती करतानाच त्यात स्फुरद किंवा पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर केल्यास त्यांचीही वाढ चांगली होते. ट्रायकोडर्मा यासारखी बुरशी किंवा बॅसिलस सबटिलिससारखे जिवाणूही त्यात वाढवता येतात. गांडूळ खतासोबत शेतातील मातीमध्ये ते स्थापित होणे सोपे जाते.
द्राक्ष हे नगदी पीक असल्याने उत्पादनामध्ये वेळच्या वेळी सर्व निविष्ठा पुरवणे आणि कामे करण्याचे नियोजन करावे लागते. मात्र या सर्वच निविष्ठा विकत आणण्यापेक्षा शक्य तितक्या शेतातच तयार करणे शक्य झाल्यास खर्चात बचत होईल. उदा. व्हर्मिकंपोस्ट आणि बायोचार इ. शेतातच तयार केल्यास द्राक्षशेती अधिक शाश्वततेकडे नेता येईल.
बायोचार निर्मिती व वापर
बायोचार हा एक आजीव पदार्थ आहे. परंतु सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्याची संरचना व सच्छिद्रता समजून येते. या संरचनेमुळे त्यात अधिक पाणी, सूक्ष्मजीव व अन्नद्रव्ये पकडून ठेवतो.
म्हणूनच बायोचारचा वापर गांडूळ खत व तत्सम चांगल्या दर्जाच्या कंपोस्टबरोबर वापरल्यास सेंद्रिय कर्ब वाढीचे चांगले परिणाम दीर्घकाळ मिळण्याची शक्यता आहे. बायोचार फक्त लाकडी जैवभारापासून बनवता येतो असा समज आहे. परंतु सुकलेल्या पानांपासूनही तो बनवता येतो. उदा. काजूची पानांचा बायोचार.
दरवर्षी छाटणीतील बायोमास बारीक करून बोदावर टाकण्यासोबतच एखाद्या वर्षी (किमान चार वर्षातून एकदा) छाटणीतून निघालेल्या सर्व बायोमासपासून बायोचार बनवता येईल. तो गांडूळखतासोबत मिसळून त्याच मातीत मिसळल्यास चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे.
बायोमास बारीक करून बोदावर कुजवण्याच्या प्रक्रियेतून १० ते १५ % कर्ब मिळणार ,तर त्याचाच बायोचार बनविल्यास ४० ते ६० टक्के कर्ब मिळेल, असा हिशेब धरल्यास बायोचार निश्चितच फायद्याचा वाटतो. बायोचार सजीव नसल्यामुळे सूक्ष्मजीव त्याला संपवत नाहीत. म्हणूनच बायोचार मातीत दीर्घकाळ राहील ही अपेक्षा आहे.
- डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.