
साक्षी जिवतोडे, डॉ. विजया पवार
आयुर्वेदात मेथीला औषधी महत्त्व आहे. शरीराला उष्णता देण्यापासून ते पोषणमूल्य वाढविण्यापर्यंत, मेथीचे फायदे अनेक आहेत. मेथीमध्ये प्रथिने, तंतुमय घटक, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि पोटॅशिअम यांसारखे घटक मुबलक प्रमाणात असतात.
मेथीच्या पानांचा सुवासदेखील भूक वाढवतो. मेथी विविध प्रकारे आहारात समाविष्ट करता येते. हिवाळ्यात शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीर उष्ण ठेवण्यासाठी मेथीची भाजी उपयुक्त ठरते.
मेथीपासून उप-उत्पादन प्रक्रिया
मेथीपासून विविध उप-उत्पादने तयार करण्यासाठी सोप्या आणि प्रभावी प्रक्रिया तंत्रांचा उपयोग केला जातो. यातील एक महत्त्वाचे उत्पादन म्हणजे कसुरी मेथी. ताज्या मेथीच्या पानांची निवड करून ती स्वच्छ धुतली जातात.
त्यानंतर ती उन्हात किंवा यांत्रिक वाळवणीद्वारे वाळवली जातात. सुकलेली पाने प्रतवारी करून हवा बंद पॅकिंगमध्ये साठवली जातात. हे उत्पादन मुख्यतः मसाला, पराठा किंवा भाज्यांमध्ये चव वाढविण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे यांचा विविध पदार्थांचे मुल्यवर्धन करण्यासाठी फायदा होतो.
मेथीपासून प्रामुख्याने कस्तुरी मेथी, मेथी अर्क, मेथी चहा, मेथीचे लोणचे, मेथीचे तेल असे विविध उप-उत्पादने तयार करता येतात. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी याचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते.
कसुरी मेथीला स्वयंपाकात मसाला मोठी मागणी असून ती पराठा, भाजी, करी आणि डाळींसाठी वापरली जाते.मेथीचे तेल औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण नैसर्गिक तेल मानले जाते. मेथी चहा हा आरोग्यवर्धक आणि ताजेतवाने करणारा पेय पदार्थ आहे.
कसुरी मेथी
कसुरी मेथी तयार करण्यासाठी ताजी व उच्च दर्जाची मेथीची पाने निवडून स्वच्छ धुऊन निथळून घ्यावीत. नंतर ही पाने स्वच्छ कापडावर पसरवून उन्हात ३ ते ५ दिवस वाळवावीत किंवा यांत्रिक ड्रायरमध्ये ४५ ते ५० अंश सेल्सिअस तापमानावर ८ ते १० तास वाळवली जातात.
वाळल्यानंतर पाने हलकेच चुरून लहान तुकडे करून चाळली जातात. यामुळे अनावश्यक भाग वेगळे होतात. वाळलेल्या पानांची प्रतवारी रंग, सुगंध आणि गुणवत्ता यानुसार केले जाते.
तयार कसुरी मेथी हवाबंद पिशवी किंवा डब्यात पॅकिंग करून थंड व कोरड्या ठिकाणी साठवली जाते, ज्यामुळे सुगंध व स्वाद दीर्घकाळ टिकतो.
कसुरी मेथीला स्वयंपाकात मसाला म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी असून ती पराठा, भाजी, करी आणि डाळींसाठी वापरली जाते.
मेथी अर्क
अर्क तयार करण्यासाठी मेथीच्या बिया निवडून स्वच्छ कराव्यात. त्यानंतर या बिया मिक्सरमध्ये थोड्या प्रमाणात जाडसर पूड स्वरूपात दळाव्यात. तयार पूड इथेनॉल, पाणी किंवा ग्रीन सॉल्व्हंटसारख्या द्रावकामध्ये ठरावीक प्रमाणात मिसळली जाते. हे मिश्रण एका नियंत्रित तापमानावर व विशिष्ट वेळेसाठी ठेवल्यानंतर फिल्टर करून अर्क वेगळा केला जातो.
अर्क वायूयुक्त वाफेच्या साहाय्याने किंवा लघुदाब प्रणालीद्वारे द्रव स्वरूपात वाळवला जातो, ज्यामुळे अधिक शुद्ध अर्क मिळतो.
हा अर्क औषधनिर्मिती, पोषणपूरक पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, तसेच विविध आरोग्य पूरक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
मेथी अर्क पचन सुधारण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रित आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
मेथी चहा
मेथी चहा हा आरोग्यवर्धक आणि ताजेतवाने करणारा पेय पदार्थ आहे. हा चहा मेथीच्या बियांपासून तयार केला जातो. चहा तयार करण्यासाठी, प्रथम मेथीच्या बिया स्वच्छ धुऊन हलक्या भाजून घेतल्या जातात. या भाजलेल्या बियांमध्ये उष्ण पाण्यात मुरवण्याची प्रक्रिया केली जाते.
एक कप पाण्यात साधारणपणे १ ते २ चमचे भाजलेल्या मेथीच्या बिया घालून पाणी उकळले जाते. पाणी उकळताना त्यात हवे असल्यास आले, लिंबाचा रस, मध किंवा दालचिनी यांसारख्या स्वाद घटकांचा समावेश करता येतो.
मेथी चहा हा पचन सुधारतो, रक्तातील साखर संतुलित ठेवतो, वजन कमी करण्यास मदत करतो आणि त्वचा व केसांसाठी फायदेशीर ठरतो. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक शरीरातील दाह कमी करण्यास उपयुक्त ठरतात. नियमितपणे मेथी चहा सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि एकूण आरोग्य सुधारते.
मेथीचे लोणचे
मेथीचे लोणचे हे स्वादिष्ट आणि पौष्टिक लोणचे असून ते पारंपरिक भारतीय पदार्थांपैकी एक आहे. हे तयार करण्यासाठी मेथी दाण्यांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे लोणच्याला खास कडसर पण चविष्ट असा स्वाद मिळतो.
मेथी दाणे स्वच्छ धुऊन उन्हात वाळवले जातात किंवा थोडे भाजून घेतले जातात, ज्यामुळे त्यांचा स्वाद अधिक चांगला होतो. त्यानंतर या दाण्यांना मसाल्यांसोबत मिसळले जाते. मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, मोहरी पावडर, मेथी पावडर, हिंग आणि मीठ यांचा समावेश होतो.
लोणचे तयार करण्यासाठी तेल गरम करून थंड केले जाते. त्यात मसाले घालून तयार मिश्रण मेथी दाण्यांसोबत योग्य प्रकारे मिसळावे. हे लोणचे एका निर्जंतुक काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे मुरण्यासाठी काही दिवस उन्हात ठेवावे लागते.
हे लोणचे चविष्ट असते, त्याचबरोबरीने पचन सुधारणा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे.
मेथीचे तेल
मेथीचे तेल हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण नैसर्गिक तेल आहे. याचा उपयोग सौंदर्यवर्धन, केसांची देखभाल, त्वचेची सुधारणा, तसेच वेदनाशमनासाठी होतो.
सर्वप्रथम मेथीचे दाणे स्वच्छ धुऊन हलके भाजले जातात, ज्यामुळे त्यांचा उग्र वास सौम्य होतो आणि त्यातील उपयुक्त घटक अधिक प्रभावी बनतात.यानंतर नारळ तेल, बदाम तेल किंवा मोहरी तेलासारख्या वाहक तेलात मेथीचे भाजलेले दाणे मिसळतात. मिश्रण मंद आचेवर काही वेळ गरम केले जाते, जेणेकरून मेथीच्या दाण्यातील सक्रिय घटक तेलात उतरतात. नंतर हे मिश्रण गाळून थंड होण्यासाठी ठेवले जाते आणि एका स्वच्छ काचेच्या बाटलीत साठवले जाते.
मेथीचे तेल केसांच्या मुळांमध्ये मसाज करण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे केस गळती थांबते, नवीन केसांची वाढ होते आणि टाळू निरोगी राहतो. त्वचेसाठी याचा उपयोग मसाज ऑइलसारखा केला जातो, ज्यामुळे त्वचेवरील पिग्मेंटेशन कमी होण्यास आणि त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. तसेच सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदनेवरही मेथीच्या तेलाचा उपयोग आरामदायक ठरतो.
मेथीमधील पोषणमूल्य (१०० ग्रॅम)
पोषणतत्त्व प्रमाण
ऊर्जा ३२३ कॅलरी
प्रथिने २३ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ ६.४ ग्रॅम
कर्बोदके ५८.४ ग्रॅम
आहारातील तंतू २४.६ ग्रॅम
जीवनसत्त्व अ ६० आययू
जीवनसत्त्व क ३ मि.ग्रॅम
थायामिन (जीवनसत्त्व B१) ०.३२२ मि.ग्रॅम
रिबोफ्लेविन (जीवनसत्त्व B२) ०.३६६ मि.ग्रॅम
नायसिन (जीवनसत्त्व B३) १.६४० मि.ग्रॅम
फोलेट (जीवनसत्त्व B९) ५७ मायक्रोग्रॅम
कॅल्शिअम १७६ मि.ग्रॅम
लोह ३३.५ मि.ग्रॅम
मॅग्नेशिअम १९१ मि.ग्रॅम
फॉस्फरस २९६ मि.ग्रॅम
पोटॅशिअम ७७० मि.ग्रॅम
सोडिअम ६७ मि.ग्रॅम
झिंक २.५ मि.ग्रॅम
आर्द्रता ८.८ ग्रॅम
सॅपोनीन ४.८ टक्के
कु. साक्षी जिवतोडे ९३५६०७३९६५ डॉ. विजया पवार ९४२०६२६५३३ (अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.